गोवा-मेंगलोर, गोवा-मुंबईदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी करणार

0
3

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा आणि मेंगलोर दरम्यान व्यापार देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी हवाई आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. त्यामुळे गोवा-मेंगलोरबरोबरच गोवा-मुंबई अशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार आहे. तसेच या रेल्वेंमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोपा ते मंगलोर एअर कनेक्टिव्हिटी देखील असणे आवश्यक आहे. गोवा आणि मंगलोर या दोन्ही ठिकाणी बंदर, विमानतळ, पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन इत्यादी असल्याने व्यापारविनिमय होऊ शकतो, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

दरम्यान राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची प्राथमिक स्तरावर फाउंडेशन कोर्स आणि उच्च शिक्षण स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पर्वरी येथे राष्ट्रीय शिक्षण धोरणावरील एका चर्चासत्रात बोलताना काल दिली. एनईपी-2020 संदर्भात शिक्षक – शिक्षण गुणवत्ता सुधारणा या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या चर्चासत्रात देशातील 20 राज्यांतील शिक्षणतज्ज्ञ या चर्चासत्रात सहभागी झाले आहेत. यासारख्या चर्चासत्रातून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रोडमॅप तयार करण्यास मदत होणार आहे. गोव्याने एनईपी-2020 च्या अंमलबजावणीमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. या चर्चासत्रामुळे शिक्षकांमध्ये स्पष्टता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.