गांजाप्रकरणी गोमेकॉचे पाच विद्यार्थी निलंबित

0
21

>> निलंबित केलेल्यांमध्ये एक मुलगी आणि चार मुलांचा समावेश

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या हॉस्टेलमधील अमली पदार्थप्रकरणी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या पाच विद्यार्थ्यांना (वर्ष २०२१-२२ बॅच) निलंबित करण्यात आले आहेत. निलंबितांत एक मुलगी आणि चार मुलांचा समावेश आहे.
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी, गोमेकॉमध्ये सापडलेल्या सात ग्रॅम गांजा या अमली पदार्थप्रकरणी कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या पाच विद्यार्थ्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. तसेच, हॉस्टेलच्या वॉर्डनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्याला ४८ तासांत उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे.

गोमेकॉच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये २५ मे २०२२ रोजी रात्रीच्या वेळी वैद्यकीय शिक्षण घेणारे चार मुलगे आणि १ मुलगी अमली पदार्थाच्या नशेत असल्याचे आढळून आले. सुरक्षा रक्षकांनी त्यांची झडती घेतली असता गांजा हा अमलीपदार्थ आढळून आला. या अमली पदार्थप्रकरणी आगशी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

गोमेकॉच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये गांजा आढळून आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. बांबोळीतील गोमेकॉच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये ७ ग्रॅम गांजा सापडला. या प्रकरणी आगशी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, अमली पदार्थ प्रकरणात गुंतलेल्या गोमेकॉतील पाच विद्यार्थ्यांची गय केली जाणार नसून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिला होता.

हे विद्यार्थी रात्री उशिरा दारूच्या नशेत हॉस्टेलमध्ये आले होते, त्यावेळी त्यांची हॉस्टेलच्या सुरक्षा रक्षकांनी तपासणी केली असता त्यांच्याकडे गांजा सापडला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोमेकॉच्या मुलांच्या हॉस्टेलमधील अमलीपदार्थ प्रकरणात गुंतलेल्या या विद्यार्थ्यांवर योग्य कारवाईची सूचना गोमेकॉच्या डीनला देण्यात आली होती. तसेच, हॉस्टेलच्या वॉर्डनला कारणे दाखवा नोटीस देऊन याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

निलंबन मागे घेण्याची युवक कॉंग्रेसची मागणी

गोवा प्रदेश युवक कॉँग्रेसतर्फे काल गोमेकॉतील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या पाच विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आगशी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये निलंबित केलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नाव नाही, असे युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोमेकॉमधील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी अमलीपदार्थाचा पुरवठा करणारे ड्रग्स पॅडलर, ड्रग्स माफिया यांच्यावर कारवाई करावी. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना बळीचा बकरा बनवू नये, अशी मागणी ऍड. म्हार्दोळकर यांनी केली आहे..
राज्यात अमलीपदार्थाला आळा घालण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. पूर्वी किनारी भागात सापडणारे अमलीपदार्थ आता गाव, महाविद्यालयापर्यंत पोहोचले आहे. ड्रग्स माफिया, ड्रग्स पॅडलर यांच्यावर कारवाई होत नाही. राज्यातील महाविद्यालये, गावातील अमलीपदार्थाच्या प्रमाणात वाढ झाल्याने युवा पिढीला धोका संभवतो, असेही ऍड. म्हार्दोळकर यांनी सांगितले.