गोव्यातील जत्रोत्सव ः काल आणि आज

0
13
  • – पौर्णिमा केरकर

नाटक संपते… लोक पांगतात. दुकाने आवरून घेण्याची तयारी करतात. गजबजलेला परिसर शांत-शांत व्हायचा… आजच्या जत्रांमधून हीच नितळ शांतता, निखळ आनंदाची देवाण-घेवाण हरवलेली आहे.

सण, उत्सव, परंपरा यांची समाजमनाला उपजत ओढ आहे. गावागावांतील मंदिरात, पारंपरिक मांडावर वर्षाचे बाराही महिने सामूहिक उत्साहाची पर्वणीच अनुभवता येते. चातुर्मासाची समाप्ती झाल्यावर शेषशायी विष्णू जागृत होतात. देवतत्त्वाच्या चैतन्यमयी स्वरूपाच्या स्वागतासाठीच जणू काही कार्तिक मास पूर्णपणे दीपप्रज्वलनाने उजळून गेलेला असतो. ग्रामीण कष्टकरी जीवाचे या महिन्याचे खास आकर्षण म्हणजेच दिवजोत्सव! जत्रांचा मौसम इथूनच सुरू होतो.

दिवज मातीपासून तयार केलेला दीप. याच दीपाचे विलोभनीय रूप कार्तिक मासात घराघरांतून जाणवते. दिव्यांचा आनंद ओसंडून वाहत असतानाच दिवजांच्या वैविध्यपूर्ण जत्रा आगळ्यावेगळ्या वैशिट्यांसह गोव्यातील विविध गावांत अभूतपूर्व आनंदात साजर्‍या केल्या जातात. या जत्रांसाठी सुवासिनी खास उपवास करतात. काही ठिकाणी नवीन लग्न झालेले जोडपे उपवास करते. पूर्वी मातीपासून तयार केलेली दिवजा घेऊनच दिवजांच्या जत्रा साजर्‍या केल्या जायच्या. डिचोलीतील मये गावाची माल्याची जत्रा, शिगमोत्सवात येणारी काणकोण गावडोंगरीची दिंड्या जत्रा, लोलयेची महामाया कुडतरकरणीची दिवजा जत्रा, सत्तरीतील कोपार्डे गावची ब्राह्मणी मायेची दिवज जत्रा, चोपडे, पालये तसेच इतरही अनेक गावांत दिवजांच्या जत्रा होतात. हातात किंवा डोक्यावर पेटलेले दिवज घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतानाचे दृश्य स्वर्गीय भासते. या जत्रेसाठी कडक उपवास ठेवला जातो. पेटलेले रसरशीत इंगळे न्हाण्याची परंपरासुद्धा दिवजोत्सवात दिसते. मयेची माल्याची जत्रा खूप प्रसिद्ध असलेली जत्रा असून ‘दिवज’ हे ‘माले’ म्हणून लोकमनात प्रचलित आहे. जत्रेच्या दिवशी हेच माले प्रज्वलित करून ते डोक्यावर ठेवून नाचवले जाते.
काणकोणची दिंड्या जत्रा अशीच आगळीवेगळी. शिगमोत्सवाच्या कालावधीत इथे मलकाजणाच्या सान्निध्यात दिंड्या जत्रा होते. त्यावेळी लग्न न झालेली पुरुष मंडळी हातात दिण्याची काठी घेऊन, तर कुमारी मुली दिवज घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात. दिवज पेटविण्यासाठीचे साहित्य त्या कुमारिका मुलींना त्यांच्या मामाकडून मिळालेले असते. आदिवासी समाजातील प्रत्येक मुलीने लग्नापूर्वी हाती दिवज घेऊन मंदिर प्रदक्षिणा केल्यावरच त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा होतो असा येथे रिवाज आहे. याच तालुक्यातील लोलये महामाया कुडतरकरणीच्या दिवज जत्रेत मातीच्या दिवजांचा वापर न करता त्या जागेवर निवडुंगाचा वापर केला जातो.

कोपर्डेच्या ब्राह्मणी मायेचे जागृत देवस्थान देवराईत वसलेले आहे. विविध औषधी वनस्पतींच्या गुणधर्माने युक्त असलेली ही जागा. या जागेतील बारामाही वाहणारा झर्‍यामुळे लोकमनात अढळ स्थान प्राप्त करून आहे. कार्तिकातील अमावास्येच्या पाडव्याला ही जत्रा होते. सुवासिनी उपवास धरून दारातील तुळशीवृंदावनासमोर दिवज पेटवतात. घरातील दिवंगत सुवासिनीच्या नावाने दिवज पेटविले जाते. त्यानंतर सर्वजणी आपापले दिवज घेऊन मंदिरात जाऊन बसतात. दिवजात तेल ओतीत संपूर्ण रात्र जागवून पहाटे पहाटे मंदिराला प्रदक्षिणा घालून व्रताची सांगता केली जाते. सर्व भाविकांना शिजवलेल्या भाताचा प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद करण्याची एक खास परंपरा आहे. मानकरी या दिवशी उकड्या आणि सुरय तांदळापासून भात शिजवतात. त्या भाताची रास करून मंदिरात ठेवली जाते. रात्रीच्या वेळी नागीण रूपातील देवी ब्राह्मणी माया त्या भाताच्या राशीवरून फिरते व भक्तगणांना आशीर्वाद देते असा संकेत आहे. हा प्रसाद गावाबरोबरीनेच दूरदूरच्या नातेवाईक, मित्रमंडळीनाही पोहोचविला जातो. वर्षभरासाठी आशीर्वाद म्हणून राखून ठेवला जातो.

गोव्यात वर्षभर ठिकठिकाणी जत्रोत्सव उत्साहात संपन्न होतात. अंत्रुज महालातील मडकई व बोरीच्या नवदुर्गेच्या जत्रांद्वारे गोव्यातील जत्रांच्या मौसमाला प्रारंभ होतो. त्यानंतर गावोगावी जत्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचतो. आता काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनश्च नव्या जोमाने जत्रांना सुरुवात झालेली आहे. या सर्व जत्रांना इतिहास, संस्कृती आहे. त्याची ओळख नव्या पिढीला नाही. आजही गावागावांत जत्रा होतात. तुडुंब गर्दी असते. मात्र वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या जत्रेतला निखळ, निरागस आनंद कोठेतरी हरवलेला आहे असेच वाटते. गावातील छोट्या-मोठ्या मंदिरांतून जत्रेला कालो, दशावतारी नाटके व्हायची. पाहुणे मंडळी, लग्न करून सासरी गेलेल्या मुली, मुलं, मित्रमंडळी यांनी घरे अगदी उत्साहाने ऊतू जात असत. हिवाळ्यात वायंगणी शेती केली जात असे. जत्रा सुरू होण्यापूर्वी भात पिकून तयार झालेले असायचे. घरात धनधान्यरूपी आलेली सुबत्ता तृप्तता द्यायची. त्यातूनच जत्रेत गावठी सुरय तांदळाच्या पिठापासून तयार केलेली सान्ना, शिरवळयो, फुगीचे पोळे हे खास जत्रेसाठी येणार्‍या पाहुण्यांसाठी आकर्षण होते. माहेरवाशीण मुलींना मंदिरात जाऊन ओटी भरण्याची घाई, तर लहान मुलांना जत्रेतील खेळण्यांचे, मुलींना रिबिनी, नेलपॉलिशचे आकर्षण ठरलेलेच होते. घरातील महिलावर्ग रांधणे-वाढणे यातच व्यस्त असायचा. मुले खेळण्यात, तर तरुणाई मंदिरात जाण्याच्या घाईत असायची. बर्‍याच घरांत मुलं जेव्हा जत्रेला जाण्यासाठी तयार व्हायची तेव्हा घरातील मोठी, त्यातही वडील, आजोबा, काका, मामा, मुलांना रांगेत ठेवून चार आणे, आठ आणे, एक रुपया हातावर टेकवायचे. वयाप्रमाणे पैशांची विभागणी केली जायची. त्यामुळे साहजिकच लहानग्यांना कमी पैसे. एका रुपयाची कागदाची नोट ज्यांना दिली जायची ते गर्भश्रीमंत असायचे. हे पैसे फक्त जत्रेत चैन करण्यासाठी दिलेले असायचे. छोट्या-छोट्या गोष्टी खरेदी करण्यातला तो आनंद मोठा होता. आयाबहिणींच्या कडेवरील मुलांचा खेळण्यासाठीचा हट्ट, तर लाली, रिबिनी, टिकली, लिखा, बांगड्या, कानातल्यांची खरेदी करण्यात मुली दंग! पिल्लुक, खेळणी, बॅटबॉल, चावी असलेल्या- बॅटरीवर चालणार्‍या गाड्या, पिस्तुल विकत घेण्याचे मुलांचे कार्यक्षेत्र, तर भातुकली, साखरेची गुलाबी रंगाची बाहुली, इतर छोट्या-मोठ्या बाहुल्या घेण्यासाठी मुली पुढे असायच्या. घरी आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी खाजे खरेदी केले जायचे.
मला माझ्या लहानपणीचे जत्रेचे दिवस अजूनही आठवतात. तिन्हीसांजेला एखादी साधीसुधी चादर घेऊन मी, संजू आणि वाड्यावरील काही मैत्रिणी मिळून देवळाकडे जायचो. मध्यरात्र उलटल्यानंतर दशावतारी नाटक व्हायचे. त्यासाठी जागा आरक्षित करायला म्हणून आम्ही जरा लवकरच जात असू. आमच्याप्रमाणेच इतर वाड्यांवरील मुले जागा अडविण्यासाठी यायची. मंदिरात प्रवेश करताक्षणी डाव्या बाजूला असलेला खांब ही आमची खास ठरलेली जागा. त्यात बदल झाला नाही. एकदा का चादर अंथरून जागा अडवून झाली की मग मंदिर परिसरात फिरायला आम्ही मोकळ्या होतो. पहिल्यांदा मोर्चा वळायचा तो नानाच्या चहाच्या हॉटेलसमोर बसलेल्या तळकर काकांच्या खेळण्याच्या दुकानाकडे! तळकर काका आणि दादा यांची जुनी दोस्ती. त्यामुळे त्यांच्याकडे आमची उदारी चालायची. त्यानंतर मग मागच्या बाजूने नानाच्या हॉटेलमध्ये जाऊन गरमागरम चहा, भजी असा खास बेत. आमच्या घरी दूध आणि वर्तमानपत्रे पोहोचविण्यासाठी नाना स्वतः यायचे. शिवाय दादांचा आणि त्यांचा पेहराव एकच होता- सफेद शर्ट, लेहंगा. दोघांची खूप जुनी मैत्री आणि त्यांनी ती तेवढ्याच जिव्हाळ्याने शेवटपर्यंत टिकवूनही ठेवली होती. त्यामुळे आम्ही जरी हॉटेलच्या आसपास दिसलो तरी आग्रह करून चहा, भजी, बटाट्याची बेसन पिठात तळलेली कापे नाना द्यायचे. मागच्या बाजूने भजी, खाजे तळण्याचे काम सुरू असायचे. हवेतील गारठा आणि गरमागरम भज्यांसोबत वाफाळलेला चहा याची लज्जत न्यारीच! हॉटेलच्या मागच्या बाजूला लागूनच धर्मशाळा होती. तिथेच दशावतारी पार्टी वेशभूषा, रंगभूषा करण्यात मग्न असत. तीन दगड रचून त्यावर एखादा पार्टी सर्वांसाठी जेवण रांधायचा. नाटकात राजाची भूमिका करणारा पार्टी दाढी, मिशी मेकअप करून अर्ध्या चड्डीत बसलेला दृष्टीस पडे. परंतु हीच माणसं जेव्हा प्रत्यक्षात भूमिकेत शिरत तेव्हा त्यांच्याविषयी मनात श्रद्धाभाव दाटून येत असे.

हळूहळू मंदिरात गर्दी व्हायची. आम्ही जागा अडवून ठेवलेली त्यावर थोडेसे आजूबाजूचे अतिक्रमण व्हायचे. पण आम्ही नाटक सुरू होईपर्यंत झोपून द्यायचो. एव्हाना मंदिर लोकांनी गजबजून उठायचे. आई, बाय कधी येऊन बसायची ते कळतही नसे. त्या तशा गोंगाटात एवढी गाढ झोप लागायची की नाटक सुरू झाले तरी जाग येत नसे. गडबडून जाग यायची ती मात्र राक्षसाच्या गडगडाटी हास्याने, नाहीतर मग लढाईच्या आवाजाने. राक्षसाची एन्ट्री झाली रे झाली की लहानग्यांचे किंचाळणे, मोठमोठ्याने रडण्याचा आवाज, राक्षसाचे क्रौर्य… या सर्व गदारोळात डोळे बटबटीत उघडायचे. राक्षसाला राजा मारून टाकतो ते दृश्य बघताना राजाचा अभिमान वाटायचा. जीवनात चांगुलपणाने वागावे हा संस्कार नकळत मनावर बिंबायचा.

जत्रेची आम्ही मुलं आतुरतेनं वाट पाहत असू. याला कारणे वेगवेगळी होती. लहान मुलांची जत्रा म्हणजे पर्वणीच होती. दरवर्षी जत्रेला रिबिनी आणि नेलपॉलिश (लाली), केसांच्या नक्षीदार पिन्स आणि एक गुलाबी रंगाची साखरेची बाहुली ही खरेदी दहावीत पोहोचेपर्यंत कधी चुकली नाही. पांढर्‍या, लाल, हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या रिबीनी. त्यांवर कोणतीच नक्षी नसायची. केस जाड आणि लांब होते. दोन्ही बाजूला दोन वेण्या कानामागून वर बांधून त्यावर केसांच्या टोकाला बांधलेल्या रिबिनीचे फूल तयार केले की वेणी खूप सुंदर दिसायची. मी दहावीत पोहोचेपर्यंत रिबिणींच्या रंग-रूप-आकारात बराच फरक झाला. पातळ कपड्याच्या जराशा रुंद, दोन्ही बाजूंनी बिडिंग केलेल्या आणि वरती वेली-फुलांची कलाकृती असलेल्या
आधुनिक रिबिणी बाजारात आल्या. त्या थोड्या महाग होत्या तरीही जत्रेत कोणी ना कोणी घेऊन द्यायचेच.

आज इतक्या वर्षांनी जेव्हा मी जत्राकडे बघते तेव्हा विचार येतो की सभोवताल किती वेगाने बदलला आहे! जत्रेतील नावीन्य, लोकमनाचा उत्साह, चालीरीती, धार्मिक भावना या सर्वांच्या अनुषंगाने विविध ठिकाणच्या जत्रा. त्यांचे खास वैशिष्ट्यही लक्षात येते. जसे की रेड्यांची जत्रा, कावळ्यांची जत्रा, गड्यांची जत्रा, टक्यांची जत्रा, मालनी पुनवेची जत्रा, पेठेची जत्रा, माशांची जत्रा, आजोबाची जत्रा, बोडगिणीची जत्रा, जायाची जत्रा, पेठेची जत्रा… अशा कितीतरी जत्रा गोमंतकीय लोकमनाच्या उत्सवप्रिय जीवनाची जाणीव करून देतात. जत्रोत्सवातील अभूतपूर्व उत्साहाची पर्वणी आणि सर्व लहानमोठ्या जत्रोत्सवांवर कळस म्हणजे शिरगावच्या लइराईची जत्रा. वैशाख शुक्ल पंचमी हा लइराईचा जत्रोत्सवाचा दिवस. भात पिकांची सुबत्ता घरात आलेली असता ही जत्रा येते. लहान-मोठ्या जत्रा सर्वत्र होतात. त्या जत्रांना गर्दी असली तरी बर्‍याच ठिकाणी जातीभेद पाळले जातात; मात्र लईराइच्या जत्रेत या सर्व मर्यादा, भेदाभेद गळून पडतात. ही जत्रा सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत उदाहरण बनून समोर येते. रसरशीत इंगळ्यांवरून अनवाणी पायांनी चालून, धावून स्वतःच्या निराहार व्रतस्थपणाचा पुरावा देत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच सहभागी होत श्रद्धाभक्तीचा उत्कट आविष्कार प्रगट करतात. शिरगावची लईराई आणि म्हापशाची अवर लेडी ऑफ मिलाग्रीस यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. मीराबाई म्हणजे मिलाग्रीसच्या फेस्ताच्या दिवशी शिरगावहून अबोलीचे गजरे पाठविले जायचे, तर लइराईच्या जत्रेला मोगरीच्या कळ्याच्या माळा पाठविल्या जायच्या. लइराईला मोगर्‍या कळ्यांचे भारी वेड. ही धोंडांची जत्रा. देवीचे हे भक्तगण निखार्‍यावरून चालताना गळ्यात मोगरी कळ्यांची माळा परिधान केल्याशिवाय इंगळ्यावरून धावणार नाहीत. देवीवरील अफाट श्रद्धेपोटीच लोकसमूह भारावलेल्या अवस्थेत निखार्‍यांवरून धावतात.

पण लोकमानसांचा जत्रेतील अभूतपूर्व उत्साहपूर्ण सहभाग आज कोठेतरी कमी-कमी होताना दिसत आहे. बर्‍याच जत्रांना तुडुंब गर्दी असते पण ते पूर्वीचे निरागस जिवंतपण हरवलेले आहे. जमिनीवर जमखाण पसरून ओळीने शिस्तबद्धतेने मांडून ठेवलेली ती खेळणी, प्रादेशिक, पारंपरिक खेळणी तयार करून विकणारे व्यावसायिक आज कालबाह्य झाले आहेत. मॉल संस्कृती, सुपर मार्केट, ऑनलाईन खरेदी इत्यादींचा सुकाळ झाल्याने वस्तू विकत घेण्यासाठी जत्रेच्या फेरीतील दुकानांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही. मुलांची खेळणी डिजिटल झालेली आहेत. रिबिणी पूर्णपणे विस्मृतीत गेलेल्या असून जत्रेच्या निमित्ताने मुलांच्या हातांवर चार-आठाणे जिव्हाळ्याने ठेवणारे नातेवाईकही आता दिसत नाहीत. मुलांनाही आता त्यांच्या स्वतःच्या पॉकेटमनीची सवय झालेली आहे. खूप मित्रमंडळी आलीच तर जेवणं बाहेरून मागविली जाण्याची सोय आहेच! चाकरमानी ग्रामदैवताच्या पाया पडण्यासाठी गावी आला तर मुलांच्या अनेक सबबी सोबत घेऊन येतो. आज खूप काही बदललेलं आहे. बरंच काही हरवलं आहे. जत्रेतील नितळनिखळ आनंद बराच मागे मागे पडला आहे. त्यावेळी लोकांच्या हातात, खिशात पैसे नव्हते, पण नजरेत माया होती. खेळण्यासाठी एखादं गरिबाघरचे मूल हट्ट धरायचं तेव्हा कोणतीच अपेक्षा न धरता खेळणीवाला काका त्याला एखादा फुगा, पिल्लुक, छोटी चिमणी देऊन त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलवायचा. दोन कोंबड्याचे खेळणे वाजवून दाखवायचा. आर्थिक उलाढालीसाठी नव्हे तर आनंद-समाधान यांची देवाणघेवाण करण्यासाठी जत्रा होत्या. जत्रा संपताच घरे उदास होत. दशावतारी नाटक शेवटच्या टप्प्यात यायचे तेव्हा स्त्री वेषातील पुरुष पात्र- ‘बिलिमारो’- प्रेक्षकांमधून आरतीची थाळी फिरवत असे. लोक भक्तिभावाने आपल्या कुवतीनुसार त्याच्यात पैसे टाकायचे. पहाटे पहाटे राजा-राक्षसामध्ये घनघोर युद्ध व्हायचे. कोणीच नमते घेत नसे. झंज-पखवाजवादन वेग घ्यायचे. शेवटी लढाईत सत्याचा विजय ठरलेलाच! नाटक संपते… लोक पांगतात. दुकाने आवरून घेण्याची तयारी करतात. गजबजलेला परिसर शांत-शांत व्हायचा… आजच्या जत्रांमधून हीच नितळ शांतता, निखळ आनंदाची देवाण-घेवाण हरवलेली आहे.