– डॉ. मनाली पवार
आग्रहाने दरवर्षी वसंत ऋतूंत वमन उपक्रम. ३५ व्या वयानंतर गर्भाशयमुखाच्या सूचित केलेल्या धोक्याच्या लक्षणांपैकी एक जरी लक्षण आढळले तरी ताबडतोब वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. काहीही त्रास नसेल तरी तीन वर्षातून एकदा पॅप स्मिअर टेस्ट करून घ्या.
आजकाल ३० वर्षांवरील स्त्रियांना ‘पॅप स्मियर तपासणी’चा सल्ला अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ देतात. रुग्णांना मात्र बर्याच वेळा हा अनावश्यक खर्च वाटतो. किंवा डॉक्टरवर तरी शेरे-ताशेरे केले जातात. पण आजच्या परिस्थितीनुसार वाढत चाललेल्या ‘गर्भाशयमुख कर्करोगा’चा आकडा पाहता डॉक्टरांना ही तपासणी गरजेची वाटू लागली आहे. कारण या तपासणीमार्फत गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान लवकर होण्यास मदत होते.
पॅप तपासणीची गरज लवकर कां?…
– आजच्या परिस्थितीनुसार येणारे ताणतणाव, शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य, घर व नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळताना होणारी तारांबळ या सर्वांचा विचार करता, या सगळ्याचे परिणाम शरीरावर होत असतात. नोकरी करणार्या स्त्रियांमध्ये घरातले कामकाज उरकून डबे घेऊन बाहेर निघताना त्या स्त्रीला स्वतःला खायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत एकदम दीड-दोनला डबा खाल्ल्यास त्या स्त्रीच्या शरीरातील वात विगुण होतो. विगुण वात दुष्ट होऊन अनेक प्रकारचे योगविकार उत्पन्न करतो. गर्भाशयमुखाचा कॅन्सर हाही त्यातलाच एक प्रकार.
आधुनिक शास्त्राप्रमाणे एच.पी.व्ही. जिवाणूंमुळे हा गर्भाशयमुखाचा कॅन्सर होतो. पण मुळात हे जिवाणू पसरण्याचे कारण योनीची अस्वच्छता, विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य अधिक संबंध, संततिनियमन साधनांचा अतिरेक, लहान वयातच शरीर संबंधाला सुरुवात होणे व व्याधीक्षमत्व कमी असणे.
मोकळेपणाच्या वातावरणातून विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य संबंध अधिक प्रकारे आल्यास संततीनियमनाची साधने असली तरीही शारीरिक व मानसिक ताण निर्माण होतात. मन अस्वस्थ राहतं व यातून योनिविकार निर्माण होतात.
कामात्पयामुळे, समलिंगी संभोगामुळे, विकृत कामामुळे कामपूर्तीसाठी अपद्रव्ये वापरली जातात. चुकून जखम झाल्यास तो भाग विकृत व दुष्ट होतो. अर्थातच यामुळे गर्भाशयाच्या मुखाची विकृती होणे, मुखावर जखम होणे व यातूनच कृमीसंसर्ग होणे अशी शृंखला तयार होते.
कमी जागेत झोपणे, वेडेवाकडे पाय मुडपून झोपणे, पालथे झोपणे या गोष्टींमुळे तेथील वायू दुष्ट होतो. मैथुनसमयी विषमासन असल्यास दोष दुष्ट होतात व योनिभागाला वक्रत्व निर्माण करतात. ज्या स्त्रीचे शरीर रुक्ष, दुर्बल व जी स्त्री लहान आणि सुकुमार असते अशा स्त्रीचा वातदोष लवकर प्रकूपित होतो व योनिविकार उत्पन्न करतो.
वारंवार मैथुन करणे, दिवसातून चार-पाच वेळा वा जेवल्यावर लगेच मैथुन करणे, अवेळी करणे म्हणजे काळाचा विचार न करता म्हणजेच रात्रीचा काळ सोडून सकाळ-संध्याकाळ-तिन्हीसांजेला मैथुन करणे, मैथुनानंतर आवश्यक विश्रांती न घेणे, यांमुळे गर्भाशयावर ताण येतो आणि योनिभागी सूज व शूल निर्माण होऊन विकार उत्पन्न होतो.
वयाच्या १८ व्या वर्षाआधी विवाह, संभोग तसेच गर्भधारणा किंवा उशीरा गर्भधारणा, तसेच इतर गुप्तरोग गर्भाशयमुखाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात.
तंबाखूसेवन किंवा धूम्रपान हेही आजकालचे महत्त्वाचे कारण कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दिसून येते.
वरील सर्व कारणांचा विचार करता ही कारणे वारंवार घडत राहिल्यास आयुर्वेदीय दृष्टीकोनातून पाहता योनीमार्गात वात दूषित होतो व इतर दोषांना दूषित करून व्याधीची सम्प्राप्ती घडते.
आधुनिक शास्त्रानुसार जरा विचार कराल वरील कारणांनी गर्भाशय मुखाजवळ कृमीसंसर्ग होतो व यामुळे गर्भाशय मुखाचा कॅसर होतो. ही सर्व कारणे वयाच्या बर्याच अगोदर घडत असतात म्हणूनच गर्भाशयमुखाचा कॅन्सर अगदी कमी वयात होऊ शकतो. त्याचे निदान लवकर होण्याकरिता ही पॅप तपासणी वयाच्या पस्तीशीनंतर, पुढे दर तीन वर्षांनी प्रत्येक महिलेने करणे म्हणूनच आवश्यक आहे.
प्रमुख लक्षणे ः
– योनिमार्गातून प्रमाणाबाहेर सफेद स्राव – अनेकदा दुर्गंधी.
– योनिमार्गातून प्रमाणाबाहेर रक्तमिश्रित स्राव.
– दोन मासिक पाळ्यांमध्ये होणारा रक्तस्राव
– मासिक पाळी थांबल्यानंतरचा रक्तस्राव
– संभोगानंतर रक्तस्राव हे या व्याधीमध्ये विशेष लक्षण होय.
– कटी किंवा त्रिक प्रदेशामध्ये वेदना
– उद्शूल
– योनीमार्गातून मूत्र किंवा मल बाहेर पडणे.
– त्याचबरोबर भूक न लागणे, वजन कमी होणे, अशक्तपणा येणे ही सार्वदेहिक लक्षणे आढळतात.
गर्भाशयमुखाच्या कॅन्सरवरील उपचार ः
आधुनिक शास्त्रानुसार गर्भाशय काढून टाकणे (टोटल हिस्टरेक्टॉमी) ही पहिली चिकित्सा होय. एच.डी.व्ही. कृमींचा संसर्ग झालेला पूर्ण भाग काढून टाकणे, तसेच प्रसार वाढू नये म्हणून किंवा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी दिली जाते. पण शस्त्रकर्मानंतर व केमोथेरपीनंतर रुग्णाचा बलाचा र्हास होतो. त्याचबरोबर रेडिएशनमुळे स्थानिक दाह, वेदना, भूक मंदावणे, मळमळ, उलट्या, जुलाब, केस गळणे, नैराश्य अशी लक्षणे दिसू लागतात. यावेळी आयुर्वेदीय उपचारांचा अवलंब करावा. बलहानीमध्ये रसायन चिकित्सेचा वापर करावा. दाह, उलट्या यामध्ये कामदुधा, सुतशेखर, शंखवटीसारख्या पित्तशामक औषधांचा वापर करावा. द्रवाहाराचे सेवन जास्त करावे, यामध्ये लाजामण्ड, तुपावर तांदूळ भाजून केलेली पेज, फळांचा रस, मुगाचे कढण, भाज्यांचे सूप, दूध, उकळलेले पाणी यांचे सेवन करावे.
या व्याधीमध्ये निदान लवकर झाल्यास औषधी चिकित्साही फायदेशीर ठरते.
कटिरातील स्नायूंना अत्याधिक ताण आल्यास गर्भाशयावर ताण आल्यास गर्भाशयावर ताण येऊन गर्भाशयमुखावर तीव्र शोक निर्माण होतो. परीक्षण केल्यास कित्येकदा गर्भाशयमुख दुप्पट आकाराचे झालेले दिसते. त्यावर जखमा, लाली व वेदनाही असतात. अशावेळी तिळ तेलाचा अनुवासन व त्रिफला व निशोत्तर यांचे तिरुह बस्ती द्यावेत.
न्यग्रोधादि गणाचे धावन, पिचुधारण, स्नेहनासाठी शतवर्यादि घृत, शतावरी सिद्ध तेल, यष्टिमधू, अनंता सिद्ध तेल, बला तेल, एलादि तेल यांचा उपयोग करावा. धूपनासाठी चंदनाचा उपयोग करावा. पोटातून घेण्यासाठी चंद्रप्रभा गुटी, मौक्तिक भस्म, त्रिवंग भस्म, वंग भस्म, कामदुधा, पुष्यानुगचूर्ण, शतावरी, अश्वगंधी, गोखरू, अनंतमूल, चंदन, वाळा, नागरमोथा, रक्तपाचक गणातील औषधे यांचा उपयोग करावा. मृदूविरेचन सतत चालू ठेवावे.
कॅन्सर असल्यास योनिपाक संभवतो. अशा वेळी निम्बपत्र, गोमूत्र आणि शोधनीय गण यांनी प्रक्षालन करून पोटातून चोपचिन्यादि चूर्ण, व्याधिहरण रस, त्रिवंग भस्म, गमधक रसायन, आरोग्यवर्धिनी यांचा उपयोग करून योनिभाग स्वच्छ झाल्यावर शतधौत घृताचे चंदनादि तेलाचे व एलादि तेलाचे पिचू योनिभागी ठेवावे.
गर्भाशय मुखावर ग्रंथी किंवा गाठ ही चटकन लक्षात आल्यास गौरिक, आंब्याच्या कोयीतील आतील भाग, अंजन, हळद आणि कटफल यांचे चूर्ण करून मधात मिसळून योनीभागी ठेवावे. त्रिफला क्वाथामध्ये मध मिसळून योनिप्रक्षालन करावे. मैथुन टाळावे. दिवसा झोप टाळावी. मूषकादि तेलाचे पिचू बसवावेत.
पथ्य ः हलका, मधुर, जळजळीत व तेलकट नसणारा आहार, दुधी, पडवळ, तांदूळजा, चाकवत या भाज्या, कडधान्यांचे सूप, ताजे गोड ताक, वेळच्या वेळी जेवण व निद्रा हे पथ्यकर आहे. तसेच योनिभागाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचा प्रतिबंध ः
– १८ व्या वर्षानंतर विवाह व प्रथम अपत्य २० व्या वर्षानंतर
– योनिमार्गाची नियमित स्वच्छता.
– लैंगिक संबंधाच्या वेळेस कंडोमसारख्या सुरक्षित साधनांचा वापर
– तंबाखू सेवन वर्ज्य.
– मासिक पाळी सुरू झाल्यावर त्या काळात पाळायचे नियम.
– आग्रहाने दरवर्षी वसंत ऋतूंत वमन उपक्रम. ३५ व्या वयानंतर गर्भाशयमुखाच्या सूचित केलेल्या धोक्याच्या लक्षणांपैकी एक जरी लक्षण आढळले तरी ताबडतोब वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
– काहीही त्रास नसेल तरी तीन वर्षातून एकदा पॅप स्मिअर टेस्ट करून घ्या.