गोव्यातला दसरोत्सव

0
142

– राजेंद्र पां. केरकर

शस्त्रोत्सवानंतर येणारी आश्‍विनातली दशमी भारतातल्या अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातही विजयादशमी म्हणून साजरी केली जाते. परंतु गोव्यात आणि काही अंशी कोकणात संपन्न होणारा दसर्‍यातला तरंगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असाच असतो.

दसर्‍यासारख्या सणउत्सवातून ऊर्जा मिळवायची आणि पुन्हा नव्याने येणार्‍या आव्हानांना निर्भीडपणे भिडायचे ही आपल्या समाजाची धारणा होती. कृषी संस्कृती आणि त्यावरती आधारलेल्या लोकधर्मातून समाजाला एकेकाळी जगण्याची ऊर्मी लाभली होती त्याचे दर्शन अशा उत्सवातून होण्याची नितांत गरज आहे.

भाद्रपद हा पुष्पमंडित महिना समारोपाच्या क्षणी पोहचला की गोव्यातल्या लोकमानसाला दसर्‍याचे वेध लागतात. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा!’ या म्हणीचा प्रत्यय पूर्वीच्या काळी गोव्यातल्या खेडोपाडी ज्या ठिकाणी लढवय्ये आहेत तेथे आल्याशिवाय राहत नसे. दसरा सण नवरात्रोत्सवानंतर येत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. आश्‍विन महिन्यात शरद ऋतूस प्रारंभ होत असून, पर्जन्यवृष्टी मौसमाच्या चक्रानुसार क्षीण होत असल्याने पूर्वीच्या काळी लढाईच्या, युद्धाच्या मोहिमांना दसरा सणात किंवा खंडे नवमीला शस्त्रपूजन करून सुरवात व्हायची. नदीनाले तुडुंब पाण्याने भरलेले असल्याने या काळात युद्ध लढणे कठीण म्हणूनच आश्‍विन महिन्यातल्या आल्हाददायक वातावरणात दसरोत्सव साजरा करून इथला भूमिपुत्र नव्या जोशाने जीवनास सामोरा व्हायचा. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीच्या रूपांत ज्या शक्तीच्या नवरूपांची इथल्या नवरात्रीत पूजा केली जातोे त्या देवीची नानाविविध रूपे विशेषतः मखरात सुरेखरीत्या सजवून झुलविले जातात. गोव्यातल्या अंत्रुज महालातील कवळेच्या शांतादुर्गेची, म्हार्दोळच्या म्हाळसेची, बांदिवडेच्या महालक्ष्मीची उत्सवमूर्ती नाना विविध वाहनांवर आरूढ करून हे मखर उत्साहाने झुलविले जाते. ढोल, तासो, कासाळे यांच्या निनादात माशेल येथील देवकीकृष्णाचे झुलवले जाणारे मखर पाहणे हा भाविकांना अपूर्व असा सोहळा असतो.

शस्त्रोत्सवानंतर येणारी आश्‍विनातली दशमी भारतातल्या अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातही विजयादशमी म्हणून साजरी केली जाते. परंतु गोव्यात आणि काही अंशी कोकणात संपन्न होणारा दसर्‍यातला तरंगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असाच असतो. रवळनाथ, भूतनाथ, सातेरी, पावणाई, भूमिका, नवदुर्गा आदी देवतांची गर्भकुडीत जी तरंगे ठेवलेली असतात त्या तरंगांना वेष आणि अलंकारांनी अलंकृत करून महानवमीच्या रात्री त्यांची मिरवणूक सुरू होते. या तरंगांना घेऊन गावकरी दसर्‍या दिवशी सीमोल्लंघन करून आपल्या भौगोलिक सीमेची पाहणी करून आपल्या अस्मितेचे दर्शन घडवतात. दक्षिण गोव्यातला चंद्रनाथ पर्वतावरचा दसरा विशेष प्रसिद्ध असून त्या दिवशी चंद्रशेखर, भूतनाथाची तरंगे, पालखी आदी लव्याजम्यासह पर्वताच्या पायथ्याखाली येतात आणि भाविक संचार लागल्यासारखा आपल्या दैवतांचे मनःपूर्वक स्वागत करतात.
नेत्रावळी अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या वेर्ले गावात रामनाथ, चंद्रेश्‍वर, भूतनाथाची मंदिरे असून पर्वतावरच्या दसर्‍याची पुनरावृत्ती होत असते. गोव्यात दसरोत्सवात संपन्न होणारा तरंगोत्सव हे खरं तर पुरुष आणि प्रकृतीच्या मीलनाचा सोहळा असून, रवळनाथ-पावणाई माउली यांच्या तरंगांच्या मीलनाला ‘‘मेळामेळ’’ म्हणजे शिवलग्न म्हटले जाते. या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटली जातात. आज तलवारी, बंदुका यांच्या साहाय्याने लढली जाणारी युद्धे इतिहासजमा झालेली असली तरी जुन्या इतिहासाची स्मृती दसर्‍याला जागवली जाते.

दिवाडी बेटावर ऑगस्टमध्ये संपन्न होणार्‍या ख्रिस्ती समाजाच्या ‘बोंदेराच्या फेस्तामध्ये’’ होणारे सीमोल्लंघन दसर्‍याच्याच सीमोल्लंघनाची स्मृती जागवते. धर्म बदलला तरी संस्कृती कायम राहते याची बोंदेराच्या फेस्तमधून प्रचिती येते. धनगर जमातीचा दसरा अनुभवण्यासाठी डोंगर परिसरात जाणे गरजेचे आहे. गोव्याच्या दसर्‍यातून गतवैभवाच्या खाणाखुणांचे विलोभनीय दर्शन घडते.

आश्‍विन महिन्यात मान्सूनच्या पावसाचा जोर कमी व्हायचा आणि शरद ऋतूचे आगमन व्हायचे. निसर्गात आल्हादपणा असायचा. पूर्वीच्या काळी मान्सूनच्या पावसाळ्याचा कालखंड म्हणजे शेतीकामाचा. त्यामुळे त्या काळात युद्धावर असणारे सैनिक गावी यायचे आणि त्यांचे हातपाय मातीत राबण्यासाठी सिद्ध व्हायचे. भाद्रपदात भाताच्या रोपावर कणसे लोंबतात. ही कणसे कापून पहिल्यांदा गावातल्या ग्रामदेवतांना ‘नव्याच्या’ उत्सवात अर्पण केली जातात. नवरात्रातल्या पहिल्या दिवशी नऊ प्रकारांच्या धान्यांचे दाणे मंदिराच्या गर्भगृहात माती अंथरून पेरले जातात ते घट प्रतिष्ठापना करूनच धरित्रीला स्त्री रूपात पाहून, तिच्या सृजनत्वाला आदर सन्मान प्रदान केला जातो. घटस्थापनेला पुजला जाणारा कुंभ स्त्रीच्या म्हणजे मातेच्या गर्भाचे प्रतीक मानला जातो आणि नऊ रात्रीला त्याचे पूजन भक्तिभावाने करून मातृदेवतेचा आशीर्वाद मस्तकी धारण करून नव्या आव्हानाला पेलण्यास लोकमानस तयार व्हायचे. पावसाळ्यात सहसा युद्धाच्या मोहिमा राबवल्या जात नसत. शेतीकाम त्याचप्रमाणे युद्धाऐवजी घरातल्या कामांना पावसाळ्यात प्राधान्य दिले जात असल्याने सैनिकांच्या अंगी काही अंशी आलेला शिथिलपणा नवरात्रातली देवीची विविध रूपे पाहून गायब व्हायचा. विजयादशमीला घरात अडगळीस ठेवलेली शस्त्रास्त्रे विधियुक्त पुजून, युद्धाच्या मोहिमांसाठी वापरण्यास लोकमानस तयार व्हायचे. त्याचमुळे शिमग्यात सीमोल्लंघनाच्या विधीला महत्त्व प्रदान केले जायचे.

नवरात्रातली महानवमीची रात्र जागराच्या दृष्टीने महत्त्वाची असते. गोव्यात नवरात्री ते महानवमीपर्यंत देवीच्या उत्सवमूर्तीला सजवलेल्या मखरात बसवून झुल्यावरती झुलवले जाते. हा झुल्यावरती आसनस्थ केलेल्या देवीच्या झुलवण्याचा परमोच्च बिंदू नवरात्रातल्या नवव्या रात्री म्हणजे महानवमीला गाठला जातो.

दुसर्‍या दिवशी येणारी विजयादशमी त्यासाठी आपल्या कष्टकरी पूर्वजांनी महत्त्वाची मानलेली आहे. पेडणेत दसर्‍याचा एकंदर उत्सव तेथील ग्रामदेवी भगवती, रवळनाथ आणि भूतनाथ यांच्याशी निगडित आहे. पेडणेत भगवती आणि रवळनाथ यांची पूर्वापार मंदिरे असून भूतनाथाच्या स्थळी जुन्या मंदिराचे भग्नावशेष आहेत. इथल्या लोकमानसानुसार हे भग्नावशेष पांडवकालीन मंदिराचे असून आज या मंदिराची उभारणी करायची असेल तर ते ‘एका रातीनं एका वातीनं’ केली पाहिजे. त्यामुळे दरवर्षी शारदीय चंद्रकलेत संपन्न होणार्‍या इथल्या दसर्‍याच्या उत्सवात भूतनाथाला पुढच्या वर्षीचा दसरा येण्यापूर्वी मंदिराची उभारणी करणार असे आश्‍वासन दिले जाते. पेडणे शहर आणि इथल्या बर्‍याच गावी विजयादशमीचा उत्सव तरंगामेळांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक, माउली, भूमिका, भगवती यांच्या रूपातल्या स्त्री तत्त्वाची रवळनाथरूपी पुरुष तत्त्वातल्या तरंगाशी मेळामेळ संपन्न होते.

गोवाभर दसर्‍याचा उत्सव जेथे जेथे संपन्न होतो तेथे तेथे पारंपरिक विधींना महत्त्व प्रदान केलेले अधोरेखित होते. गोवा-कोकणातला समाज एकेकाळी देवभोळा आणि पापभीरू होता. देवीची उत्सवमूर्ती आणि त्यांची प्रतीकात्मक रूपे असणार्‍या तरंगांना लोकधर्माने म्हणूनच आदराचे, भक्तीचे स्थान दिले होते. दसर्‍यासारख्या सणउत्सवातून ऊर्जा मिळवायची आणि पुन्हा नव्याने येणार्‍या आव्हानांना निर्भीडपणे भिडायचे ही आपल्या समाजाची धारणा होती. कृषी संस्कृती आणि त्यावरती आधारलेल्या लोकधर्मातून समाजाला एकेकाळी जगण्याची ऊर्मी लाभली होती त्याचे दर्शन अशा उत्सवातून होण्याची नितांत गरज आहे.