हीरो इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी फातोर्डा स्टेडियमवर एफसी पुणे सिटीची एफसी गोवा संघाशी लढत होत आहे. धडाकेबाज फॉर्मात असलेल्या गोव्याला रोखण्यासाठी रँको पोपोविच यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याला जोरदार प्रयत्न करावे लागतील. ही लढत जिंकण्याचा गोव्याचा निर्धार आहे.
ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. गोव्याला निर्णायक विजयासह तीन गुण मिळतील. दुसरीकडे पुणे जिंकल्यास प्रमुख संघांप्रमाणे त्यांचे १२ गुण होतील. शुक्रवारच्या लढतीपूर्वी गोवा, बेंगळुरू एफसी आणि चेन्नईन एफसी यांचे प्रत्येकी १२ गुण होते. गोव्याचे केवळ पाच सामने झाले आहेत. बंगळुरूने सात, तर चेन्नईनने सहा सामने खेळले आहेत. गोव्याने कमाल १५ पैकी १२ गुण मिळविले आहेत.
सर्जीओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा संघ गोलांचा पाऊस पाडत आहेत. या संघाने आतापर्यंत १८ गोल केले आहेत. पुण्याविरुद्ध यात भर पडण्याची अपेक्षा आहे. लॉबेरा यांच्या संघावर एकाच बाबतीत टीका झाली आहे. त्यांचा बचाव कमकुवत आहे. त्यांना एकाही सामन्यात क्लीन शीट राखता आलेली नाही. याचा अर्थ प्रत्येक सामन्यात त्यांच्याविरुद्ध किमान एक गोल झाला आहे. लॉबेरा यांना परिपूर्ण बचावात्मक खेळाचे महत्त्व ठाऊक आहे. त्यांनी सांगितले की, बचाव फळीतील संतुलन अचूक साधणे महत्त्वाचे असते. साहजिकच आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आम्ही जे काही करीत त्यात सुधारणा करावी लागेल.
स्टार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास आणि अहमद जाहौह हे दोघे उद्याचा सामना खेळण्यासाठी शंभर टक्के तंदुरुस्त असल्याची माहिती लॉबेरा यांनी दिली. पुण्याला आघाडी फळीतील बलजीत साहनी याच्या गैरहजेरीत खेळावे लागेल. बेंगळुरूविरुद्ध त्याला दोन पिवळ्या कार्डमुळे मैदान सोडावे लागले. तो निलंबीत आहे.