पर्वरी पोलीस स्थानकात तणावाचे वातावरण
राज्यात गुरांच्या कत्तलीवर बंदी आणावी अशी सातत्याने मागणी करणा-या गोवंश रक्षा अभियानाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी म्हापसा पर्वरी महामार्गावर गुरे वाहून नेणार्या तीन वाहनांना अडवून पर्वरी पोलीस स्थानकात आणली. या तीन वाहनातून अनुक्रमे ५, ६ व ८ गुरे आढळून आली.
गोवंश रक्षा अभियानाचे उपाध्यक्ष कमलेश बांदेकर, प्राणी मित्र अमृतसिंग यांनी यावर आक्षेप घेतला. उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये, उपाधीक्षक नेल्सन अल्बुकर्क आणि निरीक्षक ब्रेंडन डिसोझा यांनी वाहनातील कागदपत्रांची आणि गुरे वाहतूक करण्याचा परवाना तपासला असता महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वाहतूक खात्याचा परवाना तसेच पशु संवर्धन खात्याचा वयोमर्यादेचा रीतसर परवाना वाहन चालकाकडे असल्याचे निदर्शनास आले. उपजिल्हाधिकारी शेट्ये आणि उपअधीक्षक अल्बुकर्क यांनी अभियानाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून वाहनांना जाण्यास परवानगी दिली. यावेळी भारत स्वाभिमान, हिंदू जनजागृती समिती आणि प्राणी रक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्वरी पोलिस स्थानकात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु उपजिल्हाधिकारी शेट्ये, उपअधीक्षक अल्बुकर्क, निरीक्षक डिसोझा आणि उपनिरीक्षक सोमनाथ माजिक यांनी पोलिस कर्मचार्यांच्या सहकार्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
गोवंश रक्षा समिती देणार राजकारण्यांना इशारा
संबंधित ठराव आज संमत करणार
पणजी (प्रतिनिधी): गोवंशाच्या रक्षणाच्या बाबतीत सत्ताधारी तसेच विरोधी राजकारण्यांना इशारा देण्यासंबंधीचे महत्वाचे ठराव आज संमत करणार असल्याचे गोरक्षा समितीचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी सांगितले. ईद असो किंवा फेस्त असो. त्यांच्या नावाखाली गुरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते. ती पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी गोरक्षा समितीने शनिवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. गोवंशाच्या रक्षणासाठी समाजात जागृती निर्माण करणार असे परब यांनी सांगितले. काल आझाद मैदानावर पंचकुडी गायित्री महायज्ञ करण्यात आला. गोहत्त्या बंद करण्यासाठी आमदार, मंत्र्यांना चांगली बुध्दी देवो, यासाठी वरील महायज्ञ केल्याचे परब यांनी सांगितले. गायित्री परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण जोशी यांनी मार्गदर्शन केले. भारत स्वाभिमानचे कमलेश बांदेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश गाडगीळ, हिंदू जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोळुंके, गोप्रेमी बाप्तीश डायस आदींची भाषणे झाली. कामधेनू योजनेसाठी देशी गायींचा वापर करण्याची जोरदार मागणी वक्त्यांनी केली.