गाझाचे विभाजन

0
18

इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला आज बरोबर एक महिना पूर्ण होत आहे. त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हमासशी गाझामध्ये पुकारलेले युद्ध थांबण्याची तर चिन्हे नाहीतच, परंतु आता इस्रायलच्या सैन्याने गाझापट्टीला सरळसरळ दोन भागांमध्ये विभागून उत्तरेच्या गाझा शहराला पूर्ण वेढले आहे. ‘गाझा आता पहिल्यासारखे उरणार नाही’ अशी गर्जना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्करी कारवाई सुरू झाली तेव्हाच केली होती. ती आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने इस्रायलची पावले पडू लागलेली दिसतात. गाझा शहराला वेढून राहिलेले इस्रायलचे रणगाडे, चिलखती वाहने आणि पायदळे प्रत्यक्ष गाझा शहरात घुसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गाझाच्या उत्तर भागातील नागरिकांनी दक्षिण भागात चालते व्हावे असा निर्वाणीचा इशारा इस्रायलने सुरुवातीलाच दिला होता, तेव्हाच तेथील हमासचे भुयारी तळ उद्ध्वस्त करून तो भाग कायमचा ताब्यात घेण्याचा इस्रायलचा इरादा स्पष्ट झाला होता. त्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर उत्तरेतील लाखो पॅलेस्टिनी खान युनीस, राफाह आदी दक्षिण भागात जाऊन राहिले, परंतु अजूनही किमान साडे तीन लाख लोक गाझाच्या उत्तरेच्या भागांत असल्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित छावण्यांच्या आश्रयाने राहिलेल्या नागरिकांनाही हमास नेत्यांचा माग काढत इस्रायल चढवत असलेल्या प्रतिहल्ल्यांची झळ बसली आहे. जबालिया छावणीवर तर आजवर तीन-चारवेळा हल्ला झाला. इस्पितळांच्या खाली हमासने आपले सुसज्ज तळ उभारलेले असल्याने आणि इस्पितळांजवळून इस्रायलवर अजूनही क्षेपणास्र हल्ले चढवले जात असल्यामुळे इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या कारवाईची झळ इस्पितळांनाही बसते आहे. त्यामुळे अर्थातच तेथील नागरिकांचीही होरपळ होते आहे. ह्या सगळ्या युद्धात आजवर नाहक मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनियन नागरिकांची संख्या दहा हजारांच्या घरात गेलेली आहे, परंतु इस्रायल कोणतीही दयामाया न दाखवता, हमासच्या लष्करी बळाच्या कायमच्या नायनाटासाठी अत्यंत आक्रमकपणे पावले टाकताना दिसते आहे. हमासने ओलिसांची न केलेली मुक्तता, हमासच्या समर्थनार्थ लेबनॉनमधून हिज्बुल्ला, खुद्दा गाझा आणि सीरियातून इस्लामी जिहाद आणि अगदी येमेनमधून हौथी बंडखोर चढवीत आलेले हल्ले यामुळे इस्रायल संतप्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने युद्धविराम घेण्यास सांगणारा ठराव प्रचंड बहुमताने संमत केला, तरी त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवून इस्रायलने युद्ध सुरूच ठेवले आहे. इस्रायलच्या ह्या कणखर भूमिकेमुळे पश्चिम आशियातील सगळी समीकरणे उलटीपालटी झाली आहेत. आजवर परस्परांशी लढत आलेले आणि अमेरिकेच्या मध्यस्थीतून पॅलेस्टाईनच्या प्रश्नाला बगल देत इस्रायलशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित करीत आलेले मध्यपूर्वेचे देशदेखील आता इस्रायलच्या विरोधात गेलेले दिसतात. अत्यंत कडव्या अशा वहाबी तत्त्वज्ञानाच्या नावाखाली सगळ्या जगाविरुद्ध जिहादी विष ज्या देशातून पसरवले जात आले आहे, तो सौदी अरेबिया हा अमेरिकेचा मित्रदेश तिच्या मध्यस्थीने इस्रायलशी हातमिळवणी करायला निघाला होता. परंतु गाझा युद्धाने आता ती समीकरणेही बदलताना दिसत आहेत. इस्रायलशी आजवर संबंध सुधारलेल्या इतर अरब देशांनीही गाझाच्या प्रश्नावर त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. इस्रायलच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असलेल्या अमेरिकेलाही त्याची झळ बसते आहे. त्यामुळेच अमेरिकेचे बडे बडे नेते सातत्याने अरब देशांना भेटी देत आपले तेथील हितसंबंध कायम राखण्याच्या धडपडीत आहेत. इस्रायलच्या आक्रमक नीतीची परिणती तिसऱ्या महायुद्धात तर होणार नाही ना ही चिंताही राजकीय निरीक्षकांना सतावू लागली आहे. ज्या प्रकारे युक्रेनच्या रणभूमीवर रशिया, चीन एकीकडे आणि अमेरिका व इतर युरोपीय मित्रराष्ट्रे दुसरीकडे असे प्रॉक्सी युद्ध लढले जात आहे, तसाच प्रकार गाझाच्या पार्श्वभूमीवरही सुरू आहे. हमासला प्रत्यक्ष पाठबळ अर्थातच इराणचे आहे आणि त्याआडून रशिया आणि चीनही केवळ आपल्या अमेरिकाविरोधी भूमिकेखातर अंतस्थपणे ह्या विषयात तेल ओतत राहिले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघातील त्यांची भूमिका तेच स्पष्ट करून गेली आहे. ह्या सगळ्यातून पुढे काय होणार या प्रश्नाचे उत्तर कोणीही नेमकेपणाने सांगू शकणार नाही, परंतु इस्रायल हा मागे हटणारा देश नाही. त्यामुळे त्याच्या आक्रमक पावलांतून पॅलेस्टिनी नागरिकांचे शिरकाण सुरूच राहण्याची भीती आहे. ह्या सगळ्याला जबाबदार असलेली हमास ह्या कारवाईतून किती नष्ट होईल सांगता येत नाही, कारण कितीही नेते मारले गेले तरी झटपट त्यांच्या जागी नवे नेते आणण्यात हमास माहीर आहे. परंतु आम पॅलेस्टिनी नागरिकांच्या हालांना पारावार उरलेला नाही एवढे मात्र खरे.