सुवर्णक्षण

0
20

कदंबांचे कुलदैवत असलेल्या सप्तकोटेश्वराच्या नार्वे येथील मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला आहे. येत्या शनिवारी त्याचे उद्घाटन होईल. गोमंतकाच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण आहे. सोरटी सोमनाथाच्या मंदिराच्या जिर्णोद्धाराला भारताच्या इतिहासात जसे महत्त्व आहे, तसेच गोव्याच्या इतिहासात सप्तकोटेश्वराच्या जिर्णोद्धाराला आहे. सोमनाथ मंदिरावर शतकानुशतके आक्रमकांचे घाले पडत राहिले, परंतु सतत कोणी ना कोणी कैवारी बनून त्याच्या पुनर्बांधणीसाठी वेळोवेळी उभे राहिले. गझनीच्या महंमदापासून औरंगजेबापर्यंत शतकानुशतके अनेक आक्रमकांनी सोमनाथ मंदिर जमीनदोस्त करून टाकले, परंतु कधी वल्लभिनीच्या राजाने, कधी प्रतिष्ठानच्या नागभट्टाने, कधी सोळंकी राजा भीमदेवाने ते तेवढ्याच दिमाखात पुन्हा उभे केले. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुढाकारातून आजचे सोमनाथ भव्यदिव्य स्वरूपात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली ध्वजा फडकावत दिमाखात उभे आहे.
गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहासही असाच देदीप्यमान आहे. त्याचे मूळ मंदिर दिवाडी बेटावर होते. त्या मंदिरावरही वेळोवेळी आक्रमकांनी घाला घातला. हसन गंगू बहामनीने या मंदिराची नासधूस करताना तेथील स्वयंभू लिंग खोदून काढले होते. विजयनगरच्या माधव मंत्र्याने ते पुन्हा बांधले. पोर्तुगीज राजवट आली तेव्हा त्यांनी पुन्हा मंदिराचा विद्ध्वंस केला आणि त्यावर चॅपेल बांधले. मंदिरातील लिंग काढून विहिरीतून पाणी काढायच्या जागी बसवण्याचा नीचपणा केला गेला. परंतु नारायण सूर्यराव सरदेसाईंच्या रूपाने पुन्हा एक भक्त धावला आणि रातोरात ते लिंग नदीपलीकडे सुरक्षित प्रदेशात आणले गेले. पुढे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी केलेले हे मंदिर आहे आणि त्याचा एवढ्या शानदारपणे झालेला जिर्णोद्धार हा समस्त गोमंतकीय जनतेसाठी एक अभिमान विषय व्हायला हवा.
छत्रपती शिवाजी महाराज आणि गोवा यांचे नाते किंवा संभाजीराजेंनी गोव्याच्या मुक्ततेसाठी केलेल्या प्रयत्नांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न सतत होताना दिसतो. तो जोडला जाणे काहींसाठी गैरसोयीचे ठरत असल्याने त्या इतिहासावर प्रयत्नपूर्वक पडदा ओढला जात राहिला आहे. शिवाजी महाराजांनी गोवा बेटावर आपली माणसे कशी पेरली होती आणि आकस्मिक हल्ला चढवून गोवा बेट काबीज करायचा बेत कसा आखला होता, त्याचा इतिहास जदुनाथ सरकारांनीही आपल्या संशोधनपर ग्रंथात सविस्तर सांगितलेला आहे. संभाजीराजांनी थेट पाण्यात घोडा लोटून गोवा बेटाकडे कूच करण्याचा केलेला प्रयत्न तर प्रसिद्धच आहे. परंतु या इतिहासाकडे सोईस्कररीत्या डोळेझाक केली जात राहिली आहे. सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार असो, किंवा पोर्तुगीज राजवटीत पाडल्या गेलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी असो, अनेकांना त्यामुळे पोटशूळ उठलेला दिसतो. परंतु राष्ट्रीय स्वाभिमान हीही काही चीज असते. आपले स्वत्व आणि सत्व जपणे हे कोणत्याही राष्ट्रासाठी, प्रदेशासाठी अतिशय महत्त्वाचे असते याचाच या मंडळींना विसर पडताना दिसतो. वेर्ण्यातील महालसा मंदिराची शानदार पुनर्उभारणी झाली, तोही गतइतिहासातील काळा डाग पुसण्याचा असाच एक प्रयत्न होता. सप्तकोटेश्वर मंदिराच्या पुनर्उभारणीतून गोव्याच्या राष्ट्रीयत्वाच्या त्या महान इतिहासालाच उजाळा मिळणार आहे. येणाऱ्या नव्या पिढ्यांना हा खराखुरा इतिहास समजला पाहिजे. फक्त आणखी एका गोष्टीची जोड याला द्यायलाच हवी, ती म्हणजे शिवाजी महाराजांचे नाव सध्या जे पुन्हा पुन्हा घेतले जाते आहे, त्याला जातीची जोड दिली जाऊ नये. महाराष्ट्रात जे जातीय राजकारणाचे विष इतिहासात मिसळले गेले आहे, ती घाण गोव्यात आणली जाणार नाही हे संबंधितांनी कटाक्षाने पहावे. शिवाजी महाराज हे समस्त रयतेचे राजे होते. त्यांनी बारा मावळचे लोक जवळ केले. जातीच्या चष्म्यातून आपल्या जनतेकडे कधीही पाहिले नाही. या जिर्णोद्धाराच्या निमित्ताने महाराजांच्या विविध सरदारांच्या वंशजांनाही सरकार बोलावू पाहते आहे. या वंशजांचे कर्तृत्व काही त्यांच्या पूर्वजांएवढे असणे शक्य नाही, त्यामुळे या निमंत्रणाला केवळ एक भावनिक किनार आहे. सप्तकोटेश्वराच्या जिर्णोद्धाराच्या अनुषंगाने आणखी एका गोष्टीची जर राज्यकर्त्यांनी जाणीव ठेवली तर ते गोव्याच्या भल्याचे ठरेल. शिवाजी महाराजांचे जीवन अवघ्या पन्नास वर्षांचे होते. परंतु या अल्प जीवनामध्ये त्यांनी ज्या उच्चकोटीचे, भेदभावरहित, कल्याणकारी प्रशासन आपल्या जनतेला दिले, तो आदर्शही राज्यकर्त्यांनी बाळगल्यास बरे होईल. केवळ पोकळ भाषणबाजीपेक्षा हा आदर्श आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न झाला, तर तो गोव्याला आनंदवनभुवन केल्याशिवाय राहणार नाही.