‘गोवा सुरक्षा मंच’ची स्थापना

0
107

>> भाजपला शह देण्यासाठी भाभासुमंचा पक्ष

 

भारतीय भाषा सुरक्षा मंचाने काल गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘गोवा सुरक्षा मंच’ या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. काल येथील हॉटेल डेल्मॉनमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात पक्षाच्या राजकीय विभागाचे प्रमुख ऍड्. उदय भेंब्रे यांच्या हस्ते पक्षाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. भाभासुमंच्या राजकीय पक्षाच्या नावाचे वृत्त सर्वप्रथम दै. नवप्रभाने दिले होते. ३५ मतदारसंघांमध्ये पक्ष सर्वशक्तीनिशी रिंगणात उतरणार असल्याची घोषणा यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली.

तद्पूर्वीं, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे समन्वयक प्रा. वेलिंगकर यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्यामागील कारणे स्पष्ट करताना देशी भाषांसाठी १५ महिने लढा दिल्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले. इंग्रजीला अनुदान देण्याचा निर्णय घेऊन मराठी-कोकणी या भाषांचा घात करण्याचा निर्णय घेतलेल्या कॉंग्रेस सरकारचा पराभव करून आम्ही राज्यात देशी भाषांसाठी काम करण्याचे वचन दिलेल्या भाजपला सत्तेवर आणले. मात्र, भाजपने कॉंग्रेसपेक्षा दोन पावले पुढेच जाऊन मराठी-कोकणीचा घात केला. त्यामुळे यावेळी आणखी कोणताही पर्याय नसल्याने राजकीय पक्षाची स्थापना करावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपबरोबरच आघाडी सरकारात असलेल्या मगो पक्षाने भाभासुमंला आपला पाठिंबा व्यक्त केला होता. त्यामुळे आम्ही निवडणुकीत मगो पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यासाठी त्यांना भाजपबरोबरील युती तोडण्याची अट घालण्यात आली होती. युती तोडण्यासाठी त्यांना सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ती मुदत संपल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेतल्याचे वेलिंगकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीत मंचाचे १० हजार कार्यकर्ते पक्षाच्या प्रचार कार्यात वाहून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत पक्षकार्यासाठी तिघांनी राजीनामे दिले आहेत, ते म्हणाले.
दुसर्‍या पक्षांवर टीका
राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी नितीमूल्ये व तत्वांना तिलांजली दिल्याचा आरोप यावेळी बोलताना उदय भेंब्रे यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर लोकहितार्थ काम करण्यासाठी ङ्गगोवा सुरक्षा मंचफची स्थापना करण्यात आल्याची माहिती भेंब्रे यांनी दिली. गोव्याची जनता व गोव्याची संस्कृती यांच्या सुरक्षेसाठी ङ्गगोवा सुरक्षा मंचफची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
अध्यक्षपदी आनंद शिरोडकर
यावेळी उदय भेंब्रे यांनी पक्षाची प्रदेश समिती जाहीर केली. ती खालीलप्रमाणे आहे. अध्यक्ष – आनंद पांडुरंग शिरोडकर, उपाध्यक्ष- ऍड्. स्वाती उल्हास केरकर व किरण रामचंद्र नायक, सरचिटणीस : हृदयनाथ शिरोडकर, चिटणीस : विनय प्रेमानंद नाईक, संयुक्त चिटणीस : नितीन रमेश फळदेसाई, कोषाध्यक्ष : महेश सुरेश महांबरे, सहकोषाध्यक्ष : वासुदेव सुब्राय खंवटे, जिल्हा कार्यकारिणी : उत्तर गोवा : अध्यक्ष : नंदन सावंत, उपाध्यक्ष : दामोदर गणेश नाईक, सरचिटणीस : आत्माराम वामन गावकर, दक्षिण गोवा अध्यक्ष : डॉ. प्रकाश कुराडे, उपाध्यक्ष : संजय राऊत देसाई, सरचिटणीस : ऍड्. तुषार परब, महिला विभाग : प्रदेश प्रमुख : डॉ. सौ. मानवी शैलेश प्रभुदेसाई, उत्तर जिल्हा प्रमुख : सौ. शुभांगी गुरुदास वायंगणकर, दक्षिण जिल्हा प्रमुख : ऍड्. सर्वांगी सर्वेश च्यारी, युवा विभाग प्रदेश प्रमुख : प्रा. वल्लभ लक्ष्मण केळकर, उत्तर जिल्हा प्रमुख : प्रणव श्रीनाथ बाणावलकर, दक्षिण जिल्हा प्रमुख : दत्तेश गजानन शिरगांवकर व ॐकार अनंत देसाई.
आगामी कार्यक्रम
मंचने १० नोव्हेंबर रोजी मातृशक्ती महामेळावा बोडगेश्‍वर देवस्थान म्हापसा येथे दुपारी ३ ते ६ या दरम्यान आयोजित केला आहे. २७ नोव्हेंबर रोजी असाच मातृशक्ती महामेळावा दक्षिण गोव्यात लोहिया मैदान, मडगाव येथे ३ ते ६ या दरम्यान आयोजित केला आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. आझाद मैदान पणजी येथे तर २ डिसेंबर रोजी फोंडा जुने बसस्थानक येथे सकाळी १० वा. युवा मेळावे आयोजित केले आहेत. उत्तर गोव्यातील पणजी, पर्वरी, म्हापसा, शिवोली, मांद्रे, पेडणे, मये, डिचोली व साखळी तर दक्षिण गोव्यातील सावर्डे, सांगे, कुडचडे, फोंडा, प्रियोळ, शिरोडा, वास्को, कुठ्ठाळी व काणकोण हे गोवा सुरक्षा मंचचे प्रबळ मतदारसंघ असल्याचे मंचने स्पष्ट केले आहे.