नेताजींना न्याय कधी?

0
95

भारताच्या राजकीय इतिहासात दोन महान व्यक्तींच्या मृत्यूचे गूढ देशवासीयांना सदैव छळत आले आहे. एक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुसरे लालबहादूर शास्त्री. दोन्ही मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाले आणि त्या व्यक्तींच्या जाण्याने देशाची अपरिमित हानी झाली. विशेषतः नेताजींच्या जाण्याने देशाच्या इतिहासाला एक वेगळीच कलाटणी मिळाली, जिचे परिणाम आपण आजतागायत भोगत आलो. नेताजींचे येथे स्मरण करण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मृत्यूसंदर्भातील काही गोपनीय कागदपत्रे नुकतीच जपानने खुली केली आहेत. यापूर्वी पश्‍चिम बंगाल सरकारने आपल्याजवळील कागदपत्रे खुली केली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केंद्र सरकारजवळील कागदपत्रे खुली करण्याचा निर्णय घेतला होता. नुकतीच जपानने जी कागदपत्रे खुली केली आहेत, त्यामध्ये नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील महत्त्वपूर्ण अहवाल आहे, जो त्यांच्या मृत्यूवेळी तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या लष्करी डॉक्टरांच्या व परिचारिकांच्या मुलाखतींवर आधारित आहे. त्यानुसार नेताजींचे विमान १८ ऑगस्ट १९४५ रोजी दुर्घटनाग्रस्त झाले व नेताजींवर लष्करी इस्पितळात उपचार झाले, परंतु आत्यंतिक जखमांमुळे नेताजींचे प्राणोत्क्रमण झाले असे हा अहवाल सांगतो. तो खरा मानला तर नेताजींचा मृत्यू झाला नव्हता तर ते नंतर रशियाच्या ताब्यात होते किंवा गुमनामी बाबा म्हणून भारतात परतले होते वगैरे दाव्यांना विराम द्यावा लागतो. परंतु हा अहवाल खरा मानायला बोस समर्थक तयार होतील का हा प्रश्नही अनुत्तरित आहे. आजवर नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील गूढ उकलण्यासाठी नाना प्रयत्न झाले. तीन चौकशी आयोग नेमले गेले. शोधपत्रकारांनी त्यावर पुस्तकेही लिहिली. हरीन शाह यांचे ‘व्हर्डिक्ट फ्रॉम फोर्मोसा’ किंवा अलीकडचे अनुज धर यांचे ‘इंडियाज् बिगेस्ट कव्हर अप’ ही पुस्तके त्या विषयाच्या खोलात जातात. परंतु ठोस पुरावे नसल्याने ही कथित दुर्घटना गूढच बनून आजवर राहिली. या अहवालात बोस यांच्यावर अखेरचे उपचार करणार्‍या डॉक्टर व परिचारिकांच्या जबान्या आहेत. त्यानुसार १८ ऑगस्टला दुपारी दीड वाजता ही विमान दुर्घटना घडली आणि रात्री सात वाजता नेताजींचे निधन झाले असा निष्कर्ष काढला गेला आहे. पण यापूर्वी आशीश रे या पत्रकाराने तानेयोशी योशिमी या परिचारिकेची मुलाखत घेतली होती, तेव्हा तिने आपणच नेताजींवर अखेरचे उपचार केले व रात्री अकराच्या सुमारास नेताजींनी देहत्याग केल्याचे तिचे म्हणणे होते. मग यातली मृत्यूची खरी वेळ कोणती? हरीन शाह यांच्या ‘व्हर्डिक्ट फ्रॉम फोर्मोसा’ या पुस्तकात त्सान पी या परिचारिकेने नेताजींवर आपणच अखेरचे उपचार केल्याचे सांगितल्याची नोंद आहे. त्यात डॉक्टरांनी आपल्याला नेताजींच्या शरीराला ऑलिव्ह तेल लावण्यास सांगितले होते असा दावा त्या परिचारिकेने केला आहे. मग नेताजींवर अखेरचे उपचार करणारी परिचारिका कोण हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे जपानने गोपनीय कागदपत्रे खुली करूनही आधी उजेडात आलेल्या माहितीशी विसंगतींमुळे नेताजींच्या मृत्यूचे गूढ हे गूढच राहते. ते उकलल्याचे मान्य करण्यास नेताजीप्रेमी कितपत तयार होतील हा प्रश्नच आहे. शिवाय हा अहवाल १९५१ सालचा म्हणजे नेताजींच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनंतरचा आहे व नेताजींच्या मृत्यूवरून गदारोळ माजल्याने भारत सरकारच्या विनंतीवरून जपानने तो बनवला आहे. त्यामुळे त्याची अधिकृतताही संशयास्पद मानली जाऊ शकते. नेताजींच्या मृत्यूचे गूढ जोवर उकलत नाही, तोवर रेंकोजीच्या मंदिरातील त्यांच्या अस्थींसंदर्भातील दाव्यांची सत्यताही स्पष्ट होणार नाही. देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या एका महान योद्ध्याच्या मृत्यूची ही शोकांतिका दुर्दैवी आहे. नेताजींना न्याय कधी मिळेल याचीच देशाला प्रतीक्षा आहे.