गरज भासल्यास मंत्रिमंडळात फेरबदल

0
12

>> भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांची स्पष्टोक्ती; भाजप संघटनेकडून केवळ सूचना देण्याचे काम; फेरबदलाच्या चर्चा थंडावल्या

राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहे. राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करणे आमचे काम नाही. मुख्यमंत्र्यांना फेरबदल करण्याची गरज वाटल्यास ते आवश्यक फेरबदल करू शकतात. भाजप संघटना केवळ सूचना देण्याचे काम करते, असे भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी काल भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली. तथापि, भाजपचे गोवा प्रभारी रवी यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे सांगून यावर आणखीन भाष्य करण्याचे टाळले.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आठही आमदार संतुष्ट आहेत. आपल्याकडे त्यांनी कोणतीही मागणी केलेली नाही किंवा असंतुष्ट असल्याचेही सांगितलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौर्‍याच्या वेळी आठही आमदार हजर होते. त्या आमदारांच्या क्षमतेचा भाजपच्या संघटनात्मक कार्यासाठी निश्‍चित वापर केला जाणार आहे, असे सी. टी. रवी यांनी सांगितले.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक कार्याला आणखी चालना देण्यावर भर देण्यात आला आहे, असेही रवी यांनी सांगितले.

कर्नाटक-महाराष्ट्र या राज्यांच्या सीमावादावर न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जाणार आहे. हा सीमावाद गेली ६५ वर्षे प्रलंबित आहे. दोन्ही राज्यांची भाषा वेगवेगळी असली, तरी संस्कृती एकच आहे, असेही रवी यांनी सांगितले.

तीन महिने उलटले, तरी
फुटीर आमदार पदांविना
गेल्या १४ सप्टेंबरला कॉंग्रेस पक्षाच्या ८ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात तत्कालीन मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, केदार नाईक व रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश होता. मधल्या काळात मुख्यमंत्र्यांनी या फुटीर आमदारांना लवकरच मंत्रिपदे आणि महामंडळांचे अध्यक्षपद दिले जाईल असे सुतोवाच केले होते; मात्र त्यानंतरही मंत्रिमंडळ फेरबदलाच्या कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. या आमदारांच्या पक्षांतराला आता तीन महिने उलटले, तरी फुटीरांना पदे मिळालेली नसल्याने नाही म्हटले, तरी त्यांच्यात काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. त्यामुळे पदे कधी मिळणार, याची आस आता या फुटीर आमदारांना लागली आहे.

दुश्यंत कुमार गौतम
यांच्याकडून मार्गदर्शन
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुश्यंत कुमार गौतम यांचे गोव्यात काल दुपारी आगमन झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे स्वागत केले. गौतम यांनी भाजप महिला मोर्चा कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, सरचिटणीस दामू नाईक, सुलक्षणा सावंत व अन्य महिला पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

फेरबदलाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य टाळले
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या प्रश्‍नावर बोलण्याचे टाळले. भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हे राज्याच्या भेटीवर आल्यानंतर कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत संघटनात्मक काम आणखीन वाढविण्यावर भर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. भाजपच्या आगामी दोन-तीन महिन्यांतील कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. भाजप सरकार अंत्योदय तत्त्वांवर काम करीत आहे. सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी लोकसंपर्क वाढविण्यावर भर देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

विमानतळाच्या मनोहर नावापुढे
पर्रीकर आडनाव जोडले जाणार!
मोप येथील नवीन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचेच नाव देण्यात आले आहे. मनोहर म्हणजेच मनोहर पर्रीकरच आहे. तथापि, केवळ मनोहर एवढेच नाव देण्यात आल्याने काही जणांकडून वेगळा अर्थ काढण्यात येत असल्याने आता मनोहर या नावापुढे पर्रीकर हे आडनाव जोडले जाणार आहे. तसेच, विमानतळावर त्यांचे छायाचित्र सुध्दा लावण्यात येणार आहे, असे भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी सांगितले.