गोमेकॉत सिंधुदुर्गमधील रुग्णांसाठी सोमवारपासून आरोग्यमित्र काऊंटर

0
86

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य मित्र काउंटर सोमवारपासून सुरू केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. गोमेकॉमध्ये रुग्णांसाठी शुल्क लागू करण्यात आल्यानंतर शेजारी राज्यातील रुग्णांची गैरसोय होत होती. आरोग्य सुविधेसाठी शुल्क भरावा लागत होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही जणांनी शुल्काला विरोध करून मोफत सेवा देण्यासाठी आंदोलन सुरू केले होते.

सिंधुदुर्ग जिल्हातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी रात्री मुंबईत भेट घेऊन या समस्येवर तोडगा काढला आहे. महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतिबा फुले विमा योजनेखाली गोमेकॉचा समावेश करण्यात आला आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून गोमेकॉला रुग्णांवरील खर्चाची रक्कम दिली जाणार आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

बांबोळी येथे गोमेकॉमध्ये महाराष्ट्र सरकारच्यावतीने आरोग्य मित्र काउंटर सुरू केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांनी प्रथम या काउंटरवर नोंदणी केल्यानंतर गोमेकॉमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार रेशन कार्डाच्या आधारावर विमा योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून देत आहे, असेही राणे यांनी सांगितले. गोमेकॉमधील शुल्क मागे घेणे शक्य नाही. गोमेकॉमध्ये रुग्णांना शुल्क लागू करण्यात आल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्याफुले विमा योजनेचा दर चांगला असल्याने अतिरिक्त महसूल मिळू शकतो.

क्रॉस मसाजची दखल
राज्यातील मसाज पार्लरमधील क्रॉस मसाजाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या मसाज पार्लरवर कारवाईला बळकटी मिळवून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. आरोग्य अधिकार्‍यांना अधिक अधिकार दिले जाणार आहे. तसेच कायद्यांचे उल्लंघन करणार्‍यांचा परवाना रद्दची तरतूद केली जाणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले. मसाज पार्लरबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार आहे.