आत्म्याचे गुण अन्‌‍ गुणांचा विकास

0
5

योगसाधना- 633, अंतरंगयोग- 219

  • डॉ. सीताकांत घाणेकर

विश्वाकडे बारीक बघितले की हा मुद्दा लक्षात येतो. प्रथम वर्गाचा बुद्धिमान मानव समाजात प्रतिष्ठित असतो; पण कुटुंबात दुसऱ्या वर्गाचा पती व तिसऱ्या वर्गाचा पिता असू शकतो. म्हणून हल्ली बुद्ध्यांकाबरोबर भावनांकदेखील बघितला जातो.

भगवंताने स्वतःची अत्युच्च बुद्धी व कार्यक्षमता वापरून हे सुंदर विश्व बनवले. ब्रह्मांड निर्माण केले. त्यात विविध जीवसृष्टी तयार केली. थोडा विचार व अभ्यास केला तर कौतुक व आश्चर्य वाटते- हे सर्व विश्व कसे शिस्तीने चालते?
प्रत्येक प्राण्याला शरीर, मन, बुद्धी व मुख्य म्हणजे आत्मा आहे. त्यांतील अत्यंत बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव. भारतीय योगशास्त्रज्ञांनी हे सर्व पैलू ओळखले- त्यांनी पंचकोश सांगितले.

  • शरीर ः शरीर म्हणजे अन्नमय कोश. अन्नावर जगणारा.
  • प्राण ः प्राण म्हणजे प्राणमय कोश. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत शरीर चालते. ती एक अद्भुत शक्ती आहे.
  • मन ः मन म्हणजे मनोमय कोश. यात मुख्य म्हणजे विचार व भावना- दोन पैलू- मानसिक व भावनिक.
  • बुद्धी ः बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश. विशेष ज्ञानासाठी असलेला कोश- अति प्रगत कोश.
  • आत्मा ः आत्मा म्हणजे आनंदमय कोश. जोपर्यंत आत्मा शरीरात आहे तोपर्यंत प्राणी जिवंत राहतो, नाहीतर मरतो. तसेच गर्भावस्थेत जेव्हा आत्मा गर्भात प्रवेश करतो तेव्हापासून विश्वात त्याचे अस्तित्व सुरू होते. सुरुवातीला मातेच्या गर्भाशयात व जन्मानंतर स्वतंत्र अस्तित्व. थोडी थोडी विविध पैलूंची वाढ होते.
    विज्ञानाप्रमाणे आधी फक्त बुद्धी मोजायचे बुद्ध्यांकाप्रमाणे. जो जास्त बुद्धिमान त्याचा बुद्ध्यांक जास्त. जसजसा समाज प्रगती करू लागला तसतसे लक्षात आले की, विश्वात सुखाने, शांतीने जगण्यासाठी फक्त बुद्ध्यांक उपयोगाचा नाही, त्यासाठी भावनांकदेखील अत्यंत गरजेचा आहे. कारण बुद्धीमुळे समाजात मोठे स्थान मिळवणारी व्यक्ती भावनांच्या संदर्भात कमी असू शकते. काहीवेळा भावनाशून्यदेखील असू शकते.

विश्वाकडे बारीक बघितले की हा मुद्दा लक्षात येतो. प्रथम वर्गाचा बुद्धिमान मानव समाजात प्रतिष्ठित असतो; पण कुटुंबात दुसऱ्या वर्गाचा पती व तिसऱ्या वर्गाचा पिता असू शकतो. म्हणून हल्ली बुद्ध्यांकाबरोबर भावनांकदेखील बघितला जातो.
हल्ली तर आध्यात्मिक पैलूवरदेखील भर दिला जातो. आध्यात्मिक भागफळ (कोशंट) बघितला जातो. योगशास्त्रात म्हणूनच आध्यात्मिक पैलू म्हणजे आनंदमय कोशाचा अभ्यास करतात. त्यामुळे आत्म्याचे गुण बघून त्या गुणांचा विकास करायचा असतो. हे सप्तगुण आहेत- आत्मा ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप, आनंदस्वरूप असतो. त्याशिवाय पवित्रता हा त्याला मूळ गुण असतो. याचे कारण म्हणजे आत्मा परमात्म्याचा संतान आहे. परमात्म्याला आपण मातापिता मानतो म्हणून ‘त्वमेव माता, पिता त्वमेव’ म्हणतो. आत्म्याच्या पहिल्याच जन्मात हे सर्व गुण त्याला असतात. तद्नंतर त्याचे कितीतरी जन्म होतात व त्याप्रमाणे त्याच्यावर विविध संस्कार होता- सकारात्मक, नकारात्मक.

सकारात्मक संस्कारांमुळे आत्मा परीसारखा सफेद असतो, हलका असतो. नकारात्मक संस्कारांमुळे (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकारामुळे) त्याचे हलकेपण नष्ट होते. त्याचे चारित्र्य शुद्ध, पवित्र होते; ते थोडे थोडे बदलू लागते. त्याचा शांत, प्रेमळ स्वभाव बदलून तो षड्रिपूंनी आच्छादित होतो. सज्जनाचा दुर्जन होतो.

आपल्या पूर्वजांनी त्यामुळेच संस्कारांना अत्यंत महत्त्व दिले होते. त्यासाठी सुरुवातीला कुटुंबात व तद्नंतर गुरुकुलामध्ये संस्कार होत होते. आजकाल गुरुकुले पूर्वीप्रमाणे नाहीत. आहेत ती नगण्य आहेत. पण ती सर्व विधायक कामे करतात.
आजकाल संस्कार होतात ते कुटुंबात, शाळेत व समाजात. त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात सर्वांनी दक्ष राहायला हवे. मुख्य म्हणजे शिक्षणामागील तत्त्वज्ञान समजायला हवे- शिक्षण हे फक्त जीविकेसाठी की जीवनासाठी, जीवनविकासासाठी? त्याशिवाय व्यक्तीचे चारित्र्यदेखील शिक्षणामुळेच घडू शकते. आदर्श नागरिक घडण्यासाठी तरुणांना त्यांच्या उमलत्या वयात आदर्श व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

बालपणात कुटुंबातील सर्व व्यक्ती- मुख्यत्वे माता-पिता, आजी-आजोबा- शेजारी व शाळेत गेल्यावर शिक्षक होणे जरूरीचे आहे. जर सुखी समाज घडवायचा असेल तर या सर्व वृद्ध व्यक्तींनी स्वतःवर काही बंधने स्वेच्छेने घालायला हवीत. तरुण बिघडले तर त्यांना दोष देता कामा नये. स्वतः किती जबाबदारीने वागतो याचा अभ्यास प्रत्येकाने करायला हवा. शास्त्रकार म्हणतात ः लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार देऊ तशी मूर्ती घडेल.

इतिहासात विविध उदाहरणे आहेत-
1) छत्रपती शिवाजी महाराज ः जीजाबाईंचा लाडका शिवबा. त्याला रामायण-महाभारत-भागवत यांतील शूर पुरुषांच्या गोष्टी सांगून या महामातेने शिवाजी घडवला. शहाजी आदिलशहांचा सरदार होता. त्यामुळे बलाढ्य मोगल साम्राज्याविरुद्ध लढा देणे असा विचारदेखील शक्य नव्हता. पण मातेने शूरवीरवृत्ती जागृत केली आणि शिवबाने ‘मराठी साम्राज्य’ उभे करण्याची घोषणा केली. त्यावेळी त्याच्याकडे 10-15 मावळे (म्हणजे शेतकरी; शूरवीर-लढवय्ये नव्हते), 8-10 तट्टू (घोडे नव्हे) व थोडे धन (काही अशरफीया) एवढेच होते.
शिवाजीचे संस्कार मग संभाजी राजांनी आत्मसात केले. औरंगजेबाने केलेले अत्यंत क्रूर अत्याचार त्याने सहन केले, पण धर्मांतर केले नाही. अशी ही व्यक्तिमत्त्वे वाचली की काहीवेळ बुद्धी स्तब्ध होते. आपण नतमस्तक होतो.
2) ब्रिटिशांविरुद्ध लढ्यातदेखील अनेक शूरवीरांनी देशासाठी आनंदाने बलिदान दिले. इंग्रज त्यावेळी जगाचे राजा होते. अति बलाढ्य होते.
3) रावणाची आई राक्षसी कुळातली. तिने त्याच्यावर राक्षसी संस्कार केले. वेदशास्त्रपारंगत, शंकराचा भक्त, वेदांना ऋचा लावणारा रावण भ्रष्ट झाला. एवढा मोठा तथाकथित सोन्याच्या लंकेचा राजा अध-पतित झाला. त्याने स्वतःचा व लंकेचा सर्वनाश केला. राक्षस ठरला. त्याविरुद्ध ज्याचा छोटा भाऊ बिभीषण. त्याला त्याच्या वडिलांकडून संस्कार मिळाले. तो थोर रामभक्त ठरला. युद्धानंतर लंकेचा राजा झाला.

भूतकाळाकडे नजर फिरवली तर लक्षात येईल की, समाजाचे शिक्षण फक्त शाळा-कॉलेजातच नाही तर इतर अनेक ठिकाणी होत असे. घरी आजीआई गोष्टी सांगत असत. लोक शिकवीत असत. मंदिरात कीर्तने, प्रवचने होत असत. तिथे लहानथोरांच्या कथा सांगितल्या जात असत. भजने म्हटली जात असत. अनेक विषयांवर नाटके सादर केली जात. त्यांत जास्त विषय होते- पौराणिक, सामाजिक. विषय त्यामानाने कमी असत. अनेक नाटके संगीत असत. त्यामुळे शास्त्रशुद्ध संगीताचा अभ्यासदेखील सहज होत असे.
कळत-नकळत दोनतीन पिढ्यांवर सहज संस्कार होत असत.
आज दूरदर्शनवर विविध मालिका असतात. पण बघणाऱ्यांनीच त्यांचे मूल्यांकन करावे. तरुण व वृद्धांवर त्याचे परिणाम काय होत असतील? अपवाद अवश्य आहेत.

तसेच समाजातील सर्व क्षेत्रांतील धुरिणांनीदेखील आदर्श चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व बनवण्याचे प्रामाणिक व नियमित प्रयत्न करावेत. दुर्भाग्याने आजकाल असे आदर्श दुर्मीळ होताहेत. त्यामुळे समाजातील संस्कारांना कीड लागली आहे आणि अशी भयानक स्थिती उद्भवली आहे. आपली अधःपतनाकडे घोडदौड चालू आहे.
शास्त्रशुद्ध योगभ्यास (सर्व मार्ग व पैलू) हा एक उत्कृष्ट उपाय आहे. योगसाधकांचा त्या दिशेने प्रयत्न चालू असेलच.