गोवा-दिल्ली नॉनस्टॉप विमानसेवेचेही घोषणा

0
106

२६ पासून एअर इंडियाची गोवा-मॉस्को विमानसेवा
एअर इंडियाने गोवा ते मॉस्को व परत अशी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून येत्या २६ ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे.
गोव्यातून आठवड्यातून चार वेळा विमान सुटणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी दाबोळी विमानतळावरून विमान मॉस्कोला प्रयाण करणार आहे. प्रवासादरम्यान विमान दिल्ली विमानतळावर थांबा घेणार असून रात्री ११.२० वाजता मॉस्को विमानतळावर पोचणार आहे.मास्को ते गोवा दरम्यानची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असेल. रविवार, मंगळवार, गुरुवार व शनिवारी मॉस्को येथून विमानसेवा असेल. मॉस्को येथून विमान पहाटे १ वाजता सुटणार असून दिल्ली येथे काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी १.५ वाजता वास्को येथील दाबोळी विमानतळावर पोचणार आहे.
दरम्यान, एअर इंडियाने गोवा – दिल्ली दरम्यान नॉनस्टॉप सेवेची घोषणा केली आहे. ही विमानसेवा नेहमी सुरू राहणार असून गोव्यातून दुपारी १.४५ वाजता विमान सुटणार असून दिल्ली विमानतळावर ते संध्याकाळी ४.१५ वाजता पोचणार आहे. दिल्ली विमानतळावरून गोव्यात येणारे विमान सकाळी १०.३० वाजता सुटणार असून ते दुपारी १.५ वाजता दाबोळी विमानतळावर पोचणार आहे.
गोवा – मॉस्को दरम्यान विमानसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होती. रशियातील पर्यटकांचे गोवा हे आवडते पर्यटन स्थळ असून तेथील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. गोवा – दिल्ली विमानसेवेचीही मागणी सतत होत होती. वाढते पर्यटक तसेच अधिकार्‍यांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. बहरिन, हॉंगकॉंग, टोकयो, सिंगापूर, दुबई या विदेशी देशांत जाणार्‍या नागरिकांना तसेच पर्यटकांना गोवा-दिल्ली विमानसेवेचा फायदा होणार आहे.