गोवा घोषणापत्रात दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार

0
106

 

>> पाकिस्तान ही ‘दहशतवादाची जननी’ ः पंतप्रधान
>> ‘ब्रिक्स’ परिषदेची सफल सांगता
>> ‘बिमस्टॅक’ परिषदेचा शुभारंभ

दहशतवाद हा वाढता धोका असून त्याविरोधात ठामपणे लढताना सहकार्य करण्यावर ब्रिक्स शिखर परिषदेत मान्य करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी ताज एक्झोटिका या पंचतारांकित हॉटेलात ब्रिक्स परिषदेचा समारोप झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आतंकवादाला थारा देणारे, तसेच त्यांना पाठिंबा देणारे, प्रोत्साहन देणारेही आतंकवादाएवढेच दोषी आहेत यावर गोवा घोषणापत्रात एकमत झाल्याचे मोदी म्हणाले.

काल ब्रिक्स शिखर परिषदेत तीन सत्रांत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात मुख्य भर होता तो संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या दहशतवादाचा. हा मुद्दा उपस्थित करत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची कोंडी करण्यावर काल भर दिला. आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठीची शस्त्रास्त्रे व युद्ध सामग्री यासाठी परस्पर सहकार्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. आतंकवादाबरोबरच अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य तसेच सुरक्षेसंबंधीही सहकार्य करण्याचा ब्रिक्स राष्ट्रांनी निर्धार केल्याचे मोदी म्हणाले. वरील सर्व मुद्दे हे गोवा घोषणापत्राचा (गोवा डिक्लेरेशन) भाग होते, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. पाकिस्तानचे नाव न घेता मोदी यांनी यावेळी पाकवर जोरदार हल्ला चढवला.
अर्थ व्यवस्था व व्यापार याला चालना देणे हे ब्रिक्सच्या स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट होते. दर्बन येथे त्यासाठी तीन वर्षांपूर्वी ब्रिक्स व्यवसाय मंडळाची स्थापना करण्यात आली होती. ब्रिक्स देशांत व्यवसाय वृद्धिंगत करण्यात, तसेच ब्रिक्स देशांमध्ये व्यापाराला चालना देण्यास या मंडळाने महत्त्वाचे योगदान दिले असून त्याकामी येणारे अडथळे दूर करण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, ब्रिक्स शिखर परिषदेसंबंधीचा जाहीरनामा मांडताना मोदी म्हणाले की, ब्रिक्स देशांमधील परस्पर व्यापारी सहकार्याला चालना देण्याच्याबाबतीत उद्योग क्षेत्रातील व्यक्ती हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या सहकार्यामुळे संपत्तीची निर्मिती होत असते व त्यामुळे आमची पतही वाढत असते. त्याशिवाय उत्पादन वाढ असल्याने रोजगाराचीही निर्मिती होते. भारतात व्यवसाय करणे सोपे व्हावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आवश्यक त्या दुरुस्त्या घडवून आणल्या आहेत. त्यामुळे एक सुसूत्रता निर्माण झाली असल्याचा दावाही मोदी यांनी केला. याचा परिणाम असा झाला की मुक्त अर्थव्यवस्था म्हणून भारताने जागतिक स्तरावर भरारी घेतल्याचे ते म्हणाले. परिणामी भारताची आर्थिक वाढ गतीने होऊ लागलेली असून हा वेग असाच कायम राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यू डेव्हलपमेंट बँक
सर्व ब्रिक्स देशांच्या प्रयत्नांचे ङ्गळ असलेली न्यू डेव्हलपमेंट बँक सध्या पूर्णपणे कार्यरत झाली असल्याचे मोदी यांनी सांगितले. बँकेने स्वच्छ ऊर्जा (क्लिन एनर्जी) व हरित आणि सातत्यपूर्ण साधनसुविधा यांना प्राधान्य दिले असल्याचे ते म्हणाले.
या बँकेने आपल्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांचे काम सुरू केल्याबद्दल मोदी यांनी बँक व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. ब्रिक्स बिझनेस कौंसिलने (व्यवसाय मंडळ) न्यू डेव्हलपमेंट बँकेशी हातमिळवणी करून काम करावे असे सांगून भारताने दोन दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे पहिल्या ब्रिक्स व्यापारी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहितीही मोदी यांनी दिली. ब्रिक्स देशांमध्ये व्यापाराला चालना देण्याबरोबरच एकमेकांबरोबरचा व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे व कार्यक्रमांची गरज यावेळी मोदी यांनी व्यक्त केली.
परस्पर सहकार्य हवे : रशिया
यावेळी बोलताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी रशिया सर्व ब्रिक्स देशांना आवश्यक ते सहकार्य करील, असे आश्‍वासन दिले. ब्रिक्स देशांचा सातत्यपूर्ण विकास व आर्थिक वृद्धी यासाठी परस्पर सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गुंतवणुकीला चालना द्या : चीन
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आहे. त्यामुळे ब्रिक्स राष्ट्रेही मंदीच्या सावटाखाली वावरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ब्रिक्स देशांना गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. आवश्यक त्या सुधारणा घडवून आणाव्या लागतील अशी सूचना त्यांनी केली.
दक्षिण आङ्ग्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी ब्रिक्स देशांनी साधनसुविधा विकास, ऊर्जा निर्मिती, हवाई वाहतूक व उद्योगधंदे यांच्या विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली. ब्रिक्स राष्ट्रांनी परस्पर सहकार्यामुळे प्रगती साधलेली असल्याचे ते म्हणाले.
ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल तेमेर यांनी ब्राझिलच्या अर्थ व्यवस्थेच्या विकासासंबंधी विश्‍वास व्यक्त करत भारत, रशिया, चीन आदी देशांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

क्षणचित्रे
दहशतवाद प्राधान्याचा मुद्दा
काल दिवसभर भरगच्च कार्यक्रमात दहशतवाद प्राधान्याचा मुद्दा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला ब्रिक्सच्या सर्व सदस्य देशांनी पाठिंबा दिला. दहशतवादाविरुद्ध लढण्यावर सहकार्य करण्याचे मान्य करून ब्रिक्स परिषदेचा समारोप झाला. कृषी संशोधन व्यासपीठाची स्थापना करण्यासाठी काल ब्रिक्स देशांत समझोता करार झाला. यानंतर ब्रिक्स देशांच्या प्रमुखांचे ताज हॉटेलमध्ये खास ङ्गोटो सेशन झाले. तद्नंतर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी रात्री ९.३० वाजता तर दक्षिण आङ्ग्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी रात्री १०.३० वाजता मायदेशी प्रयाण केले.
बिमस्टॅक परिषदेचा शुभारंभ
भारत, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान व नेपाळ या देशांचा समावेश असलेल्या बिमस्टॅक शिखर परिषदेचा काल लीला या पंचतारांकित हॉटेलात शुभारंभ झाला. या देशांच्या प्रमुखांचे काल गोव्यात आगमन झाले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. या परिषदेचा समारोप आज होणार आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी चर्चेवर अधिक भर दिला होता. ‘बिमस्टॅक’मध्येही मोदी दहशतवादाचा मुद्या लावून धरण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान ही ‘दहशतवादाची जननी’: मोदी

भारताचा शेजारी देश दहशतवादाची जननी आहे. त्या देशात केवळ दहशतवाद्यांना पोसलेच जात नाही, तर त्या देशाची विचारधारा, मानसिकताही दहशतवादीच आहे, असा जोरदार हल्ला काल ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानचे नाव न घेता चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची कोंडी केली. शेजारी देश दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने भारताच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याचे मोदी यांनी परिषदेत ठासून सांगितले. दहशतवादाला मदत करणार्‍यांना बक्षीस न देता त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे असे वक्तव्य करून मोदींनी चीनलाही खडेबोल सुनावले.
पाकिस्तानच्या दहशतवादी कारनाम्यांचा पाढा वाचन मोदी म्हणाले की, जगभरातील दहशतवादी कारवाया या जन्मभूमीशी जोडलेल्या आहेत. राजकीय ङ्गायदा उठवण्यासाठी त्या देशात दहशतवादाचा वापर केला जातो. त्यांची मानसिकताच तशी आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. आज पश्‍चिम आशिया, दक्षिण आशिया तसेच आखाती देश दहशतवादाच्या छायेखाली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच आर्थिक विकासाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. भारतातील शांतता, सुरक्षा व विकासापुढेही दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. जगभरातील दहशतवादाला या देशातूनच प्रोत्साहन, पाठिंबा मिळतो. याविरुद्ध लढा उभारून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांनी विशेष परिषदेचे आयोजन करून आवाज बुलंद करण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. ब्रिक्स देशांनी सीसीआयटीचा स्वीकार करून दहशतवादाविरोधात लढण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्याची गरज मोदी यांनी प्रतिपादली.