गोवा देशाची सांस्कृतिक राजधानी

0
20

>> मंत्री गोविंद गावडे यांचे उद्गार

>> सांस्कृतिक व युवा सृजन पुरस्कार वितरित

गोव्याने देशाला साहित्य, संगीत, नाटक, तियात्र अशा विविध क्षेत्रांत अनेक अष्टपैलू कलाकार दिले असून या कलाकारांनी गोव्यासह देशाचे नाव मोठे केले आहे. गोवा निसर्गसौंदर्य व संस्कृतीमुळे जगाच्या नकाशावर तळपत आहे. त्यामुळे गोवा देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, असे मत कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी येथे व्यक्त केले.

येथील आयएमबी सभागृहात काल राज्य सांस्कृतिक व युवा सृजन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बेतकी – खांडोळा जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप व उपसंचालक अशोक परब उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्यांच्या वतीने लोककलाकार झिलू गावकर व तियात्रिस्त विलियम फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त केले. हा सन्मान माझा एकट्याचा नसून राज्यातील सर्व लोककलाकारांचा आहे. म्हणून या सर्वांच्या वतीने तो स्वीकारतो, असे गांवकर म्हणाले. युवा सृजन पुरस्कार विजेत्यांच्या वतीने छायाचित्रकार राजतिलक नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना हा पुरस्कार म्हणजे चाबुकाचा फटका समजून आणखी जोमाने काम करू असे सांगितले. त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या कलाकारांचा राज्यातील कला व संस्कृती जतनासाठी उपयोग करून घ्यावा अशी विनंती केली.

गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त कलाकारांत रमेशचंद्र कोलवाळकर व मिलिंद म्हाडुगत (साहित्य), गुरुदास गाड (नाटक), लेस मिनेझिस (नाटक), जोसेफिन फर्नांडिस उर्फ बेट्टी नाझ, विलियम फर्नांडिस व डिसोझा (तियात्र), साजू उर्फ मनोहर नाईक (भारतीय संगीत), बाल्ताझार फर्नांडिस (पाश्चिमात्य संगीत), संजय हरमलकर (फाईन आर्टस्), परशुराम काणकोणकर (भजन), ह. भ. प. गजाननबुवा नाईक (कीर्तन), झिलू गावकर (लोककला) यांचा समावेश होता. माशेलच्या महाशाला कला संगम या संस्थेला या वर्षीचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त झाला. मायरोन बार्रेटो (साहित्य), समीर वायंगणकर (संगीत), सिद्धी सुर्लकर पिळगांवकर (संगीत), वनिता कुर्टीकर (नाटक), विशाल गावस (नाटक), अगीमा फर्नांडिस (तियात्र), संदेश नाईक (चित्रकला), राजतिलक नाईक (छायाचित्रण/चित्रकला), प्रेमनाथ केरकर (लोककला) यांना युवासृजन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विजेत्यांना रोख २५ हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करण्यात आले. कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपसंचालक अशोक परब यांनी आभार मानले. राजेंद्र केरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली होती. याप्रसंगी राज्य सांस्कृतिक पुरस्कार व युवा सृजन पुरस्कार प्राप्त कलाकारांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्कार निवड कामात
हस्तक्षेप नाही : गावडे

पुरस्कार विजेत्यांची निवड करताना हस्तक्षेप केला नाही. निवड समितीने पुरस्काराच्या मानकर्‍यांची निवड केली. कोणी माझ्याकडे पुरस्कार मागायला आले नव्हते, असा खुलासा गोविंद गावडे यांनी केला. मात्र, समितीत त्या त्या क्षेत्रातील बुजुर्ग तज्ज्ञ होते का, याबद्दल ते काहीच बोलले नाही.

कलाकारांनी एसओपी पाळायची गरज नाही
पुरस्कार विजेते तियात्रीस्त विलियम फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त करताना सरकारने एसओपी रद्द करण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून सांस्कृतिक मंत्री गावडे यांनी कलाकारांनी एसओपी पाळण्याची काही गरज नाही असे सांगितले. ते म्हणाले, कोविड काळात राजीव गांधी कलामंदिरात नाट्यमहोत्सव घेण्यात आला होता. विशेष म्हणजे यातील एकाही व्यक्तीला कोविड झाला नाही. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास काही गोष्टी सुकर होतात. मनातील भीती काढून तुम्ही तुमचे काम करा, असे ते म्हणाले.