गोवा मराठी चित्रपट महोत्सवात उत्तमोत्तम चित्रपट

0
108

>> समारोप सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे उद्गार

गोव्याचे व महाराष्ट्राचे नाते नैसर्गिक आहे. ही राज्ये व्यवसायाने जोडली गेलेली नाहीत म्हणूनच गोवा मराठी चित्रपट महोत्सव सुरळीतपणे एक तप पार पडत आहे व प्रत्येकाच्या काळजात या महोत्सवाने घर केले आहे. या महोत्सवात उत्तमोत्तम वेगळे चित्रपट पहायला मिळतात असे उद्गार केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यानी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात काढले व सरकारी अनुदानाविना आजपर्यंत ‘विन्सन वर्ल्ड’ चे शेट्ये बंधू (संजय व श्रीपाद) उत्तम प्रकारे घडवून आणत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व यापुढे सरकारी पातळीवरही या महोत्सवाला मदत लाभेल असे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर नामवंत चित्रपट कलाकार उपेंद्र लिमये, मिलिंद गुणाजी, वर्षा उसगावकर, मृणाल कुलकर्णी, गिरीश जोशी, मेधा द्राढे आदी उपस्थित होते. संजय श्रीपाद शेट्ये यांनी सर्वांचे स्वागत केले.

या महोत्सवासाठी योगदान देत आलेले नामवंत दिग्दर्शक गजेंद्र आहिरे व निर्माते सुनील फडतरे यांचा यावेळी श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’च्या ‘पाणी’चा वर्ल्ड प्रिमियर शो यावेळी दाखविण्यात आला. समारोप सोहळ्यात ‘पाणी’ चित्रपटाच्या ‘टीम’ला वाजत गाजत रंगमंचावर आणण्यात आले त्यात गिरीश जोशी, किशोर कदम यांचा समावेश होता. ललिता जोशी यांनी समारोप सोहळ्याचे सुत्रसंचालन केले. दुष्काळ पाणी आणि ‘प्रेम’चा तीन घटकांचा प्रभावी उपयोग करून ‘पाणी’चे कथानक असलेला हा चित्रपट पहाताना रसिक अंतर्मुख झाले. यात आदिनाथ कोठारे (ज्यांचे दिग्दर्शनही होते) रूचा वैद्य, सुबोध भावे, रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.