गोवा शिपयार्डविरोधात पोलीस तक्रार

0
113
गोवा शिपयार्डविरोधात मुरगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले स्थानिक.

वास्को (न. प्र.)
गोवा शिपयार्डच्या विस्तारीत प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिकांच्या घरांचे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील स्थानिक धास्तावलेले असून गोवा शिपयार्ड तसेच या कामाच्या कंत्राटदाराविरूद्ध स्थानिकांनी पोलिसात तसेच मुख्याधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे. सदर काम बंद न केल्यास गोवा शिपयार्डविरूद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा स्थानिकांतर्फे देण्यात आला आहे.
केंद्र सरकारतर्फे गोवा शिपयार्डला ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत चालना देताना ३३ हजार कोटी मंजूर करण्यात आले असून त्यानुसार गोवा शिपयार्डतर्फे अनेक प्रकल्प हाती घेऊन गोवा शिपयार्डचा विस्तार चालू ठेवला आहे. याच प्रकल्पाचा मुख्य भाग म्हणजे हाती घेण्यात आलेली साधनसुविधा असलेली बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर चालू आहे. दरम्यान या इमारतीच्या कामावेळी करण्यात येणार्‍या पायलींगमुळे येथील स्थानिकांच्या घरांना तसेच इमारतींना तडे जाण्यास सुरूवात झाली. घरांना भेगा पडल्याने, घरातील जमीन उखडत असल्याने तसेच इमारतींनाही तडे जाऊन कॉंक्रिटचे तुकडे पडू लागल्याने स्थानिक बरेच भयभीत झाले आहेत. तसेच रात्रंदिवस चाललेल्या कामामुळे व त्यातून होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे येथील नागरिकांची झोप उडाली. त्यानुसार त्यांनी प्रथमतः गोवा शिपयार्डच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे याविषयी तक्रार दाखल करुन त्यांना लोकांची समस्या सांगितली. परंतु याचा काहीएक फायदा न झाल्याने स्थानिकांनी मुरगाव पालिका मुख्याधिकार आग्नेलो फर्नांडिस यांच्याकडे तक्रार दाखल केली. मुख्याधिकार्‍यांनी येथील स्थानिक नगरसेवक व स्थानिक तसेच गोवा शिपयार्डशी संबधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून याविषयी चर्चा केली.
दरम्यान, चर्चेअंती मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी आपला निवाडा देताना गोवा शिपयार्डला पायलींग काम बंद करण्याचा आदेश १५ जून २०१८ रोजी दिला. तसेच रात्रपाळीच्या कामामुळे स्थानिकांना होणारा त्रास याचे कारण पुढे करून संध्याकाळी ७ पर्यंत काम चालू ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. तसेच ज्या घरांना, इमारतींना तडे गेले होते. त्यांना नुकसानभरपाई म्हणून त्यांच्या घरांची व इमारतींची डागडूजी करून देण्याच्या अटीवर गोवा शिपयार्डला पुढे काम चालू ठेवण्याचा आदेश स्थानिकांच्या सोयीनुसार देण्यात आला होता. परंतु गोवा शिपयार्डने मुख्याधिकार्‍यांच्या आदेशाला न जुमानता पुन्हा पायलींगच्या कामाला सुरूवात केल्याने स्थानिक लोकांची सहनशीलता संपली.
स्थानिकांची पोलीस तक्रार
त्यामुळे काल येथील स्थानिकांनी नगरसेवक नंदादीप राऊत यांच्यासमवेत वास्को पोलीस स्थानकात स्थानिकांच्या सह्या असलेले निवेदन तक्रार स्वरूपात सादर केले. गोवा शिपयार्डने चालवलेले बेकायदा पायलींग काम त्वरित बंद करण्यात यावे अशी विनंती केली. तसेच मुरगाव पालिका मुख्याधिकार्‍यांनाही याविषयी परत एकदा तक्रार दाखल करून गोवा शिपयार्डने स्थानिक लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा जो प्रकार चालवलेला आहे तो त्वरित बंद करण्याचा आदेश देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. जर गोवा शिपयार्ड पायलींग काम बंद करत नसेल तसेच स्थानिकांची नुकसान भरपाई करून देत नसेल तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा स्थानिकांतर्फे यावेळी देण्यात आला.
दरम्यान, स्थानिकांनी केलेल्या तक्रारीला अनुसरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोवा शिपयार्डने वास्को पोलिसांना तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना मुख्य गेट बाहेर तैनात ठेवून आपल्या प्रकल्याचे काम चालू ठेवले. सकाळपासून मुख्य गेटसमोर पोलीस पहारा देत होते.