गालजीबागमधील हंगामी शॅक्स हटविण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत

0
97

हरित लवाद मंडळाचा आदेश
गालजीबाग किनार्‍यालगतचे सर्व हंगामी शॅक्स हटविण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली असून या किनार्‍यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत असा आदेश हरित लवाद मंडळाने अभयारण्य विभागाला दिला आहे. त्यामुळे या किनार्‍यावरील पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.या किनार्‍यावर कासव पैदास केंद्र जतन आणि संवर्धन केंद्राखाली अभयारण्य विभागाने आवश्यक ती सर्व यंत्रणा उभारली असताना ज्युलियो संतान कार्व्हालो, सुर्या प्रकाश पागी, चंद्रहास प्रकाश पागी, तेलविजा कार्लिट डिसोझा, जॉकीस संता डायस, संतोष लक्ष्मण पागी, दया हरिश्‍चंद्र पागी, फेर्मिना फ्रान्सिस्क बार्र्‍हेटो, पुरुषोत्तम रामदास पागी, सचिन कमलाकर पागी, परशुराम रामदास पागी, प्रताप शाबा पेेडणेकर, तुळशीदास कोमरपंत, दीक्षिता दीपक कोमरपंत, उमेश सोयरू सादोळशेकर, गणपत केळुस्कर आणि सुकोर डायस यांनी पर्यटन व्यवसाय सुरू केल्यामुळे या व्यक्तीना हरित लवादाकडे पैंगीणकरांच्या एकवट या संघटनेने तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची नोंद घेऊन सीआरझेडने सर्वेक्षण करून जो अहवाल हरित लवाद-पुणे या ठिकाणी सादर केल्यानंतर तीन आठवड्यांच्या मुदतीत संपूर्ण किनारपट्टी साफ करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकारामुळे गालजीबाग किनारपट्टीबरोबरच आगोंदा, मोरजी, मांद्रे या भागातील व्यावसायिक देखील अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या व्यावसायिकांना पर्यटन व्यवसाय सुरू करताना आवश्यक त्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पंचायत अडचणीत येण्याची शक्यताच नसल्याची प्रतिक्रिया सरपंच महेश नाईक यांनी व्यक्त केली.