गोविपा विलीनीकरण निर्णय आज

0
80

>> कार्यकारी समितीची पणजीत बैठक

गोवा विकास पार्टीचे युगोडेपामध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयासाठी कार्यकारी समितीची बैठक आज दि. ३ रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी येथील एका हॉटेलात होणार आहे. गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा आमदार मिकी पाशेको यांनी हा प्रस्ताव कार्यकारिणी समोर ठेवला
आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाला तर पक्ष युगोडेपात विलीन करण्याचा व नामंजूर झाल्यास मिकी पाशेको यांनी पक्षत्याग करून युगोडेपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिकी यांच्या निर्णयाला नुवे मतदारसंघातील सर्व सरपंचांचा पाठिंबा आहे. मात्र, या प्रस्तावाला पक्षाचे सरचिटणीस व गोव मांस प्रकल्पाचे अध्यक्ष लिंडन मोंतेरो यांचा विरोध आहे. त्यांनी भाजपाशी जवळीक साधल्याने ते विलिनिकरणास विरोध करीत आहेत तर गोवा विकास पार्टीचे दुसरे आमदार कायतान सिल्वा हे लवकरच पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
आहेत.
लिंडन मोतेरो यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की विलीनीकरणास आपला वैयक्तिक विरोध आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गोवा विकास पार्टीचे दोन आमदार निवडून आले होते. तर युगोडेपाचा एकही आमदार निवडून आला नव्हता.