- शशांक मो. गुळगुळे
‘प्रायव्हेट इक्विटी’ हा घटक भांडवली स्रोत ठरला असून तो वित्तपुरवठ्याची तीव्र गरज असलेल्या कंपन्यांना पाळबळ देतो. तसेच नफा कमविणाऱ्या उद्योगाच्या वाढीला चालनाही देतो. तसेच रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगती यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
‘प्रायव्हेट इक्विटी’ म्हणजे खाजगी भागमालकी. हा गुंतवणुकीचा पर्याय पारंपरिक गुंतवणुकीच्या पलीकडे जात, विशेषतः नवउद्योग व सुस्थापित कंपन्यांच्या विकासासाठी विक्रीकौशल्य व स्थिर भांडवल आणतो. हा गुंतवणुकीचा असा प्रकार आहे, ज्यात श्रीमंत व्यक्ती त्यांचा पैसा शेअर बाजारात नोंदणी न झालेल्या खाजगी कंपन्यांत गुंतवितात. फार मोठ्या प्रमाणावर संपत्ती असलेले गुंतवणूकदार शेअर बाजारात अथवा नेहमीच्या अन्य पर्यायांत गुंतवणूक करण्यापेक्षा कालांतराने आकर्षक परतावा मिळविण्यासाठी हा ‘प्रायव्हेट इक्विटी’चा मार्ग पत्करू शकतात. ‘प्रायव्हेट इक्विटी’ दीर्घकाळात पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा उच्च परतावा मिळवून देते. या गुंतवणुकीचे यश संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते आणि त्या निर्णयांवर गुंतवणूकदारांचे नियंत्रण नसते. संस्था आणि धनिक गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचा काही हिस्सा या ‘प्रायव्हेट इक्विटी’मध्ये गुंतवितात आणि यातून खाजगी कंपन्यांना विस्तारासाठी निधी पुरवून त्यांच्या व्यवसायाची वाढ घडवू शकतात.
‘प्रायव्हेट इक्विटी’ गुंतवणुकीचे प्रकार
व्हेंचर कॅपिटलिस्ट ः हे गुंतवणूकदार विकासाचे उच्च सुप्त सामर्थ्य असलेल्या उगवत्या टप्प्यातील कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतात. ते नवउद्योगांना (स्टार्ट-अप) निधी व कौशल्य पुरवून त्यांचा व्यवसाय विकसित करण्यास व त्याचा आवाका वाढविण्यास मदत करतात.
ग्रोथ कॅपिटल इन्व्हेस्टर ः हे गुंतवणूकदार अधिक सुस्थापित कंपन्यांना लक्ष्य करतात, ज्यांना विस्तारासाठी आणि प्रगतीला चालना देण्यासाठी भांडवलाची गरज असते. ते कंपनीच्या भविष्यातील विकासाला पाठबळ देण्यासाठी निधी पुरवितात.
बायआऊट फंड ः हे गुंतवणूकदार सुस्थापित कंपन्यांत नियंत्रक हिस्सा मिळविण्यात पारंगत असतात. त्यातून ते बहुतेक वेळा लक्षणीय परतावा मिळविण्यासाठी अशा कंपन्यांची फेररचना घडवून त्यांची कामगिरी सुधारतात.
स्पेशलाइज्ड फंड ः स्पेशलाइज्ड फंड हे प्रायव्हेट इक्विटी यात येतात. जे रिअर इस्टेट, पायाभूत सुविधा, आरोग्यनिगा अथवा तंत्रज्ञान अशा उद्योगांवर लक्ष केंद्रित करतात.
भारतातील ‘प्रायव्हेट इक्विटी’ची 2
000 साली सुरुवात झाली. तरुण लोकसंख्या, एकूण देशांतर्गत उत्पादनाची भक्कम वाढ आणि अनुत्पादक मालमत्तांचे घटलेले प्रमाण यामुळे ‘प्रायव्हेट इक्विटी’ला चालना मिळाली. मात्र या गुंतवणुकीची कामगिरी 2005 ते 2008 हा कालावधी वगळता इतर कालावधीत समाधानकारक झाली नाही. याचे कारण म्हणजे ‘ब्रिक्स’ (ब्राझिल, रशिया, भारत, चीन व द. आफ्रिका) गटातील देशांत मिळून जितक्या कंपन्या स्थापन झाल्या, तेवढ्या भारतात झाल्या नाहीत. अनेक खाजगी उद्योगांनी प्रायव्हेट इक्विटी घेण्याआधीच सार्वजनिक भागविक्रीचा मार्ग अनुसरला. भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन 2021 नंतर घटते राहिले. तरीही प्रायव्हेट इक्विटीचे पाठबळ मिळालेल्या भारतातील कंपन्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेत महसूल व नफावाढ यामध्ये प्रशंसनीय कामगिरी केली. आता भारतात प्रायव्हेट इक्विटी हा महत्त्वपूर्ण भांडवल स्रोत म्हणून उदयाला आला असून निधी उभारणी सहकार्य, कर व नियामक साह्य, जोखीम व्यवस्थापन, कंपनी वित्त सल्लागार व विश्लेषण सेवा अशा अनेक सेवा प्रायव्हेट इक्विटीमुळे खाजगी कंपन्यांना मिळत आहेत.
प्रायव्हेट इक्विटी गुंतवणुकीत अशा फंंडांचा समावेश असतो जे खाजगी कंपन्यांत थेट गुंतवणूक करतात किंवा सार्वजनिक कंपन्यांच्या विक्रीत सहभागी होऊन त्यांचे खाजगीकरण करतात. प्रायव्हेट इक्विटी फर्म्स पेन्शन फंड, एण्डॉमेन्ट व श्रीमंत व्यक्ती अशा गुंतवणूकदारांकडून फंड स्थापनेसाठी भांडवल उभारतात. पीई कंपन्या संपर्कजाळे, उद्योगातील संबंध व वित्तीय सल्लागार अशा विविध माध्यमातून गुंतवणुकीच्या सुप्त संधी निश्चित करतात. गुंतवणूक करण्यापूर्वी पीई कंपन्या कंपनीचा सविस्तर अभ्यास करतात व तिची आर्थिक स्थिती, व्यवस्थापक, बाजारपेठेतील स्थान, प्रगतीच्या संधी व संभाव्य जोखीमा यांचा आढावा घेतात. पीई कंपनी गुंतवणुकीची अशी रचना करते, ज्याद्वारे कंपनीत नियंत्रक किंवा लक्षणीय अल्पसंख्या हिस्सा संपादन करता येतो. गुंतवणुकीनंतर पीई फर्म कंपनीच्या व्यवस्थापनाला सहकार्य करून कंपनीचे मूल्यवर्धन करण्यासाठी कामकाजात्मक सुधारणा, व्यूहात्मक पुढाकार व खर्च बचतीचे उपाय राबविण्यासाठी मदत करतात. पीई गुंतवणुकीचे सर्वोच्च ध्येय हे गुंतवणूकदारांसाठी लक्षणीय परतावा निर्माण करण्याचे असते. त्यामुळे ते फायदा मिळताच काही काळाने अशा गुंतवणुकीतून बाहेर पडू शकतात. खाजगी कंपनीची प्राथमिक समभाग विक्री होताना किंवा आपला वाटा इतर कंपनीला विकून किंवा फेरभांडवलीकरण अशा या पद्धती असतात. एकदा गुंतवणुकीतून बाहेर पडल्यावर मिळालेला नफा पीई फर्मच्या गुंतवणूकदारांमध्ये फंडाच्या कराराच्या नियमांनुसार वितरित केला जातो. पीई फर्म व्यवस्थापन शुल्क व झालेल्या नफ्यावरील व्याजाची आकारणी करते.
भारतातील प्रायव्हेट इक्विटी हा घटक मौल्यवान भांडवली स्रोत ठरला असून तो वित्तपुरवठ्याची तीव्र गरज असलेल्या कंपन्यांना पाळबळ देतो. तसेच नफा कमविणाऱ्या वाढीला चालनाही देतो. भारताची अर्थव्यवस्था सातत्याने जोरदारपणे कामगिरी करीत असताना प्रायव्हेट इक्विटी उद्योजकतेला चालना, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगती यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.