गोव्याच्या किनारपट्टीला अमली पदार्थांचा विळखा

0
432
  • बबन विनायक भगत

शांतीप्रिय, कुटुंबवत्सल व सुसंस्कृत अशा लोकांचा प्रदेश असलेल्या गोव्यातही पर्यटनामुळे अशा अनिष्ट प्रवृत्तींनी हातपाय पसरले आहेत. गेल्या २०-२५ वर्षांत राज्यातील किनारपट्टीवर अमली पदार्थ माफियांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवली असून त्यांना आता तेथून हुसकावून लावणे ही एक अत्यंत कठीण अशी गोष्ट होऊन बसली आहे.

देशी असो अथवा विदेशी पर्यटक- गोवा म्हटलं की त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते गोव्यातील सुंदर, नयनमनोहर व भुरळ घालणारे समुद्रकिनारे… पांढर्‍या वाळूने भरलेले, फेसाळणार्‍या लाटांचे, मौजमस्तीचे. आणि या किनार्‍यांची आठवण झाली की त्यांना डोहाळे लागतात गोव्यात यायचे. मग बॅगा भरल्या जातात आणि गोव्याची वाट धरली जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने गोव्यात देशी-विदेशी पर्यटक येत असतात. सध्या हा आकडा ६० ते ८० लाखांच्या आसपास असून भविष्यात तोे एक कोटीचा आकडा पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका पत्रकार परिषदेतून बोलताना राज्यातील पर्यटकांचा आकडा दीड कोटीवर जाण्याची शक्यता व्यक्त करतानाच हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असून त्यादृष्टीने राज्याची पर्यटनविषयक साधनसुविधा वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

असे म्हणतात की ज्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय बहरतो त्या ठिकाणी काही अनिष्ट, अनैतिक व बेकायदेशीर गोष्टीही मोठ्या संख्येने फोफावू लागतात. मग गोवा तरी त्याला कसा अपवाद असू शकेल?
पर्यटनस्थळी जुगार, वेश्याव्यवसाय व अमली पदार्थ व्यवहाराला ऊत येत असतो. शांतीप्रिय, कुटुंबवत्सल व सुसंस्कृत अशा लोकांचा प्रदेश असलेल्या गोव्यातही पर्यटनामुळे अशा अनिष्ट प्रवृत्तींनी हातपाय पसरले आहेत. गेल्या २०-२५ वर्षांत राज्यातील किनारपट्टीवर अमली पदार्थ माफियांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवली असून त्यांना आता तेथून हुसकावून लावणे ही एक अत्यंत कठीण अशी गोष्ट होऊन बसली आहे.

रशियन, ब्रिटिश, इस्रायली या विदेशी ड्रग माफियांनी राज्यातील किनारपट्टीवर आपले बस्तान बसवले असून संपूर्ण किनारपट्टीलाच आपला पाशवी विळखा घातला आहे. आता त्यात नायजेरियन ड्रग माफियांचीही भर पडली आहे.

जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या गोव्याला या माफियांनी ‘ड्रग हब’ बनवले असून गोव्यातून भारतातील अन्य राज्यांना तर हे माफिया अमली पदार्थ पुरवतच असतात, शिवाय येथून जगभरात अमली पदार्थांची तस्करीही करीत असतात. त्यासाठी त्यांनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या आपले जाळे विणलेले आहे. राज्यातील किनारपट्टी भागांत राहणार्‍या काही स्थानिक लोकांबरोबरच पोलिसकर्मी, स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील काही नेते आदींचेही त्यांना सहकार्य व आशीर्वाद मिळत आलेले आहेत, अशी कुणकुणही किनारपट्टी भागांत ऐकू येत असते. किनारपट्टीवर येणारे पर्यटक व अन्य छोटे-मोठे ग्राहक यांच्यापर्यंत अमली पदार्थ पोचवण्यासाठी किनारपट्टीवरील काही स्थानिक लोकांबरोबरच नेपाळी, लमाणी आदींचाही वापर केला जातो. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात पकडले जात असतात ते हेच छोटे-मोठे मासे; माफियांना मात्र अभयच मिळत आलेले आहे. आणि म्हणूनच गेल्या २५-३० वर्षांपासून हे अमली पदार्थ व्यवहार फोफावत चालले असल्याचे त्यासंबंधीची माहिती असलेले लोक सांगतात. आता तर किनारपट्टीवरील काही शॅक्समालकांनाही या व्यवहारात सामावून घेण्यात आलेले असल्याने ग्राहकांपर्यंत अमली पदार्थ पोचवणे आणखी सुलभ व सोपे झाले असल्याचे किनारपट्टीवरील लोकांचे म्हणणे आहे.

राज्यातील ड्रग माफियांमध्ये क्रमांक एकवर आहेत ते रशियन. गेल्या २०-२५ वर्षांपासून त्यांनी उत्तरेकडील किनारपट्टीवर आपले बस्तान बसवले असून मोरजी व हरमल येथून त्यांचा सगळा व्यवहार चालतो. रशियन पर्यटकांचेही गोव्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने वास्तव्य असते ते याच किनार्‍यांवर. ते टोळक्या-टोळक्यांनी राहतात. रात्र-रात्रभर त्यांचा धिंगाणा चालू असतो. ‘नाईट लाईफ’चा आनंद लुटण्यासाठी ते गोव्यात येतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्रौ दीड-दोन वाजेपर्यंत त्यांच्या मेजवान्या चालू असतात. संगीत, नाचगाणे व अमली पदार्थांचे सेवन अशा फूल पॅकेजसाठीच ते गोव्यात आलेले असतात. आता तर मोरजी-हरमल या भागांवर या रशियन लोकांनी पूर्ण कब्जा मिळवलेला असून शॅक्स, रेस्टॉरंटस् धंद्यातही ते उतरले आहेत. अर्थातच तेथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची देवाण-घेवाण होत असते. त्यांच्याच देशातील अमली पदार्थ माफियांकडून त्यांना ड्रग्ज पुरवले जातात.

ब्रिटिश माफिया
ब्रिटनमधील ड्रग माफियांनी आपले जाळे विणले आहे ते उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध व पर्यटकप्रिय अशा बागा व कांदोळी किनार्‍यांवर. त्याशिवाय हणजूण या आणखी एका मोठ्या व महत्त्वाच्या अशा किनार्‍यावरील दक्षिणेच्या बाजूनेही त्यांनी आपली पाळेमुळे पसरविली आहेत. त्यामुळे रशियन माफिया या किनार्‍यांपासून दूर राहत असून त्याबाबत त्यांच्यात समझौता असल्याचे बोलले जाते.

हणजूण-वागातोर येथे इस्रायली
उत्तर गोव्यातील हणजूण, वागातोर व शापोरा या किनारी भागांत इस्रायलींनी आपले बस्तान बसवले आहे. हे किनारे रेव्ह पार्ट्या व नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहेत. रेव्ह पार्टी ही इलेक्ट्रॉनिक म्युझिक डान्स पार्टी असते. ती रात्रभर चालते. या पार्ट्या काळोख्या बंद खोलीत होत असतात. अशा पार्टीत सहभागी होणारे लोक दारू, अमली पदार्थ आदींचे सेवन करून कर्णकर्कश संगीताच्या तालावर रात्रभर बेभान होऊन नाचत असतात. अशा पार्ट्यांचे आयोजन करणारे एका रात्रीत लाखो रुपये कमवत असतात. अशा पार्ट्यांत युवतीही सहभागी होत असतात व त्यांना ‘रेव्ह गर्ल्स’ असे संबोधण्यात येते. अशा मुलींच्या अंगावर चित्रविचित्र असे कपडे असतात.

रेव्ह पार्ट्यांचे आयोजन विनाअडथळा करता यावे यासाठी नियोजनबद्धरीत्या सगळे केले जाते. त्यासाठी स्थानिकांची मदत घेतली जाते. त्या-त्या भागातील काही राजकीय नेते अथवा पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतले जाते. पोलिसांनाही पूर्वकल्पना देऊन सेटिंग केले जाते.

उत्तरेकडचे ड्रग माफियांचे जाळे आता हळूहळू दक्षिणेच्या दिशेनेही पसरू लागले असून काणकोण तालुक्यातील किनारपट्टीवर आता ड्रग्जचे सेवन करणार्‍या पर्यटकांचे लोंढे वाढू लागले आहेत.
विदेशी ड्रग माफिया गेल्या कित्येक वर्षांपासून गोव्यात आपले बस्तान मांडून असून आपणाला येथे राहता यावे यासाठी ते वेगवेगळे गुन्हे करत असतात. या गुन्ह्यांसाठी त्यांच्यावर कोर्टात खटले दाखल करण्यात आले की त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय राज्यात राहता येते. न्यायालयीन खटले वर्षानुवर्षे चालू राहतात.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, या विदेशी ड्रग माफियांपैकी केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांना आतापर्यंत पकडण्यात आले आहे. त्यांपैकी एक म्हणजे इस्रायली नागरिक असलेला ड्रग माफिया यानीव्ह बेलाइम ऊर्फ अटाला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे २०१० साली जेव्हा अटाला याला पोलिसांनी अटक केली होती त्यापूर्वी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने गोव्यात पोलीस आणि ड्रग माफिया यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर गोवा पोलिस खात्यातील काही अधिकार्‍यांची चौकशी झाली होती व एका-दोघा अधिकार्‍यांना निलंबितही करण्यात आले होते. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ, अमली पदार्थविरोधी पोलिस विभागातील काही पोलिस पुन्हा नेऊन विकतात असा आरोप झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. हणजूण येथे किनार्‍यावर स्कार्लेट केलिंग या किशोरवयीन ब्रिटिश युवतीची हत्या झाल्यानंतर अटाला प्रकरण गाजले होते. स्कार्लेट हिला अमली पदार्थांचा ओव्हर डोस देण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर राज्यातील अमली पदार्थ व्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यानंतर अटाला याने दिलेल्या मुलाखतीने राज्यातील पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आली होती.

हल्लीच दिवंगत झालेले बॉलिवूड अभिनेते सुशांतसिंह रजपूत याची त्याच्या मृत्यूनंतर वादग्रस्त ठरलेली मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला गोव्यातून अमली पदार्थ पाठवण्यात येत असत असे उघड झाल्याने गोव्यातील अमली पदार्थ व्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याशिवाय गेल्या १५ ऑगस्ट रोजी वागातोर येथे झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी एक बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरे व सनबर्नचे सहआयोजक शैलेश शेट्टी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर तसेच गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या हा रियाला अमली पदार्थ पाठवीत असे अशी माहिती उघड झाल्याने राज्यातील अमली पदार्थांच्या उच्छादाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

एक पत्रकार या नात्याने वेळोवेळी मला काही आयपीएस अधिकारी तसेच राज्याच्या माजी पर्यटनमंत्र्यांशी अमली पदार्थप्रकरणी बोलण्याची संधी मिळाली. त्यांपैकी दोघा पर्यटनमंत्र्यांचे म्हणणे असे होते की राज्यातून अमली पदार्थांचे उच्चाटन केले तर गोव्याचे पर्यटन कोसळेल. विदेशी पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येतात ते अमली पदार्थांचे सेवन करून किनार्‍यांवर नशेत मजा करण्यासाठी, असे त्यांचे म्हणणे होते.

राज्यातील ड्रग माफियांशी पोलिसांचे साटेलोटे आहेत असा जो आरोप होत आहे तो खोटा, निराधार व दिशाभूल करणारा आहे असे एकदा अस्मादिकाशी बोलताना एक आयपीएस अधिकारी बोलला होता. तसे असते तर आम्ही छापे टाकून अमली पदार्थ जप्त केले नसते व ड्रग पॅडलरांना अटक केली नसती, असे त्यांचे म्हणणे होते.
मात्र गेल्या २५-३० वर्षांपासून राज्यात आपली पाळेमुळे घट्ट केलेल्या रशियन, ब्रिटिश, इस्रायली व नव्याने गोव्यात शिरलेल्या नायजेरियन ड्रग माफियांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश का येत नाही हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे.

दर एका निवडणुकीच्या वेळी जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातून आम्ही सत्तेवर आलो तर राज्यातून आम्ही अमली पदार्थांचे उच्चाटन करू, असे आश्‍वासन जनतेला देण्यात येत असते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कोणताही पक्ष त्याबाबत गंभीरपणे पावले उचलताना दिसत नाही हे विशेष.

राजकीय इच्छाशक्तीशिवाय गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे कसे काय उद्ध्वस्त केले जाईल, हा खरा प्रश्‍न असून त्याचे उत्तर मात्र कुणाकडेही नाही ही खरी शोकांतिका आहे.

अमली पदार्थ आणि बॉलिवूड
बॉलिवूडलाही अमली पदार्थांचा विळखा पडला असल्याचे सुशांतसिंह रजपूत याच्या मृत्यूनंतरच्या घडामोडींवरून आता स्पष्ट होऊ लागले आहे. अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणार्‍या तस्करांविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई करताना चालू आठवड्यात सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून या तस्करांचे बॉलिवूडशी कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बॉलिवूडमध्ये होणार्‍या पेज थ्री पार्ट्यांसाठी अमली पदार्थांचा पुरवठा होत असून गोव्यातील एक हॉटेल व्यावसायिक व रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक हे त्याच्या संपर्कात असल्याचे आता उघड झाले आहे.
कपिल झवेरी व अब्बास लखानी यांच्यासह सात जणांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. अभिनेत्री कंगना राणावत यांनी बॉलिवूडमधील काही आघाडीचे अभिनेते अमली पदार्थांचे सेवन करीत असून त्यांनी ड्रग्ज तपासणीसाठी रक्ताचे नमुने द्यावेत अशी मागणी केली आहे.