अशी करू या पूर्वतयारी परीक्षेची..!

0
1287
  •  प्रा. रमेश सप्रे

अभ्यासाचा सराव करत राहिल्यावर परीक्षेचा बागुलबुवा मनातून जातो. परीक्षा एका बुजगावण्यासारखी वाटू लागते. ‘परीक्षेचं भय’ बर्‍याच प्रमाणात कमी होतं. अभ्यास मात्र पद्धतशीर केला पाहिजे.

सकाळी लवकर उठल्यावर अवघड विषयाचा (उदा. गणित) अभ्यास आधी करावा कारण त्यावेळी मेंदू ताजा व बुद्धी प्रभावी असते. पण असं करण्यात एक धोका असतो. तो विषय आपल्याला अवघड वाटत असल्यानं जर समजायला कठीण जात असेल तर अभ्यासाचाच कंटाळा येईल, अन् सकाळी असा कंटाळा आल्यानं सर्व दिवस मन बेचैन राहील. तो दिवसच वाया जाईल. म्हणून अभ्यासाचं वेळापत्रक (टाइमटेबल) तयार करताना उठल्यावर सकाळी थोडा वेळ तरी आवडता, सोपा विषय अभ्यासासाठी निवडावा.

‘खूबसूरत बला’ असा एक शब्दप्रयोग हिंदी भाषेत आहे. इंग्रजीतसुद्धा ‘नेसेसरी ईव्हल’ म्हणून याच अर्थाचा शब्दप्रयोग आहे. मराठीत याला ‘सुंदर पिडा किंवा आवश्यक पाप (कुकर्म)’ असं म्हणता येईल. भाषांतर जाऊ दे, भावार्थ महत्त्वाचा आहे.
‘परीक्षा’ ही अशी गोष्ट आहे. जवळजवळ कुणालाही ती मनापासून आवडत नाही पण स्विकारावी मात्र सर्वांना लागतेच. शिक्षणाचं तसं नाही ते सदासर्वदा सर्वत्र आयुष्यभर चालूच असतं. जीवन ही स्वतःच एक न संपणारी परीक्षा असते. पण शाळा-महाविद्यालय यांच्यातर्फे घेतली जाणारी परीक्षा फारच कृत्रिम नि औपचारिक असते. काय ते वर्षभर शिकवलेलं एवढ्याशा डोक्यात साठवायचं – खरं तर घोकायचं नि आठवायचं – अन् सारं ते प्रश्‍नपत्रिका नावाच्या भयंकर चौकटीत ठरलेल्या वेळात लिहून टाकायचं, या सार्‍या प्रकारात मुलांना उबग आणणार्‍या, भीती निर्माण करणार्‍या गोष्टी अनेक असतात.
पण जीवनाला जसा पर्याय नाही अन् स्वतःचं स्वतःच जगावं लागतं त्याप्रमाणे आजच्या शिक्षणपद्धतीत परीक्षेला पर्याय नाही. ती द्यावी लागतेच. अनेक मुलांना विचारलं तर ती सांगतील, ‘आम्हाला शाळा आवडते, शिकायलाही आवडतं, अभ्यासही थोडाफार आवडतो पण ती परीक्षा मात्र बिलकुल आवडत नाही.’

परीक्षेचा असा बागुलबुवा सर्वांनी करून ठेवलाय, यात विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक नि पालकही सहभागी झाले आहेत. पण ही अपरिहार्य वस्तुस्थिती आहे. डिसेंबर महिना आला की अनेकांच्या मनात नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या घंटा वाजू लागतात. म्हणतातच ना – ‘रिंग आउट द ओल्ड, रिंग इन द न्यू इयर’. आजुबाजूला सर्वत्र उत्सवी धमाल सुरू होते. पण बिचार्‍या विद्यार्थ्यांच्या कानामनात मात्र निराळीच घंटी वाजू लागते. पूर्वपरीक्षेची (प्रिलिमिनरीची). ती कितीही गुणांची (मार्कांची) का असेना असते मात्र उजळणी शेवटच्या परीक्षेची. शिवाय प्रथमच सगळा अभ्यास करावा लागतो. संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम शिकावा लागतो. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हीच तर खरी कसोटी असते.
हल्ली आठवीपर्यंत कसं मस्त मजेत तरंगत एखाद्या पतंगासारखं उडतउडत खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जाता येतं. नववी म्हणूनच अवघड जाते. तरीही एकेका सत्राचा (टर्म) अभ्यासच करावा लागतो. दहावी-बारावीचं सर्वाच मोठं दडपण असतं याच गोष्टीचं. कितीतरी धडे, कविता, घटकविषय (टॉपिक्स किंवा युनिट्‌स्) शिकावे लागतात. समजले नाहीत तरी पाठ करावे लागतात ही पोपटपंची आवश्यक ठरते इंग्रजी माध्यमामुळे. मातृभाषेतून शिकणं-शिकवणं हे केव्हाही सोपं अन् आनंददायी असतं. पण आता त्याला काही इलाज नाही. मुलांचा विचार केला तर त्यांचा निरुपायच असतो. कारण निर्णय त्यांच्या पालकांनी घेतलेला असतो. तोही त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठीच. काय करणार मुलं तरी? ‘मुकी बिचारी कुणी हाका, अशी मेंढरं बनू नका’ असं म्हणायचं नि मुलांना मैं मैं नाही तर में में करणारी मेंढरं बनवायचं. असो.

आता शिक्षण, इंग्रजी माध्यम, परीक्षा हे जर अपरिहार्यच आहे तर हे दिव्य यशस्वीपणे, प्रभावीपणे कसं पार पाडायचं याचाच विचार करणं शहाणपणाचं आहे. ‘अभ्यासाचं तंत्र नि मंत्र’ हा लेख शैक्षणिक वर्षाच्या आरंभी लिहायचा असतो. परीक्षा दार ठोठवायला लागल्यावर मात्र ‘परीक्षेचं तंत्र नि मंत्र’ हा विषय आवश्यक असतो.

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची की तंत्र सर्वांना समान असतं पण मंत्र मात्र ज्याचा त्याचा खास असतो. या दोन्ही अंगांनी – तंत्र नि मंत्र – परीक्षेच्या तयारीचा विचार करु या. कशी असावी या परीक्षेच्या पूर्वतयारीची रूपरेषा?
* ही तयारी एखाद्या वृक्षासारखी असते. ट्रीसारखी. टी-आर्-ई-ई!
म्हणजेच टाइम (वेळ) – रिसोर्सेस (साधनं) – एफर्ट्‌स (प्रयत्न) – एनर्जी (शक्ती). या प्रत्येक घटकाचा विचार करून कोणत्याही परीक्षेची पूर्वतयारी करावी लागते.
* वेळ – या पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक सजीव वा निर्जीव वस्तुसाठी दिवस चोवीस तासांचाच असतो. सूर्योदय-सूर्यास्त सर्वांसाठी एकाच वेळी असतात. मग- अभ्यासासाठी अधिक वेळ मिळवायचा कसा? हा यक्षप्रश्‍न आहे खरा. पण याचं उत्तर तसं सोपं आहे. वेळ हा आपल्याला निर्माण करता येत नाही. पण वेळ ‘चोरता’ मात्र येतो. कसा? तर आपल्या दिवसभरातल्या सर्व कृतींना लागणारा वेळ आता परीक्षा जवळ आल्यावर थोडा थोडा कमी करायचा. झोप जर आठ तास घेत असू तर ती अर्ध्याएक तासानं सहज कमी करता येते. रोज थोडं थोडं (दहा-पंधरा मिनिटं) लवकर उठण्याचा प्रयत्न केला तर महिना-भरात तासभर लवकर उठणं निश्चित जमतं. पण अभ्यासाचा निश्चय असेल तरच. त्याप्रमाणे अंघोळीस लागणारा वेळ थोडा कमी करून वाचलेल्या वेळात काहीतरी अभ्यास करता येतोच. किंवा त्या वाचलेल्या वेळाच्या जोडीला जेवण, टीव्ही पाहणं, संपूर्ण दिवसात एकूण दोन-तीन तास वेळ ‘चोरता’ येतोच. हा वेळ मात्र संपूर्णपणे ठरवलेल्या अभ्यासासाठी वापरला पाहिजे.

* वेळेचं व्यवस्थापन (मॅनेजमेंट ऑफ टाइम्) –
सध्या सर्वत्र व्यवस्थापनाचा (मॅनेजमेंटचा) बोलबाला आहे. अभ्यासासाठी वेळेचा विचार करताना असं व्यवस्थापन आवश्यक असतं. याला अभ्यासाचं नियोजन (प्लॅनिंग) असंही म्हणतात. अभ्यासासाठी अधिकाधिक वेळ मिळवायचा हे ठरलं. आता कोणता अभ्यास केव्हा करायचा नि त्यासाठी प्रत्येकी किती वेळ द्यायचा हा विचार ज्याचा त्यानं करणं आवश्यक असतं. आपल्याला काही विषय सोपे तर काही विषय अवघड वाटतात. सकाळी लवकर उठल्यावर अवघड विषयाचा (उदा. गणित) अभ्यास आधी करावा कारण त्यावेळी मेंदू ताजा व बुद्धी प्रभावी असते. पण असं करण्यात एक धोका असतो. तो विषय आपल्याला अवघड वाटत असल्यानं जर समजायला कठीण जात असेल तर अभ्यासाचाच कंटाळा येईल, अन् सकाळी असा कंटाळा आल्यानं सर्व दिवस मन बेचैन राहील. तो दिवसच वाया जाईल. म्हणून अभ्यासाचं वेळापत्रक (टाइमटेबल) तयार करताना उठल्यावर सकाळी थोडा वेळ तरी आवडता, सोपा विषय अभ्यासासाठी निवडावा. त्यामुळे उत्साही वाटून दिवसभर अभ्यास चांगला होईल. ही साधी वाटली तरी महत्त्वाची गोष्ट आहे.
* अभ्यासाचं वेळापत्रक जरूर करावं – ते करताना एक प्रकारचा आनंद वाटला पाहिजे. कारण हे वेळापत्रक आपण स्वतःसाठी केलेलं असल्यानं अधिक बंधनकारक (पण लादलेलं नव्हे – शाळेच्या वेळापत्रकासारखं) असतं. आपण उत्स्फूर्तपणे या वेळापत्रकाचं पालन करू शकतो. या बाबतीत काही सूत्रं लक्षात ठेवावीत.
– एकावेळी खूप लांब (तीन-चार तासांची सलग) सत्रं बनवू नयेत. पण दोन-दोन तासांची अवश्य बनवावीत. कारण किमान एवढा वेळ सलग बसून प्रत्येक विषयाची प्रश्‍नपत्रिका आपल्याला परीक्षेत सोडवायची असते. त्याची पूर्वतयारी हवी. शाळेतील तासिका (पिरियड्‌स) अर्ध्या तासांचे तर शिकवणीचे वर्ग जास्तीत जास्त एका तासाचे असतात. मन इकडे तिकडे न भिरभिरता किमान दोन तास तरी एका ठिकाणी बसून अभ्यास केलाच पाहिजे.
– आपल्याला अवघड जाणारे, न आवडणारे विषय एका पाठोपाठ एक घेऊ नयेत. गणितानंतर एखादी भाषा, विज्ञानानंतर दुसरी भाषा असं वेळापत्रक बनवावं. त्यामुळे कंटाळा कमी होऊन अधिक उमेदीनं व सकारात्मक मनःस्थितीत पूर्वतयारी करता येते.
– वेळापत्रकातील अभ्याससत्रात वाचन-लेखन-काही पाठांतर-गणितं सोडवणं – विज्ञानविषयातील आकृत्या काढणं, रासायनिक समीकरण (केमिकल इक्वेशन्स) – भूगोलातील काही विषयांचे तक्ते (चाट्‌र्स) तयार करणं ज्यामुळे विषय लक्षात ठेवणं सोपं जाईल.
अशा प्रकारे पूर्वतयारीच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाच्या घटकाचा म्हणजे वेळेचा- विचार करायचा असतो.
* अभ्यासाचं साहित्य नि साधनं – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असं साहित्य विपुल असतं. शाळा-शिकवणीचे वर्ग यांच्याशिवाय इतर अनेक शैक्षणिक प्रकाशन संस्थांची प्रकाशनं असतात. उदा. ‘दहावी दिवाळी बारावी दिवाळी ’ असे दिवाळी अंकही असतात. ज्यात अनेक अनुभवी तज्ज्ञांचे लेख व अभ्यासविषयक मार्गदर्शन असतं.
या साहित्याचे मुख्य प्रकार असे असतात-
पाठ्यपुस्तके (टेक्स्ट बुक्‌स), सर्वांत मुख्य म्हणजे एस्‌एस्‌सी बोर्डाच्या आधीच्या काही (किमान पाच-सहा) परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका.
– पाठ्यपुस्तकांचा अभ्यास पूर्णपणे केला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं अभ्यास साधन पाठ्यपुस्तकं एकदा नीट वाचून काढावीत. अतिशय हुशार विद्यार्थ्यांनी खूप चांगलं यश मिळवण्यासाठी तर हे करावंच. खूप उपयोग होतो.
– नोेट्‌सचा महासागर विद्यार्थ्यांकडे वर्ष अखेरीपर्यंत जमतो. यात बुडण्याची शक्यता असते. म्हणून पहिलं महत्त्वाचं म्हणजे या नोट्‌सची निवड करणं (सॉर्टिंग). अशी निवड केली की अभ्यासाची निश्चित मर्यादा कळते. अधिक आत्मविश्‍वासानं अभ्यास करता येतो. उगीच शाळा-शिकवणी नि इतरांच्या नोट्‌स पाहून गरगरल्यासारखं नि गडबडल्यासारखं होतं. अनावश्यक नोट्‌स शक्यतो दृष्टीआडच कराव्यात. अभ्यास जेवढा सुटसुटीत तेवढा आत्मविश्‍वास अधिकाधिक.
* मार्गदर्शक पुस्तकं – यात निरनिराळ्या विषयांची गाइड्‌स किंवा डायजेस्ट्‌स यांचा समावेश होतो. बाजारात एकेका विषयाची अशी दोन-तीन मार्गदर्शक पुस्तकं असतात. ही सारी डोळ्यासमोर असली की आपली स्थिती चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूसारखी होते. चक्रव्यूहात शिरता येतं पण बाहेर पडणं अवघड बनतं. म्हणून एकच त्यातल्या त्यात सर्वसमावेशक असं मार्गदर्शक पुस्तक निवडावं व बाकीची दृष्टीआड करावीत. त्यातूनही एखाद्या विषयाच्या मार्गदर्शकाला एखादा घटकविषय (टॉपिक) अधिक चांगला असेल तर त्याच्या नोट्‌स काढून जवळ ठेवाव्यात. उगीच ते आणखी एक पुस्तक आपल्यासमोर असेल तर आपल्या मनावरचा ताण वाढण्याची शक्यता असते.
* आधीच्या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका – हे तसं पाहिलं तर अभ्यासाचं प्रत्यक्ष साधन नसलं तरी अभ्यासाला दिशा देणारं निश्चित असतं. या प्रश्‍नपत्रिकांचं आपण आपल्या पद्धतीनं पृथक्करण (ऍनालिसिस) करणं आवश्यक असतं. म्हणजे महत्त्वाचे घटकविषय (टॉपिक) परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे हे ठरवता येतं. अर्थात यामुळे आपला अभ्यास फक्त निवडक (सिलेक्टिव्ह) होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी संपूर्ण अभ्यास झाल्यावर उजळणी (रिव्हिजन) करताना कोणत्या प्रश्‍नांवर अधिक भर द्यायचा हे कळू शकतं. अशा प्रकारे केलेला अभ्यास खूप उपयोगी पडू शकतो.

असा प्रश्‍न पत्रिकेवर आधारित केलेला अभ्यास म्हणजे ‘राम भरोसे’ पद्धतीचा जुगार नसतो. तर एका प्रभावी पद्धतीने केलेली ती परीक्षेची पूर्वतयारी असते.
* प्रश्‍नपत्रिका संपूर्ण सोडवणे – शक्यतो वेळ लावून, परीक्षेच्या परिस्थितीत सोडवणे – ही गोष्ट आत्मविश्‍वासाच्या बांधणीसाठी (बिल्डिंग अप् ऑफ् कॉन्फिडन्स) खूप खूप उपयोगी पडते. निदान हुशार मुलांनी अशा प्रत्येक विषयाच्या तीन-तीन प्रश्‍नपत्रिका सोडवून शिक्षकांकडून तपासून घ्याव्यात. यापेक्षा उत्तम गोष्ट नाही.
* प्रयत्न (प्रयोग) – म्हणजे केलेले कष्ट. कष्टाशिवाय कोणत्याही क्षेत्रात मधुर फळ – यश – मिळत नाही. हा जीवनाचाच नियम आहे. अधिकाधिक टक्केवारी मुलं ही खूप नि पद्धतशीर अभ्यास करणारीच असतात. अभ्यास हा त्यांचा ध्यास नि श्‍वास बनलेला असतो. अभ्यासावर त्यांचं प्रेमही असतं.

प्रयत्न, चिकाटी, जिद्द या गोष्टी तर यशाचे प्रमुख घटक आहेतच. पण जर अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही – मिळवता येत नाही, अभ्यास करण्यासारखी परिस्थिती किंवा वातावरण आजुबाजूला नाही तर प्रयोग केले पाहिजेत. सगळीकडे टीव्हींचा कर्कश्श आवाज सुरू असतो म्हणून एका विद्यार्थिनीनं रात्री आठ ते पहाटे दोन वाजेपर्यंत (सहा तास) झोपून दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत अभ्यास करून परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं. असे प्रयोग स्वतःचे स्वतः केलेच पाहिजेत. म्हणून प्रयत्नांइतकंच महत्त्व परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रयोगानाही आहे. ‘प्रयत्नांना पर्याय नाही.’ हे शक्य मनमस्तकात कोरून ठेवावे.

* शक्ती – हे सारं करण्यासाठी शक्ती हवी. शारीरिक-मानसिक-बौद्धिक शक्ती हवीच. निश्चय हवा निर्धारही हवा. मग अभ्यास कोणत्याही परिस्थितीला होतोच होतो.
* शारीरिक शक्ती – पौष्टीक, चौरस आहार; व्यायाम-प्राणायाम; मोकळ्या हवेत फिरणं. इ. गोष्टीतून मिळवता येते.
* बौद्धिक शक्ती – अभ्यास आनंदात, थोड्या थोड्या अवकाशांच्या (ब्रेक्स) अंतरानं केल्यास व सकारात्मक मनोवृत्ती ठेवल्यास चांगली टिकते.
* मानसिक किंवा भावनिक शक्ती – आनंदात, सहज अभ्यास करणं; निश्चित ध्येय हे टक्केवारी न ठरवता अधिकाधिक अभ्यास करण्याचं ठरवणं; मनात होकारात्मक विचार टिकवणं या गोष्टींवर भावनिक शक्ती अवलंबून असते.
शिवाय घरातील वडील मंडळींची थोडीशी सेवा, त्यांचे आशीर्वाद नि दैनंदिन मौन-ध्यान-उपासना या गोष्टीही अतिशय महत्त्वाच्या असतात् या दृष्टीनं एक साधा अभ्यास असा-
* हालचाल न करता, डोळे बंद करून ताठ बसणं,
* श्‍वास संथ करून लक्ष श्‍वासाकडे देणं,
* स्वतःला अभ्यास – परीक्षा – यश याविषयी सकारात्मक (पॉझिटिव्ह) स्वयंसूचना (ऑटोसजेशन्स) देणं – भविष्यकाळातील घटनांची उज्ज्वल चित्र (ब्राइट इमेजेस् ऑफ् फ्यूचर) पाहणं.

अशा नियमित केलेल्या अभ्यासाचा खूप खूप लाभ आपल्याला मिळू शकतो. एकूणच परीक्षेच्या पूर्वतयारीचा व प्रत्यक्ष परीक्षेचा काळ स्वतःची प्रकृती सांभाळणं सर्वांत महत्त्वाचं असतं. पालक सर्व प्रकारे काळजी घेतातच. हल्ली अभ्यास, परीक्षा, भावी शिक्षणाचा विचार या सर्वच बाबतीत पालक योग्य ती मदत करायला तयार असतातच. अनेक पालक तरुण मुला-मुलींनी क्षुल्लक कारणानं, परीक्षेतील अपयश सहन न झाल्यानं केलेल्या आत्महत्यांमुळे अधिक सावध, समजूतदार नि अनाग्रही बनलेयत… हा स्वागतार्ह बदल आहे.

मुलांनीही क्षमतेनुसार अधिकाधिक अभ्यास व परीक्षेची विशेष तयारी करून भरीव यश मिळवलं पाहिजे.
अभ्यास ही ‘खूबसूरत बला’ (नेसेसरी इव्हल) असली तरी ती आवडू शकते. सहवासानं जवळीक किंवा प्रेम निर्माण होतं तसं अभ्यासाचा सराव करत राहिल्यावर परीक्षेचा बागुलबुवा मनातून जातो. परीक्षा एका बुजगावण्यासारखी वाटू लागते. ‘परीक्षेचं भय’ बर्‍याच प्रमाणात कमी होतं. अभ्यास मात्र पद्धतशीर केला पाहिजे. अभ्यासाचं तंत्र सर्वांना समान असतं पण अभ्यासाचा मंत्र मात्र आपण कमवावा लागतो. अभ्यास-कौशल्य विकसित करावी लागतात. या बाबतीत आपणच आपले सर्वांत चांगले मित्र असू शकतो किंवा सर्वांत वाईट शत्रूही. पण ज्याचा अभ्यास (उद्धार) त्यानंच करायचा याविषयी मात्र दुमत नाही. ‘उद्धरेत् आत्मन् आत्मानाम् ) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शुभकामना!!