गाझामध्ये युद्धविरामास इस्रायल तयार

0
4

हमासचीही शांतता प्रस्तावाला सहमती

गाझामधील दोन वर्षांचे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास सहमत झाले आहेत, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली.
इस्रायल आणि हमास यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने तयार केलेल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शविली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. या करारामुळे गाझामध्ये सुरू असललेे युद्ध थांबेल. तसेच कैद्यांची सुटकादेखील होईल. काल गुरुवारी 9 रोजी इजिप्तमध्ये झालेल्या या करारावर हमासने सहमती दर्शविल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली.

इस्रायल आणि हमासची सहमती
ट्रम्प यांनी ट्रुथआउट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी, इस्रायल आणि हमास दोघांनीही आमच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शविली आहे. त्यामुळे सर्व ओलिसांना लवकरच सोडले जाईल आणि इस्रायली सैन्य एका निश्चित सीमेवर माघार घेईल. हे शांततेच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे म्हटले आहे. हा अरब आणि मुस्लिम देश, इस्रायल, सर्व शेजारी देश आणि अमेरिकेसाठी एक मोठा दिवस आहे. ही ऐतिहासिक कामगिरी शक्य करण्यात मदत करणाऱ्या कतार, इजिप्त आणि तुर्कीमधील मध्यस्थांचे आम्ही आभार मानतो, असेही ट्रम्प म्हणाले.

हे राजनैतिक यश ः नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही या करारावर प्रतिक्रिया देताना, शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्यानंतर, सर्व बंधक आता घरी परततील. हा एक राजनैतिक यश आणि इस्रायलसाठी नैतिक विजयाचा दिवस आहे. आमच्या सर्व बंधकांना परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला.
करार झाल्यानंतर 72 तासांच्या आत ओलिसांना सोडण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी इजिप्तमध्ये झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेनंतर हा करार झाला. या करारात गाझामधून इस्रायली सैन्याची माघार आणि कैद्यांची देवाणघेवाण यांचा समावेश आहे. करार अंमलात आल्यापासून 72 तासांच्या आत सर्व जिवंत इस्रायली ओलिसांना सोडण्यात येईल आणि त्या बदल्यात सुमारे 2000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल.

इस्रायल गाझामधून माघार घेणार
कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायल गाझामधून आपले सैन्य मागे घेईल. हमासने ट्रम्प आणि हमीदार देशांना इस्रायल कराराचे पूर्णपणे पालन करत आहे याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

इजिप्तमध्ये शांतता चर्चा सुरूच
गाझामध्ये हमासने शस्त्रे समर्पण करण्याचा प्रश्न अद्याप सोडवला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. ट्रम्पच्या शांतता करारात हमासने आत्मसमर्पणासह गाझामधील आपले राज्य सोडण्याचे आवाहन केले होते, त्याला हमासने मागील चर्चेदरम्यान नाकारले होते.

या प्रलंबित मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी इजिप्तमध्ये चर्चा सुरूच राहतील, ज्यामुळे कराराच्या पुढील टप्प्यांना आकार मिळेल अशी अपेक्षा आहे, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे.