गरज जनसहभागाची

0
112

गोव्यातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी घालणारा कायदा करण्याचा विचार सरकारने चालवला आहे. दुसरीकडे यापूर्वी घोषित केलेल्या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही गांभीर्याने करण्याचा सरकारचा मानस आहे. या दोन्ही पावलांचे जनतेने स्वागतच करायला हवे. फक्त प्रश्न एवढाच उरतो की या बंदीमध्ये जनतेचा सहभाग किती राहणार? सगळे काही सरकारने करावे अशीच जनतेची वृत्ती राहणार असेल तर जनसहभागाविना सरकारच्या अशा प्रकारच्या प्रयत्नांना यश मिळणे कठीण आहे. त्यामुळे नुसते कायदे करणे पुरेसे नाही. त्या कायद्यांच्या पालनाबाबत जनतेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होणेही तितकेच आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान हे मुख्यतः येथे येणार्‍या पर्यटकांकडून केले जाते. गोवा म्हणजे ‘खा, प्या आणि मजा करा’ हाच संदेश पर्यटनाला चालना देण्याच्या निमित्ताने गोवा मुक्तीपासून आजवर दिला गेला, त्याचा हा परिणाम आहे. गोव्यात यायचे म्हणजे मजा करायलाच यायचे, येथे या भूमीला काही संस्कृती आहे, वारसा आहे याच्याशी काहीही देणेघेणे नसलेल्या उडाणटप्पूंचे गोवा हे आवडते पर्यटनस्थळ असते ते केवळ येथे वाट्टेल तो धुडगूस घालता येतो यासाठीच. असे थेर अन्य कुठेही चालवून घेतले जाणार नाहीत, जेवढे गोव्यात खपवून घेतले जातात. रस्तोरस्ती वाहणारा दारूचा महापूर आणि मसाज पार्लरपासून कॅसिनोपर्यंतच्या सर्व उपलब्ध सोयी यामुळे अशा अपप्रवृत्तींचा गोवा हा स्वर्ग बनलेला आहे. अमली पदार्थांचा आणि वेश्यावृत्तीचा पडलेला विळखा काही एकाएकी पडलेला नाही. गोव्याची ही जी प्रतिमा जगामध्ये निर्माण केली गेली, त्यातून ही विषवल्ली फोफावत गेली आहे. गोव्यात यायचे, रेन्ट अ बाइक घ्यायच्या आणि दारू पित पित हिंडायचे हा प्रकार तर सर्रास दिसतो. ना त्याला कायद्याचा धाक, ना जनतेचा. या नववर्षाची सुरूवात होत असताना समुद्रकिनार्‍यांवर अगदी उघडउघड बिअरच्या बाटल्या विकायला बसलेल्या परप्रांतीयाचे छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहे. हे अशा प्रकारचे गैरधंदे चालतात कसे? कोणाच्या मेहेरबानीने? पोलिसांची गस्त असताना समोर अशा प्रकारे बिअर विकली जात असेल तर पोलिसांची पत ती काय राहिली? खरे तर संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन व्हायला हवे होते. गैरप्रवृत्ती बळावतात त्या या अशा प्रकारच्या बेफिकिरीमुळे. गोव्यात वास्तविक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास पूर्वीपासून बंदी आहे. परंतु अजूनही अनेक ठिकाणी सर्रास सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान चालते. दुकानांबाहेर उभे राहून हवेत धूर सोडणार्‍या मंडळींचे दर्शन ठायीठायी घडते. सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यास कायद्याने प्रतिबंध आहे, परंतु त्याचे देखील उघडउघड उल्लंघन होत असल्याचे दिसते. रस्त्याकडेला कचरा फेकण्यास मनाई आहे, परंतु तरीही रस्ते विद्रूप करीत वाहनांतून मोठमोठ्या प्लास्टिक पिशव्यांतून कचरा फेकला जातो, बांधकाम साहित्य, वैद्यकीय कचरा फेकला जातो. हे सगळे शेवटी मानवी वृत्तीवर अवलंबून आहे. केवळ कायदा केला म्हणजे त्याचे पालन होईल असे नव्हे. त्यामुळे गोवेकरांनी या सार्‍या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. गोव्यात जे जे काही गैर चालते त्याचे खापर परप्रांतीयांवर फोडून मोकळे होण्याची प्रवृत्ती गोवेकरांत बळावली आहेे. परप्रांतीयांचे लोंढे गोव्यात वाढले आहेत हे खरे आहे. त्यांच्यामुळे गलीच्छता आणि गुन्हेगारी वाढली आहे हे देखील बर्‍याच अंशी खरे आहे, परंतु त्याचा अर्थ तमाम गोवेकर मंडळी काही दुधाने धुतलेली आहेत असेही नाही. उच्चभ्रूंच्या वस्त्यांमध्येदेखील रस्तोरस्ती फेकला जाणारा कचरा सार्वजनिक स्वच्छतेबाबतची आपली बेफिकिरीच दर्शवतो. संध्याकाळच्या वेळी खुल्या जागेत हवा खात बिअर पित बसणारे कित्येक गोवेकर अगदी पणजीच्या उपनगरांमध्येही आढळतात. सरकार कायद्यामागून कायदे करीत असले, तरी त्याच्या व्यापक अंमलबजावणीसाठी काय तजवीज केली जाणार आहे हेही महत्त्वाचे ठरेल. ट्रॅफिक सेंटिनल प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करताना कोणी आढळले तर त्यांची तक्रार करण्यासाठी व्हॉटस्‌ऍप क्रमांक देता येऊ शकेल. येणार्‍या पर्यटकांचे येथे कसे वागावे याबाबत प्रबोधनही आवश्यक आहे. गोवा ही खुली धर्मशाळा नाही याचे भान त्यांनाही आले पाहिजे. केवळ महसुलावर डोळा ठेवून पर्यटकांची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण पर्यटन कसे वाढीस लागेल त्यावर सरकारने भर देणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशाचा उद्याचा नागरिक असलेल्या युवा पिढीवर, विद्यार्थ्यांवर नागरी जीवनात कसे वागावे याचे धडेही द्यावे लागतील. कायदे तर व्हावेच, परंतु त्याच्या जोडीने पूरक प्रबोधनही गरजेचे असेल. त्यांच्या पालनाची जबाबदारी जनतेनेही झटकू नये!