गरोदरपणात ॲनिमिया

0
6
  • डॉ. मनाली महेश पवार

गर्भाच्या व गर्भिणीच्या आरोग्यासाठी रक्तधातूचे योग्य पोषण होणे अतिआवश्यक आहे. कारण गर्भाची निर्मितीच मुळात रक्तापासून होते म्हणून या गरोदरपणाच्या पूर्ण काळात योग्य तो सकस, चौकस आहार सेवन करावा. योग्य औषधोपचारांचे सेवन करावे.

गरोदरपणात पण्डुरोगाचा (ॲनिमियाचा) त्रास भारतात सर्वत्र पाहायला मिळतो. ही समस्या सर्वस्तरांतील महिलांमध्ये पाहायला मिळते. गर्भधारणेदरम्यान वाढता गर्भ तसेच माता यांना पुरेसे पोषण व ऑक्सिजन पुरविण्यासाठी रक्ताच्या उत्पत्तीची गरज असते. अतिरिक्त रक्तपेशी तयार करण्यासाठी अधिक प्रमाणात लोह आणि इतर पोषक तत्त्वांची गरज असते. पण जर शरीरात आवश्यक लोह आणि इतर घटक नसतील तर या अतिरिक्त आवश्यकता पूर्ण होऊ शकत नाहीत. परिणामी गरोदरपणात पण्डुरोग (ॲनिमिया) होतो. बऱ्याच वेळा ही अवस्था तशी सौम्य असते. योग्य आहार-विहार व औषधोपचाराने हा ॲनिमिया बरा होतो, तथा शरीरातील लोहाच्या प्रमाणात वाढ होते. पण काही चुकीच्या समजुती आड येतात. काहींच्या मते या लोहाच्या गोळ्या घेतल्या तर आपला लठ्ठपणा वाढेल, तर काहींना वाटते या गोळ्यांनी गर्भाचे अतिरिक्त पोषण होते, गर्भ जास्त वजनाचा होतो व प्राकृत प्रसूती होण्यास अडथळा येतो. काहींच्या मते डॉक्टर व मेडिकल स्टोअरच्या व्यवसायवृद्धीसाठीचा हा फंडा आहे.

गरोदरपणात गर्भिणीने सेवन केलेल्या आरोग्यदायी आहारातून आहार-रस तयार होतो व या शुद्ध आहार-रसातून रक्ताची निर्मिती होते. या विशुद्ध रक्तातून गर्भवाढीचे व अपरानिर्मितीचे कार्य घडते. रक्ताची आवश्यकता गर्भवाढ तसेच अपरेच्या पोषणाकरिता तर असतेच, त्याचबरोबर गर्भिणीला स्वतःला स्वतःचे आरोग्य, जीवन टिकवायला, प्रसूतीच्या वेळी ऊर्जा-ताकद येण्यासाठी रक्ताची गरज असते. अशावेळी ते योग्य प्रमाणात निर्मित होणे आवश्यक असते. म्हणून गरोदरपणात जर ॲनिमियाचा त्रास आढळला तर लगेच उपचार करावेत; नाहीतर ही अवस्था गंभीर स्वरूप धारण करू शकते. मुळात हा त्रास उद्भवूच नये म्हणून गर्भिणी-परिचर्येचे पालन करावे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार गर्भधारणेदरम्यान शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असते. या गरोदरपणात उद्भवणाऱ्या ॲनिमियामुळे अकाली जन्म, कमी वजनाचे बालक वा मातेचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

ॲनिमियाची साधारण लक्षणे

  • अशक्तपणा.
  • थकवा.
  • चक्कर येणे.
  • ओठ, जीभ, त्वचा, नखे निस्तेज होणे.
  • धाप लागणे.
  • हात-पाय थंड पडणे.
  • मन विचलित, चिंतीत होणे.
  • हृदयस्पंदनांची गती वाढणे, छातीत धडधडल्यासारखे वाटणे.

गरोदरपणात ॲनिमिया सामान्यतः लोहसमृद्ध अन्न सेवन न केल्यामुळे होत असते. या काळात बऱ्याच वेळा अन्नावरची वासना उडते. पचनाच्या तक्रारी असतात. मळमळ, ओकारी, मलावरोधासारखे पचनसंस्थेचे आजार निर्माण होतात, त्यामुळे काहीच खायची इच्छा होत नाही. त्याचबरोबर सध्या आपली जीवनशैली, आहारपद्धती बदललेली असल्याने काही पथ्यकर खाणे जमतच नाही. सर्वांना जिभेला सुख देणारेच पदार्थ आवडतात. मग जेव्हा काही खावेसे वाटत नाही तेव्हा चटपटीत चाट, पिझ्झा, बर्गर, तळलेले काही पदार्थ, चिकन-मटणाच्या वेगवेगळ्या डिशेस आवडायला लागतात व खाल्ल्याही जातात. अशा परिस्थितीत पचनसंस्था जेव्हा मंद झालेली असते अशावेळी या आहाराचे सेवन केल्यास विकृत (आम) आहार-रस तयार होतो व परिणामी रक्तही योग्य प्रमाणात व विशुद्ध तयार होत नाही. हळूहळू रसरक्तधातू बिघडतात व गर्भिणी आणि गर्भाचे पोषण व्यवस्थित होत नाही.
त्याचप्रमाणे गर्भधारणेपूर्वी मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव हा त्रास असल्यास व त्याची योग्य चिकित्सा न केल्यास पुढे गर्भधारणेदरम्यान त्याचा परिणाम शरीर-मनावर होतो व ॲनिमियाचा त्रास संभवतो.

रक्ताल्पतामध्ये निदान व उपचार

याचे निदान साधारणतः स्त्रीच्या लक्षणांवरूनच केले जाते. पण गर्भधारणेदरम्यान संपूर्ण रक्त-गणना (सीबीसी) चाचणी, हिमोग्लोबीनची (एचबी) पातळी तपासणे आवश्यक असते. एचबी पातळी साधारणतः 10-11 ग्रॅम/डीएल पेक्षा कमी असल्यास तो ॲनिमिया जाणावा. तो सामान्यतः सौम्य असतो, पण पुढे गंभीर होऊ नये म्हणून वेळेवर उपचाराची गरज असते. अन्यथा गर्भिणीची ताकद व व्याधिक्षमत्व कमी होते व बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे प्रसूतीच्या वेळी रक्तस्राव जास्त झाल्यास गर्भिणी मूर्च्छित होऊ शकते. तिला रक्ताच्या बाटल्या चढवाव्या लागतात. ही प्रसूतीच्या वेळी धावपळ टाळण्यासाठी संपूर्ण गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेच्या काळात योग्य लोहाच्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या व व्हिटामिन-सी सारख्या गोळ्या घेणे आवश्यक आहे.

  • गर्भिणीच्या बाबतीत आहार व औषध जोडीने गेले पाहिजे. फक्त औषधाने उपयोग होत नाही. त्यामुळे खाण्यातील बदल हा अपरिहार्य असतो.
  • पेया, नाचणीची कांजी, खडीसाखरेचे सरबत, लाह्याचे पाणी, सर्वप्रकारचे यूष, दूध, ताक, भाज्यांचे सूप यांचा आहारात समावेश असणे आवश्यक असते.
  • आवश्यकतेनुसार सिद्धदुधाचा उपयोग करावा.
  • आहारामध्ये पोळी, भाजी, वरण-भात, चटणी, कोशिंबीर, आमटी, द्रवप्राय आहार, ताजे गोड ताक, फळांचे रस घ्यावे.
  • मनुका, सुके अंजीर, साळीच्या लाह्या, चारोळ्या, खडीसाखर, बेदाणे यांचा उपयोग करावा.
  • रसरक्तवर्धक आहारात नाचणीची कांजी, दूध, फळांचे रस, सर्वप्रकारचे यूष, सार, कढी यांचा समावेश असावा.
  • गर्भिणीअवस्थेत उपयोगी पडणारे आणि रक्तवर्धक असे डाळिंब हे उत्तम आहे. त्याचा भरपूर उपयोग करावा.
  • डाळींचा रस, मोसंब्याचा रस अधिक प्रमाणात घ्यावा.
  • मुगाचे यूष, सर्वप्रकारच्या भाज्यांची सूप्स हे सर्व प्रकार रसरक्तवर्धक आहेत, त्यांचे सेवन करावे.
  • त्यामुळे द्रवप्राय आहार, त्याचबरोबर नवायस लोह, ताप्यादी लोह, धात्री लोह अशा लोहकल्पांचा डाळिंबपाकातून उपयोग करावा.
  • शतावरी, अश्वगंधा, अनंता, मंजिष्ठा, पुनर्नवा, गोरूख, बाळहिरडा या औषधांचा काढा करून त्याचा उपयोग करावा.
  • तीव्र पण्डू असल्यास रुग्णाला पूर्ण विश्रांती द्यावी.
  • द्रव्यप्राय आहार देऊन मंडूरभस्म, नवायस लोह, ताप्यादी लोह, कानलोह भस्म यांचा औषधात उपयोग करावा.
  • गर्भाच्या व गर्भिणीच्या आरोग्यासाठी रक्तधातूचे योग्य पोषण होणे अतिआवश्यक आहे. कारण गर्भाची निर्मितीच मुळात रक्तापासून होते म्हणून या गरोदरपणाच्या पूर्ण काळात योग्य तो सकस, चौकस आहार सेवन करावा. योग्य औषधोपचारांचे सेवन करावे. आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे संपूर्ण गर्भिणी-परिचर्येचे पालन करावे. म्हणजे गर्भिणीचे स्वास्थ्य टिकते व ती सुदृढ बालकाला नैसर्गिकरीत्या जन्म देते.