गोवा दिमाखात अंतिम फेरीत

0
96

>> सीनियर महिलांची क्रिकेट स्पर्धा

गोव्याच्या सीनियर महिला संघाने कर्नाटकचा काल रविवारी उपांत्य फेरीत ३ गड्यांनी पराभव केला. यासह गोवा संघाने महिलांच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेची ‘प्लेट’ गटातून अंतिम फेरी गाठली.

संतोषी राणे व रुपाली चव्हाण (प्रत्येकी ४ बळी) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर सुनंदा येत्रेकरच्या नाबाद ४७ धावांच्या बळावर गोव्याच्या संघाने कर्नाटकला हरवून धक्कादायक निकालाची नोंद केली. कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. गोव्याची कर्णधार शिखा पांडेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संतोषी राणेने १० षटकांत ५ निर्धाव षटकांसह केवळ १६ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले. रुपालीने ७.४ षटकांत १७ धावा मोजून चार फलंदाजांना माघारी पाठवून तिला सुरेख साथ दिली. कर्नाटकचा डाव ३६.४ षटकांत १०२ धावांत संपला. त्यांच्या संजना बाटनी हिने सर्वाधिक २४ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त वनिता (१०), दिव्या (१०), प्रत्युषा (१०), आकांक्षा (१२) व १० अवांतर धावांच्या मदतीने त्यांनी शतकी वेस ओलांडली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याची सुरुवात एकदम खराब झाली. २५.२ षटकांअखेर ७ बाद ५७ अशा दयनीय अवस्थेत संघ पोहोचला होता. सुनंदाने यानंतर भारती गावकर (नाबाद १९) हिला जोडीला घेऊन आठव्या गड्यासाठी ४६ धावांची अविभक्त भागीदारी करत संघाचा विजय साकार केला. ३५ षटकांत गोव्याने विजयी लक्ष्य गाठले. २६ रोजी होणार्‍या अंतिम फेरीत गोव्याचा सामना बंगालशी होणार आहे.