गोवा डेअरी संचालक मंडळाला उत्तर देण्यास ५ जुलैपर्यंत मुदत

0
117

>> कथित गैरव्यवहार प्रकरण

कुर्टी, फोंडा येथील गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांनी सहकार निबंधकांसमोर उपस्थित राहून सहकार निबंधकांच्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती काल केली. त्यानुसार सहकार निबंधक संजीव गडकर यांनी नोटिसीला उत्तर देण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण गेले कित्येक दिवस गाजत आहे. सहकार खात्याने कथित गैरव्यवहार प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गोवा डेअरीतील कथित गैरव्यवहाराबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सहकार निबंधकांनी खास चार्टड अकौटंटची समिती नियुक्ती करून २०१२ ते २०१७ या काळातील खरेदी व्यवहाराची तपासणी करून घेतली आहे. या तपासणीमध्ये प्रथमदर्शनी गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. पशुखाद्य कच्चा माल खरेदी, परराज्यांतील दूध खरेदी, आइस्क्रीम यंत्रसामग्री व इतर खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समितीला आढळून आले आहे.

चार्टड अकौटंटच्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सहकार निबंधक गडकर यांनी गोवा डेअरीचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांना कारणे दाखवा नोटीस पाठवून उत्तर देण्याचा आदेश दिला होता. सहकार निबंधकांच्या नोटिसीनुसार संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांनी काल सहकार निबंधकासमोर उपस्थिती लावली.