गेहलोत यांची माघार

0
18

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे काल जाहीर केले. त्यांच्या जागी राहुल गांधींचा कृपाशिर्वाद असलेल्या सचिन पायलट यांची वर्णी लावण्याचा कॉंग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न गेहलोत समर्थकांचे बंड आणि सामूहिक राजीनामे यामुळे फसल्याने गेहलोत यांनी गांधी कुटुंबाची नाराजी ओढवून घेतली होती. त्यामुळे ज्या सोनिया गांधींच्या आग्रहाखातर गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले होते त्यांचाच पाठिंबा न राहिल्याने गेहलोत यांची कोंडी झाली होती. त्यामुळे निरुपायाने त्यांना ह्या उमेदवारीवर पाणी सोडावे लागले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्रिपद त्यांच्यापाशी उरते की नाही हेही आता कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मर्जीवर अवलंबून राहणार आहे. आपल्या समर्थकांनी उगारलेल्या राजीनामास्राशी आपला काही संबंध नव्हता असे गेहलोत कितीही कंठरवाने सांगत असले तरी त्यांच्या आशिर्वादाविना एवढा संघटित विरोध सचिन पायलट यांना झाला नसता हेही तितकेच खरे आहे.
गेहलोत यांची कोंडी होताच एकाएकी दिग्विजयसिंग यांनी आपले घोडे पुढे दामटवलेले दिसते. दिग्विजयसिंग गांधी घराण्याचे निष्ठावंत आहेतच, शिवाय भाजप आणि रा. स्व. संघाचे ते पराकोटीचे विरोधक आहेत. त्यामुळे गेहलोत यांच्यावर इतराजी झालेल्या गांधी कुटुंबाच्या आशीर्वादानेच ते ह्या निवडणुकीच्या रिंगणात आता उतरलेले असू शकतात. मात्र, दिग्विजयसिंग हे त्यांच्या फटकळपणाबद्दल कुख्यात आहेत. वाट्टेल ते बोलून वाद अंगावर ओढवून घ्यायची त्यांची खोड जुनीच आहे. त्यामुळे असा वाचाळ नेता कॉंग्रेस पक्षाला चालणार आहे का हा प्रश्नच आहे.
निवडणुकीच्या रिंगणात सर्वशक्तीनिशी उतरलेले तिसरे नेते आहेत शशी थरूर. पण ते दक्षिण भारतातून आले आहेत, उच्चभ्रू लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे सोनिया गांधींविरुद्ध बंड पुकारणार्‍या तेवीस जणांच्या गटात तेही होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला गांधी कुटुंबाचा पाठिंबा मिळणे शक्य नाही. शेवटी काहीही झाले आणि कोणीही उभे राहिले तरी गांधी घराण्याचा पाठिंबा असलेली व्यक्तीच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडून येणार आहे हे स्पष्ट आहे. ज्या प्रकारे राज्याराज्यांमधून प्रदेश कॉंग्रेस समित्या राहुल गांधींना पाठिंबा दर्शवीत आल्या आहेत, ते पाहिले तर अजूनही गांधी घराण्यानेच पक्षाचे नेतृत्व करावे हेच पक्षामधील होयबा संस्कृतीमध्ये वाढलेल्या नेत्यांना वाटते हेच ह्यावरून दिसून येते. गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीच्या हाती पक्षाची सूत्रे गेली तर आधीच गाळात चाललेला पक्ष एकसंधही राहणार नाही ही भीतीही काहींना आहे.
दुसरे म्हणजे ज्यांची ज्यांची नावे आतापर्यंत अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे आलेली आहेत, ते सगळे काहीही झाले तरी शेवटी प्रादेशिक नेते आहेत आणि जरी वेळोवेळी राज्यांचे संकटमोचक म्हणून त्यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून विविध राज्यांमध्ये पाठवले जात असले, तरी राष्ट्रीय नेत्याची त्यांची प्रतिमा कधी निर्माण होऊ शकलेलीच नाही. मुळात कॉंग्रेस म्हटले की गांधी घराण्यापुढे सगळे झाकोळतच आलेले आहेत. त्यामुळे उद्या कोणीही पक्षाचा अध्यक्ष जरी झाला तरी शेवटी पक्षाची सूत्रे गांधी घराण्याकडेच उरणार आहेत. नुकताच पी. चिदंबरम यांनी इंडियन एक्स्प्रेसमधील आपल्या स्तंभामध्ये, कॉंग्रेस पक्षाच्या संस्कृतीत पक्षाध्यक्ष आणि पक्षनेता हे सदैव वेगवेगळेच राहिलेले आहेत हा मुद्दा ठासून मांडला आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी हे जरी पक्षाध्यक्षपदावर नसले तरी पक्षाचे त्या त्या काळात खरे नेते होते ह्याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता देखील पक्षाध्यक्षपदाची माळ कोणाच्याही गळ्यात पडली, तरी शेवटी शीर्षनेता म्हणून अंतिम शब्द सोनिया आणि राहुलचाच चालेल. तो चालू दिला गेला नाही तर पक्ष फुटेल. वर्षानुवर्षे पक्षात मुरलेली होयबा संस्कृती अशी एकाएकी नष्ट होणे शक्य नाही.
जसजसा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोळ वाढत चालला आहे, तसतशी राहुल गांधी यांनी रिंगणात उतरावे अशी मागणी वाढत चालली आहे. राहुल त्याला अजूनही अनुत्सुक आहेत. त्यामुळे आता तर प्रियांका गांधींचेही नाव पुढे आणले गेले आहे. आजपासून अर्ज भरले जातील. शशी थरूर तर गुडघ्याला बाशिंग बांधून कधीच बसले आहेत. आता गेहलोत यांनी माघार घेतल्याने गांधींच्या वरदहस्तानिशी दिग्विजयसिंग ह्या निवडणुकीत उतरतील असे दिसते. ते अध्यक्षपदी आले तर अर्थातच पक्षाची खरी सूत्रे त्यांना विजयापर्यंत पोहोचवणार्‍या सोनियांपाशीच उरतील. गेहलोत यांच्यावरील वरदहस्त तूर्त काढून घेतला गेला आहे असे दिसते. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदाचीच खुर्ची आता राहते की नाही हे पाहावे लागेल.