शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल भाजपकडून निषेध

0
105

चालू महिन्यात दहाव्यांदा उल्लंघन
नियंत्रण रेषेनजीक भारतीय हद्दीत पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार उल्लंघन केले जात असल्याप्रकरणी भाजपने काल निषेध केला. ‘या कृतीचा आम्ही निषेध करीत आहोत. जे काम करायची आवश्यकता आहे ते करणे आता संरक्षण दलांवर अवलंबून आहे’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल प्रसारमाध्यमांकडून त्यांना या संदर्भात विचारले असता व्यक्त केली.
पाकिस्तानमध्ये अनेक अंतर्गत समस्या आहेत याचा उल्लेख करून प्रसाद म्हणाले की नरेंद्र मोदी भारताचे नेतृत्व करीत आहेत आणि पाकिस्तान त्यामुळे वैफल्यग्रस्त बनला आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शस्त्रसंधी उल्लंघनांना भारत जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे याकडे लक्ष वेधले असता प्रसाद यांनी मुशर्रफ यांना त्यांच्याच देशात कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आपण कोणी त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
पाक सैन्याकडून शस्त्रसंधी उल्लंघनाचे सत्र सुरूच
पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे सत्र चालूच ठेवले असून काल रविवारीही त्यात खंड पडला नसल्याचे सांगण्यात आले. चालू महिन्यातील हे सहावे शस्त्रसंधी उल्लंघन आहे. पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक भारतीय लष्करी ठाण्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. अशी माहिती भारतीय लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल मनिष मेहता यांनी दिली. मात्र पाक सैन्याच्या या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे ते म्हणाले. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.