- डॉ. आरती दिनकर
(होमिओपॅथी तज्ज्ञ आणि समुपदेशक)
‘गाऊट’मधील रोगाचे मुख्य कारण म्हणजे रुग्णाच्या रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते. होमिओपॅथिक औषधांनी पेशंटच्या रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तीव्र वेदना कमी होऊन पेशंटला गुण येतो.
४२ वर्षीय उदय नावाचे गृहस्थ उजवा पाय जमिनीवर न टेकवता एका पायाने माझ्या क्लिनिकच्या केबिनमध्ये आले. बघितलं तर त्यांना अत्यंत वेदना होत होत्या हे लगेच लक्षात आले. पायावर सूज व त्या जागेवरची त्वचा लाल झाली होती. पायाच्या अंगठ्याच्या वर जास्तच दुखत होते, त्यांच्या सांध्याजवळील शिरा मोठा झालेल्या होत्या, सांध्यावर जेथे सूज आली होती तेथे दाबले असता खड्डा पडला. त्यांनी याआधी अनेक पेन-किलर्स (वेदनाशामक गोळ्या)घेतली होती. याने तात्पुरता गुण येऊन बरे वाटायचे… अशी दोन-अडीच वर्षे काढली. आता रोगाचे स्वरूप जुनाट झाल्यामुळे जास्तच त्रास होऊ लागला तेव्हा कुणीतरी सांगितले त्यानुसार ते आज माझ्याकडे होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी आले होते. मी त्यांना काही महत्त्वाचे व जुजबी प्रश्न विचारले. त्यांनी त्यांची रिपोर्टची फाईलही बरोबर आणली होती ती मी बघितली, त्यांना सध्या असलेल्या ‘गाऊट’ म्हणजेच ‘वातरक्त’ या रोगाच्या रोग लक्षणांवर मी होमिओपॅथीचे नेमके औषध दिले. काही दिवसातच त्यांना औषधाचा सुपरिणाम जाणवला व त्यांना बरे वाटले. ‘माझा विश्वासच बसत नाही की मला गाऊटच्या रोगा पासून मुक्तता मिळाली’, असे मला त्यांनी आवर्जून सांगितले.
पेशंटच्या रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढते, त्यामुळे पेशंटला लहान सांध्यात तीव्र वेदना होतात. तोच ‘गाऊट’ किंवा ‘संधिरोग’ होय. याची लक्षणे म्हणजे लहान सांध्यांमध्ये म्हणजे बोटाच्या सांध्यांमध्ये सूज, असह्य वेदना व लालसरपणा येतो. यात बरेचदा ताप असतो. तापाचा चढ-उतार बर्याच पेशंटमध्ये दिसून येतो. काही वेळेस गाऊटचे दुखणे मोठ्या सांध्यांमध्येही दिसून येते. गाऊटचे दुखणे सांध्यात अचानक सुरू होते आणि रात्रीतून वाढते. याचा परिणाम पायाच्या अंगठ्यावरच्या सांध्यावर जास्त प्रमाणात होतो. या रोगात हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक ऍसिडचे खडे तयार होतात. त्यामुळे या वेदना होतात. पायाची बोटे, हाताची बोटे, हाताची ढोपरे, गुडघ्यात यांच्या त्यांच्या जागेवर असह्य वेदना होऊन तेथील भाग गरम होऊन सुजतो. त्वचा लाल होते. या लक्षणांबरोबर अनेकदा थंडी असते. पण काही रुग्णांना तापाबरोबर सांधे दुखतात तर काहींचे फक्त सांधे दुखतात. त्या ठिकाणी गरम लागते, तेथे सूज आलेली असते. त्या सांध्याजवळील शिरा मोठ्या झालेल्या असतात. सूज आलेल्या ठिकाणी दाबले असता खड्डा पडतो, सुई टोचल्याप्रमाणे, फाडल्याप्रमाणे वेदना होतात. पेशंटला ताप उतरत असताना घाम येतो, मूत्रातून मुत्राम्ल खूप प्रमाणात येते. सांधे वाकडे तिकडे किंवा ताठ होतात, सांध्यातील सूज कमी व्हायला लागली की तेथे खाज येते. अशावेळी पेशंट कोणतीही हालचाल करू शकत नाही
हा अनुवंशिक रोग आहे. हा रोग क्रॉनिक (जुनाट) झाल्यास याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. गाऊट या रोगावर औषधे घेताना पथ्य पाळणेही गरजेचे आहे. याची कारणे अनेक आहेत जसे-
- अति पौष्टिक अन्न खाणारे त्यामानाने शारीरिक श्रम कमी करणारे बरेचदा अंगाने स्थूल असतात. अशांना गाऊट झालेला दिसून येतो.
- तसेच थंडीपासून शरीराचे रक्षण करता न आल्यानेही हा रोग होऊ शकतो. * बहुतेक स्त्रियांना बाळंतपणानंतर किंवा मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीच्या वेळी गाऊट झालेला आढळून येतो.
- अति प्रमाणात मद्यपान करणारे चाळीस किंवा त्यावरील वयाच्या पुरुषांना गाउट झालेला दिसून येतो.
गाउटमध्ये रोगाचे मूळ कारण शोधले जाते. त्यानुसारच योग्य औषध योजना करता येते. गाऊटमधील रोगाचे मुख्य कारण म्हणजे पेशंटच्या रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते. होमिओपॅथिक औषधांनी पेशंटच्या रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पेशंटच्या तीव्र वेदना कमी होऊन पेशंटला गुण येतो.
यासाठी पेशंटने काही पथ्य पाळणे आवश्यक आहे –
काय खाऊ नये – मशरूम, मासे, मांस, मटण, खूप तिखट मसालेदार पदार्थ, तसेच चिकन, अल्कोहोल(मद्यपान), साखर, मिठाया, बेकरीचे पदार्थ शीतपेये, आईस्क्रीम टाळावे. मीठ कमी खावे. आंबट पदार्थ हे पदार्थ शरीरावर प्रतिकूल परिणाम करतात त्यामुळे गाऊटची लक्षणे वाढीस लागतात व मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नाही.
काय खावे – संपूर्ण धान्य, कडधान्य, भाज्या, फळे, सफरचंद, काकडी, डाळी, दूध जरुरीपुरते रोजच्या आहारात असावे. कारण मांसल भागाचे पोषण होणे गरजेचे आहे आणि अडीच ते तीन लिटर पाणी रोज जरूर प्यावे. व्यायाम करावा.