गोव्याच्या पर्यटनाची ‘दिशा’ आणि ‘दशा’

0
14
  • गुरुदास सावळ

खाण लिजांचा लिलाव झालेला असला तरी विविध परवाने मिळविण्यासाठी अजून बराच वेळ लागणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हाच खरा व महत्त्वाचा व्यवसाय राहणार आहे. मात्र सोनेरी अंडी देणारी ही कोंबडी मारली जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पर्यटन व्यवसायामुळे मादक पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय… आदी अनिष्ट गोष्टी गोव्यात वाढणार हे निश्चित आहे. त्यांना आळा घालण्यासाठी गोवा सरकार आणि गोवा पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे.

सतरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यासारख्या छोट्या राज्यावर ‘कोरोना’चे सतत सावट असताना गेल्या वर्षी देशी व विदेशी मिळून सुमारे 52 लाख पर्यटकांनी गोव्यात येऊन ‘जीवाचा गोवा’ केला. कोरोना काळातही बहुतेक सर्व राज्यांत पर्यटकांवर निर्बंध असताना गोवा सरकारने आपले दरवाजे सर्वप्रकारच्या पर्यटकांना खुले ठेवले होते. त्यामुळे बऱ्याच वाहिन्यांनीही गोव्यात येऊन मालिकांचे चित्रीकरण सुरू ठेवले होते. देशभरातील अनेक पर्यटनस्थळे सुरक्षित नव्हती, त्यामुळे सर्व देशी पर्यटकांचा लोंढा आपोआप गोव्याकडे ओढला गेला. ‘भिवपाची गरज ना’ हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सल्ला तुम्ही-आम्ही सगळ्या गोमंतकीयांबरोबरच देशभरातील लोकांनीही गंभीरपणे घेतला आणि गोव्याकडे आपला मोर्चा वळवला. गोव्याच्या सुदैवाने या काळात कोणतीही मोठी अनिष्ट घटना घडली नाही व ‘भिवपाची गरज ना’ हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सल्ला खरा ठरला. दरम्यानच्या काळात गोवा सरकारची अर्थव्यवस्था साफ कोसळली होती, त्यामुळे धोका पत्करून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटकांबाबत मवाळ भूमिका घेतली व ती यशस्वीही झाली. या काळात गोव्यात तब्बल 52 लाख पर्यटकांचे पाय लागले. सततचे निर्बंध व लॉकडाऊन यांमुळे खिळखिळी झालेली गोव्याची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभार लागला.

पर्यटन व्यवसायाने गोव्याच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लावला आहे. गोवामुक्तीपूर्वी येथे खाणव्यवसाय चालू झाला होता. डझनभर धनिकांनी या व्यवसायात जम बसविला होता. मुक्तीनंतर खाण व्यवसाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला. पोर्तुगीज राजवटीखाली सुमारे 450 वर्षे काढलेल्या गोव्यातील शांत निळसर समुद्रकिनारे व हिरवीगार चादर पांघरलेले डोंगर, ही निसर्गाची किमया पाहण्यासाठी भारतीय पर्यटक गोव्यात येऊ लागले. या पर्यटकांच्या स्वागतासाठी ताज उद्योगाने गोव्यात पहिले पंचतारांकित हॉटेल उभारले. त्यानंतर गेल्या 60 वर्षांत काणकोणपासून तेरेखोलपर्यंत एवढी हॉटेलस्‌‍ उभी राहिली आहेत की त्यांची मोजदाद करणेही शक्य होत नाही.

गोवा मुक्त होण्यापूर्वी भारतीय पर्यटक भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये फिरायला जायचे आणि काश्मिरी लोकांनी भारतीयांना घातलेल्या शिव्या मुकाटपणे ऐकून, तेथील सफरचंदे खरेदी करून घरी परतायचे. 1973 मध्ये चौगुले महाविद्यालयातून आम्ही काश्मीरमध्ये गेलो होतो त्यावेळी भारतीयांना घातलेल्या शिव्या ऐकण्याची आपत्ती आमच्यावर आली. गोमंतकीय हे पोर्तुगीज असल्याने ते चांगले लोक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. गोव्यात ख्रिश्चन धर्मीय लोक मोठ्या संख्येने आहेत असा त्यांचा समज होता. गोवा मुक्त झाल्यावर भारतीय पर्यटकांचे लोंढे गोव्यात येऊ लागले. त्यांना आरामशीरपणे राहता यावे म्हणून सरकारने कोलवा, मडगाव, पणजी, म्हापसा व कळंगुट आदी ठिकाणी टुरिस्ट हॉस्टेलं बांधली. स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री व प्रतापसिंह राणे सभापती असताना विश्वजित राणे यांना गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नेमण्यात आले. त्यांनी पणजीतील या हॉस्टेलाचे नूतनीकरण करून ‘पणजी रेसिडन्सी’ असे नामकरण केले. सर्वसामान्य पर्यटकांना आता या रेसिडन्सी परवडत नाहीत.

1970 च्या दशकात युरोपमधील हिप्पी लोक गोव्यात पोचले. ड्रगची धुंदी व अर्धनग्न अवस्थेत आपल्या प्रियकरासोबत नीरव शांततेत हणजूण, बागा आदी समुद्रकिनारी पडून राहणाऱ्या या हिप्पींना बघण्यासाठी देशी पर्यटक समुद्रकिनारी भटकायचे. ‘हरे राम हरे कृष्णा’ हा सिनेमा याच हिप्पी संस्कृतीवर आधारित होता. या हिप्पींनी गोव्याचे नाव जगभर नेले आणि जगभरातील हिप्पी गोव्यात पोचले. या हिप्पींकडून लोकांना डॉलर्स मिळू लागले आणि समुद्रकिनारी छोटे-मोठे शॅक्स उभे राहिले. आज काणकोणातील पाळोले ते पेडणे तालुक्यातील तेरेखोलपर्यंत तीन पंच तसेच सप्ततारांकित हॉटेलांच्या रांगा लागल्या आहेत. दरवर्षी पर्यटकांचा आकडा वाढत गेला आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मादक पदार्थ, नाईट क्लब व कॅसिनोची निर्मिती झाली. गोव्यात येणारे पर्यटक अधिकाधिक खूश राहावेत म्हणून ते मागतील त्या सर्व गोष्टी पुरविणाऱ्या टोळ्या गोव्यात तयार झाल्या. या टोळ्यांमुळे टोळी युद्धे सुरू झाली. खून पडू लागले. बिगर गोमंतकीय सराईत गुन्हेगारांबरोबरच स्थानिक लोकही या टोळ्यांत सहभागी होत असतात.

2012 साली गोव्यातील खाण व्यवसाय बंद झाला. या व्यवसायावर अवलंबून असलेले लाखो लोक व त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. लीजधारकांनी आपला बाडबिस्तरा विदेशात हलवून तेथे नव्याने आपला संसार थाटला. खाण व्यवसाय बंद पडल्याने ‘हॉटेल व्यवसाय’ हा एकमेव पर्यायी व्यवसाय ठरला. सुरुवातीच्या काळात पर्यटन व्यवसाय हा हंगामी व्यवसाय असायचा. पावसाच्या दिवसांत गोव्यात पर्यटक येत नव्हते, त्यामुळे या मौसमात पर्यटनविषयक व्यवहार बंद असायचे. मे महिन्याच्या अखेरीस बहुतेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जायचे. पावसाळा संपला की परत कामांवर घेतले जायचे. आता वर्षभर पर्यटक गोव्यात येत असतात. ़पूर्वी केवळ समुद्रकिनारी पर्यटन चालायचे, आता सत्तरीच्या डोंगरावरही पर्यटक जातात. पर्यटन व्यवसाय केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरता मर्यादित राहू नये म्हणून सरकारने सुरू केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. फोंडा तालुक्यातील अनेक कुळागरे आता पर्यटन केंद्रे बनली आहेत. माजी मंत्री सौ. निर्मला सावंत यांच्या कुळागराला रशियन पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यासाठी सौ. सावंत रशियन भाषा शिकल्या आहेत. गोव्यात येणारे देशी-विदेशी पर्यटक पूर्वी जुने गोव्यातील भव्य चर्चीस पाहुन परत जायचे, आता डोंगरातील सगळ्या मंदिरांना आवर्जून भेट देतात. गोव्यात येणारा प्रत्येक देशी पर्यटक संध्याकाळी मांडवी नदीतील जलसफरीचा आनंद लुटतो. अरबी समुद्रातील नितळ पाण्यात असंख्य पर्यटक जलक्रीडा करतात. पर्यटकांना गोव्यात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे सर्वसामान्य गोमंतकीयांना माहीतच नाही.

हिप्पींनी गोव्यात आणलेले ड्रग्स आता बहुतेक गाड्यांवर अगदी सहजपणे मिळतात. गेल्या 50 वर्षांत गोवाभर ड्रग्सचे प्रमाण एवढे वाढले आहे की पर्यटकांना मादक पदार्थ विकण्याच्या नादात किनारपट्टी भागातील असंख्य तरुण बरबाद झाले आहेत. ही समस्या अत्यंत गंभीर असूनही पोलीस किंवा इतर यंत्रणा हा प्रश्न गंभीरपणे घेत नाहीत. मादक पदार्थांच्या अतिसेवनामुळे एखाद्याचा बळी गेला की दोन दिवस धावपळ होते, त्यानंतर सर्वत्र सामसूम होते. एका अभिनेत्रीचा बळी गेल्यानंतर या आघाडीवर थोडी कारवाई झाली, पण आता सर्व आघाड्यांवर शांतता आहे. ‘सनबर्न’सारख्या संगीत महोत्सवात ड्रग्सचे व्यवहार होत नाहीत असा दावा आयोजक करतात आणि आमची पोलीस यंत्रणा त्यावर अंधपणे विश्वास ठेवतात. ‘कोरोना’ची भीती असतानाही गेल्या वर्षी ‘सनबर्न’ला परवानगी मिळालीच!
मसाजच्या नावाखाली गोवाभर वेश्याव्यवसाय चालतो हे कटू सत्य जगभरच्या पर्यटकांना माहीत आहे. महिलेने पुरुषास आणि पुरुषाने महिलेस मसाज करण्यास कायद्याने बंदी आहे. गोव्यात मात्र हा कायदा असल्याचे मसाजचालकांना माहीत नाही. त्यामुळे नेमका विरोधी प्रकार सर्रासपणे चालतो आहे. गोव्यातील नाईट क्लबबद्दल तर न बोललेलेच बरे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो व त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी जोसेफ सिक्वेरा यांच्यामध्ये जेव्हा राजकीय वादळ निर्माण होते तेव्हा नाईट क्लबमधील गैरप्रकार उघडकीस येतात. पोलिसांनाही मग जाग येते. छापे पडतात. काही दिवस हे क्लब बंद पडतात. मग पुन्हा येरे माझ्या मागल्या! गोव्यातील काही राजकीय नेत्यांनी नाईट क्लब चालू केल्याची चर्चा चालू आहे. त्यामुळे या क्लबांविरुद्ध कारवाई करण्यास पोलीस घाबरतात.

गोव्यात जुगारी प्रवृत्ती असलेल्या पर्यटकांना आपली हौस भागविता यावी म्हणून कॅसिनो चालू करण्याची दुर्बुद्धी काही राजकारण्यांना झाली. कॅसिनो चालू करण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला याबद्दल मतभेद आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कॅसिनोना कडाडून विरोध केला होता. कॅसिनोविरोधात आंदोलनही केले होते. मांडवी नदीतून कॅसिनो हटविण्याची घोषणा तर बाबुशनेही केली होती. मात्र हे कॅसिनो हटविणे बाजूलाच राहिले; दरवर्षी त्यात भर पडत गेली. आता एका कॅसिनोबदली नवा महाकाय कॅसिनो आणण्यात येणार आहे. सात मजली इमारतीच्या आकाराचे हे भव्य जहाज मांडवी नदीत आणण्यास सगळ्यांचाच विरोध आहे, पण ते अडविण्याचे धाडस कोणीच करणार नाही. कॅसिनोंवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असे सांगितले जाते, पण दरवर्षी मुदतवाढ देण्यापलीकडे काहीच घडत नाही.

मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोबरोबर बहुतेक सर्व बड्या हॉटेलांमध्ये कॅसिनो चालतात. मोपा विमानतळ परिसरात कॅसिनोंचे मोठे जाळेच जोडले जाणार आहे. हा कॅसिनो प्रकल्प पूर्ण झाला की गोवा कॅसिनोची जागतिक राजधानी होणार आहे. मोपा विमानतळ परिसरात कॅसिनो नको म्हणून माजी आमदार बाबू आजगावकर यांनी आवाज उठवला तेव्हा त्यांची तिकीट काढून टाकली. विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर या कॅसिनो प्रकल्पाविरोधात आवाज काढण्याचे धाडस करणार नाहीत. मोपा समितीने कितीही विरोध केला तरी हा कॅसिनो प्रकल्प रद्द होणार नाही. कारण मूळ विमानतळ करारात त्याचा समावेश आहे. मोठ्या विमानतळावर पहिल्या 112 दिवसांत एक दशलक्ष प्रवाशांनी ये-जा केली आहे
मोपा विमानतळ सुरू झाल्यास आता केवळ तीन महिने झाले आहेत. दिवसेंदिवस नवी-नवी विमानसेवा चालू होणार आहे. एक वर्षभरात प्रवाशांची संख्या 50 लाखांवर पोचणार अशी खात्री आहे. मोपा विमानतळावरून वर्षाला 50 लाख प्रवासी आले तर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या किती वाढणार यांचा अंदाज करता येतो.

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत जात असल्याने स्पर्धा वाढत चालली आहे. पाहुणे मिळविण्यासाठी हॉटेलांमध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा चालू आहे. या संधीचा लाभ उठविण्यासाठी बोगस गाईड निर्माण झाले आहेत. ते गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांना गाठून, हॉटेल तसेच इतर सुविधा मिळवून देण्याचे आमिष दाखवून या पर्यटकांची लुबाडणूक करतात. स्वतःचे वाहन घेऊन आलेल्या पर्यटकांना वाटेत गाठून ही लुबाडणूक केली जाते. काही पर्यटकांना तर मुली पुरविण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकरणी लक्ष घालून या फसव्या गाईडविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला. सुरुवातीला पोलिसांनी चालढकल करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर कारवाई केली. ही कारवाई एक-दोन दिवस करून भागणार नाही तर अधूनमधून सतत झाली पाहिजे. काही लोकांच्या फसवेगिरीमुळे गोवा राज्याची देशभर तसेच जगभर बदनामी होत आहे. गोवा सुरक्षित नाही अशी हवा युरोपमध्ये निर्माण झाल्याने ब्रिटनमधील पर्यटक गोव्यात येणे टाळू लागले आहेत. युरोपमधील पर्यटक कमी झाल्याने आर्थिकरीत्या सधन असलेल्या रशियन पर्यटकांवर आम्हाला अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी गोवा पोलिसांना अधिक जागरूक राहावे लागेल.

खाण लिजांचा लिलाव झालेला असला तरी विविध परवाने मिळविण्यासाठी अजून बराच वेळ लागणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हाच खरा व महत्त्वाचा व्यवसाय राहणार आहे. मात्र सोनेरी अंडी देणारी ही कोंबडी मारली जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
प्रत्येक उद्योगाचे काही अनिष्ट परिणाम होत असतात. खाण व्यवसायामुळे प्रदूषण होते. त्याचप्रमाणे पर्यटन व्यवसायामुळे मादक पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय… आदी अनिष्ट गोष्टी गोव्यात वाढणार हे निश्चित आहे. त्यांना आळा घालण्यासाठी गोवा सरकार आणि गोवा पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे.