गोवा सुरक्षा मंच’ बरोबर युतीचे शिवसेनेचे संकेत

0
84

>> पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे गोव्यात

 

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसविरोधी पक्षांचे नेतृत्व भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर करणार असल्याचे सांगत शिवसेना भाभासुमंच्या ‘गोवा सुरक्षा मंच’ पक्षाबरोबर युती करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे गोवा राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. पुढील आठवड्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गोव्यात येणार असून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ताम्हणकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक महाभारतातील शेवटच्या युद्धाप्रमाणे असेल. त्यात भाजप ‘कौरव’ तर त्यांचे विरोधक ‘पांडव’ असतील. या युद्धात भाजप व कॉंग्रेसच्या पाडावासाठी वेलिंगकर कृष्णाची भूमिका बजावत भाजप-कॉंग्रेस विरोधी पक्षांना मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेने भाभासुमंच्या ‘गोवा सुरक्षा मंचा’ला जागा वाटपाचा प्रस्ताव सादर केला आहे. शिवसेना २० मतदारसंघात ताकदवान आहे. प्रचारनिती निश्‍चित करण्यात आली आहे. भाजपबरोबर असलेल्या पक्षांचा पराभव अटळ आहे. मगोची स्थिती बिकट होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
ढवळींकर बंधू सत्तापिपासू : आरोप
शिवसेनेला गोव्यात स्थान नसल्याचे मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत ढवळीकर बंधू सत्तेसाठी हपापलेले असल्याची टीका ताम्हणकर यांनी केली. भाभासुमंच्या ‘गोवा सुरक्षा मंच’ला मगो पाठिंबा देतील असे अजिबात वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात जेव्हा दिगंबर कामत सरकार होते तेव्हा मगोने इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते याची आठवण त्यांनी केली.