गोवा डेअरीतर्फे दूध उत्पादकांना दरवाढ

0
152

>> प्रती लिटर एक रुपया वाढ देण्याचा निर्णय

गोवा डेअरीतर्फे राज्यातील दूध उत्पादकांना येत्या १ सप्टेंबरपासून गाईच्या दूध दरात वाढ देण्यात आली आहे. ‘फॅट’प्रमाणे ही दरवाढ प्रतिलीटर किमान ७५ पैसे ते १ रुपया अशी असेल. नवीन दराप्रमाणे ५.५ फॅटसाठी प्रती लिटर ३५.८९ रुपये तर ३.५ फॅटसाठी प्रती लिटर २८.९० रुपये अशी ही दरवाढ असेल. याशिवाय राज्य सरकारची आधारभूत किंमतही उत्पादकांना मिळणार आहे.

गोवा डेअरीच्या संकुलात काल गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीने दरवाढीची घोषणा केली. यावेळी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर, सदस्य अवित नाईक व व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते उपस्थित होते. श्री. शिरोडकर यांनी गोवा डेअरी नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून नवीन समितीने गेल्या जूनमध्ये ताबा घेतल्यापासून डेअरी नफ्यात येण्यास सुरवात झाली असल्याचे नमूद केले. गोवा डेअरीच्या कामकाजात बदल करण्यात आला असून आता एकाच पाळीत काम सुरू असून त्यामुळे ओव्हरटाईम तसेच इतर खर्चावर नियंत्रण आले आहे. दुधाची पाकिटे गळत असल्याचे कारण पुढे करून काही दूध पाकिटे गोवा डेअरीकडे परत यायची, त्यामुळे आता दूध वितरणासाठी चांगले क्रेट उपलब्ध करण्यात आले असल्याने दूध गळतीचा प्रश्न निकाली निघाल्याचे शिरोडकर म्हणाले.

अवित नाईक यांनी मागच्या प्रकरणांचा तपास सुरूच असल्याचे सांगून नवीन उपक्रमांवर भर दिला जात असल्याचे सांगितले. गोवा डेअरीला केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत डेन्मार्क कंपनीचा नवीन मिल्को स्कॅनर पुरस्कृत देण्यात आला असल्याने दुधातील भेसळ आता अवघ्या सेकंदांत समजण्यास उपयुक्त ठरेल, असे अनिल फडते यांनी सांगितले. गोवा डेअरीच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहे, त्यामुळे भविष्यात गोवा डेअरी अधिक नफ्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

तूप निर्मितीवर भर
नफ्यासाठी आता गोवा डेअरीने तूप उत्पादनावर भर दिला असून गोवा डेअरीच्या तुपाला बाजारात चांगली मागणी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.