Home बातम्या गोव्यातील 17 पाकिस्तानी नागरिकांवर पाळत; तिघांना भारत सोडण्याचे निर्देश

गोव्यातील 17 पाकिस्तानी नागरिकांवर पाळत; तिघांना भारत सोडण्याचे निर्देश

0

सुरक्षाविषयक उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती; विदेशी नागरिकांची पडताळणी मोहीम

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील विमानतळ, रेल्वे, बसस्थानके, बंदर, समुद्रकिनारे, सार्वजनिक ठिकाणी आणि सीमेवर तपासणी नाक्यांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गोव्यात अल्पकालीन व्हिसावर असलेल्या 3 पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, दीर्घकालीन व्हिसावर असलेल्या 17 पाकिस्तानी नागरिकांवर पाळत ठेवली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरक्षाविषयक उच्चस्तरीय बैठकीनंतर घेतलेल्या मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील गृहखाते, पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस, नौदल व इतर संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक मंत्रालयात काल घेतली. या बैठकीत केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर विचारविनिमय करून खबरदारीची आवश्यक पाऊल उचलण्याचा निर्देश सरकारी व सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात विदेशी आणि देशातील नागरिकांची पडताळणीची मोहीम सुरू केली जाणार आहे. त्या नागरिकांना आपले मतदार ओळखपत्र किंवा आधारकार्ड पडताळणीसाठी सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागणार आहे. बाजारपेठेत येणाऱ्या व्यावसायिकांनी सुध्दा ओळखपत्र सोबत बाळगावे; अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.
काश्मीरमधील विद्यार्थी, नागरिकांना आवश्यक सुरक्षा उपलब्ध केली जाणार आहे. त्या काश्मिरी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली जाणार आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करून सुध्दा तपासणी केली जाणार आहे. हॉटेलमालकांना सी फॉर्म सक्तीचा करण्यात आला आहे. कंत्राटदारांनी परराज्यातून कामगार आणताना त्यांची योग्य पडताळणी करावी. मच्छिमारी बोटीवरील कामगारांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यातील 6 जेटी, 28 रॅम्पवर तपासणीचे काम केले जाणार आहे. सोशल मीडियावरील पोस्टवरही लक्ष ठेवले जात आहे. गोव्यातील सामाजिक एकोपा कायम राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार….
या बैठकीत पाकिस्तानी नागरिकांच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्रालयाकडून पाकिस्तानी नागरिकांसाठी 16 प्रकारचे व्हिसा दिले जातात. त्यातील 2 प्रकारचे व्हिसा वगळून इतर 14 प्रकारचे व्हिसा रद्द केले असून, ह्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत देश सोडण्याचा निर्देश दिला आहे.

गोव्यात अल्पकालीन व्हिसा असलेले 3 पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहे. त्यांना येत्या 27 एप्रिलपर्यंत भारत देश सोडण्याचा निर्देश दिला आहे.
गोव्यात दीर्घकालीन व्हिसावर 17 पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. त्या 17 पाकिस्तानी नागरिकांवर पोलीस दलाकडून पाळत ठेवली जाणार आहे. त्या 17 जणांमध्ये हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.