गोव्यात पक्ष्यांच्या ५०० प्रजाती

0
116

इवल्याशा गोव्यात पक्ष्यांच्या तब्बल ५०० प्रजाती असून गोव्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, असे वन खात्यातील सूत्रांनी खोतीगाव-काणकोण येथे १२ ते १४ या दरम्यान होणार असलेल्या राज्य पक्षी महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या भारतात पक्ष्यांच्या १२५० प्रजाती आहेत. त्यापैकी जवळ जवळ निम्म्या म्हणजेच ५०० प्रजाती छोट्याशा गोव्यात असणे हे गोवा जैव विविधतेच्या दृष्टीने किती समृद्ध आहे हे दाखवून देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सर्वात जास्त प्रजाती
उत्तराखंड राज्यात
भारतात पक्ष्यांच्या सर्वांत जास्त प्रजाती उत्तराखंड राज्यात आहेत. तेथे पक्ष्यांच्या तब्बल ७०० प्रजाती आहेत. त्यापैकी ४०१ प्रजाती या वनक्षेत्रात राहणार्‍या पक्ष्यांच्या तर उर्वरीत प्रजाती या हिमालयात राहणार्‍या पक्ष्यांच्या आहेत.
गोव्यात पक्ष्यांच्या ज्या ५०० प्रजाती आहेत त्यात वनक्षेत्रात राहणारे पक्षी, खाडीच्या परिसरात राहणारे पक्षी, खाजन शेतीसारख्या परिसरात राहणारे पक्षी व समुद्र किनार्‍यापासून १५ ते २० कि. मी. अंतरावर खोल समुद्रात उंच आकाशात घिरट्या घालणारे पक्षी यांचा समावेश आहे. अशा विविध क्षेत्रात राहणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातीही राज्यात मोठ्या संख्येने असणे हाही गोव्यासाठी दुर्मिळ असा योग असल्याचे सांगण्यात आले.

पक्ष्यांची मोठ्या संख्येने
वस्ती असलेले गाव
पक्ष्यांची मोठ्या संख्येने वस्ती असलेली सात ठिकाणे गोव्यात असून त्यात बोंडला अभयारण्य, म्हादई अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य, नेत्रावळी अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, चोडण येथील सलीम अली पक्षी अभयारण्य व नावेली येथील तळे ही ती ठिकाणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे सात गाव मोठ्या संख्येने पक्ष्यांची वस्ती असलेले गाव म्हणून अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेले असले तरी अशा प्रकारे मोठ्या संख्येने पक्षी वस्ती करून राहणारे आणखीही काही ठिकाणे गोव्यात आहेत. मात्र, या ठिकाणांपैकी काही शहरी भागांत असल्याने ती पक्ष्यांची वस्ती स्थाने घोषित केल्यास त्याठिकाणी विकासकामे व इमारतींसारखी बांधकामे करता येणार नसल्याने सदर ठिकाणे ही पक्ष्यांची वस्तीस्थाने घोषित करण्यास अडचण येत आहे. पणजीतही अशी काही पक्ष्यांची वस्ती स्थाने असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.