गांधी जयंतीपासून टेलिमेडिसीन योजना ः मुख्यमंत्री

0
36

>> फोनद्वारे डॉक्टर साधणार रुग्णाशी संपर्क

येत्या २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून राज्यात टेलिमेडिसीन सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. बेतकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. खास करून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
आजारी लोकांना दूरध्वनीवरून डॉक्टर त्यांनी कोणती औषधे घ्यावीत याची माहिती देणार असल्याने शरीराने थकलेल्या व कोरोना महामारीच्या काळात घराबाहेर पडण्यास कचरणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची ह्या टेलिमेडिसीन योजनेमुळे चांगली सोय होणार आहे. त्याचबरोबर अन्य सर्व वयोगटातील लोकांचाही ह्या महामारीच्या काळात डॉक्टरकडे जाण्याचा त्रास वाचेल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

ज्या लोकांना इस्पितळात दाखल होऊन उपचार घ्यावे लागतील अशाच लोकांना इस्पितळात येण्याची सूचना करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. टेलिमेडिसीन सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर डॉक्टर फोनवरून रुग्णांची सगळी माहिती मिळवतील व त्यांनी दिलेल्या माहितीवरून रोगाचे निदान करून त्यांना कोणती औषधे घ्यायची ते सुचवतील. परिणामी महामारीच्या काळात रुग्णांना तपासणीसाठी इस्पितळात गर्दी करावी लागणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना महामारीच्या काळात राज्यात सुमारे वर्ष दीड वर्षापर्यंत सरकारी इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहिल्याने राज्यात आजारी लोकांची बरीच गैरसोय व आबाळ झाली होती.
या प्रसंगी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.