गेल्या १० दिवसांत २८,२९२ कोरोनाबाधित

0
123

>> मे महिन्यात मृत्यूसत्र कायम; ५०७ जण पडले कोरोनाला बळी

राज्यात गेल्या २४ तासांत ५० रुग्णांचा बळी गेला असून, नव्या २८०४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या १० दिवसांत २८,२९२ कोरोनाबाधित सापडले असून, एकूण सक्रिय रुग्ण संख्या ३२,२६२ वर पोहोचली आहे. मे महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत ५०७ जणांचा बळी गेला असून, राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १७२९ एवढी झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत इस्पितळामधून १६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. मागील २४ तासांत आणखी ५० कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये २८ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात १५ रुग्ण, उत्तर गोवा इस्पितळ, ईएसआय इस्पितळ, म्हापसा आणि बेतकी येथे प्रत्येकी १ रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात २ रुग्णांचा, तर दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, २४ तासात बळी पडलेल्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या तीन जणांचा समावेश आहे.
नवे २८०४ रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येण्याचे प्रमाण कायम आहे. २४ तासांत नवे २८०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या ६१०७ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. राज्यात कोविड स्वॅबबाधित होण्याचे प्रमाण ४५.९१ टक्के एवढे आहे. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित संख्या १ लाख २१ हजार ६५० एवढी झाली आहे.
मडगावात सर्वाधिक २६८८ रुग्ण
राजधानी पणजी, मडगाव, कांदोळी, फोंडा, पर्वरी, म्हापसा या भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मडगावातील रुग्णसंख्या २६८८ एवढी झाली आहे. पणजीतील रुग्णसंख्या १८६४ वर पोहोचली आहे. कांदोळीत १७४८, पर्वरीत १५९६ , म्हापशात १६८०, फोंड्यात १७४५, कुठ्ठाळीत १२७१, साखळीत १४०१, पेडण्यात ११३४, शिवोलीत ११२४, चिंबलमध्ये १२०९, वास्कोत १०४३ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील इतर भागात सुध्दा रुग्ण संख्या वाढत आहे.
२४ तासांत ३०९ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नव्या ३०९ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे.

२३६७ जण कोरोनामुक्त
राज्यातील काल २३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ८७ हजार ६५९ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०६ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २३२७ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.