गुरूवारी कोरोनाने एकाचा मृत्यू

0
235

राज्यात काल गुरूवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे बळी गेलेल्यांची एकूण संख्या ७२८ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ९० नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५०,४५४ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या १००१ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५७ टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात ८८ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४८,७२५ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. काल खात्यातर्फे १७९३ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.

कोरोना संसर्ग झालेल्या १४,१६६ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २६,४०३ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ३,८८,२१० एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक १०४ रुग्ण असून फोंड्यात ६६ व केपे इथे ६१ रुग्ण आहेत. उत्तर गोव्यातील पणजीत ६८ तर पर्वरीत ६१ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे २७५ खाटा रिक्त झाल्या आहेत. तर दक्षिण गोव्यातील ६० पैकी ४३ खाटा रिक्त असून तिथे १७ जण उपचार घेत आहेत. काल कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ६२ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर १९ जणांनी इस्पितळात विलगीकरणात राहण्याचे ठरवले.