केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार राज्याच्या सीमा मंगळवार १ सप्टेंबरपासून खुल्या करण्यात येणार आहे. राज्यात प्रवेशासाठी बंधन असणार नाही. राज्यातील बार ऍण्ड रेस्टॉरंट खुली केली जाणार आहे. सर्वांना सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करण्याचे बंधन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
केंद्र सरकारच्या अनलॉक-४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याच्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रवेशासाठी कुठलेही बंधन असणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद
राज्यातील शिक्षण संस्था सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहतील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांचा आढावा घेण्यात आला आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळ रुग्णांनी भरले आहे. गोमेकॉमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आणखीन वॉर्ड कोरोना रुग्णासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फोंडा येथील दुसर्या कोविड इस्पितळात जास्त रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी हालचालींना गती देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नवीन यंत्रसामग्री उपलब्ध केली जात आहे. इस्पितळात अतिरिक्त डॉक्टर, परिचारिकांची सोय केली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.