आत्महत्या कशा टाळता येतील?

0
131

 – रमेश सावईकर

आपण जगण्यात रस घेतला पाहिजे. जीवनात आपले ध्येय निश्‍चित करून ती साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम, तळमळ, अथक प्रयत्न व दृढ निर्धारपूर्वक कृती केली पाहिजे. जीवन यशस्वी, सुंदर व कृतार्थ बनविणे हे आपल्यावर अवलंबून आहे याची जाण ठेवून सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला हवे.

परमेश्‍वराने आपला संपूर्ण चतुरपणा वापरून मनुष्याची निर्मिती केली. सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्यप्राणी हा श्रेष्ठ मानला आहे. प्रत्येकाला मनुष्यजन्म एकदाच लाभतो. म्हणून प्रत्येकाने आपले जीवन सुंदर बनवावे, कृतार्थ बनवावे. त्यासाठी या जन्मावर अन् जगण्यावर शतदा प्रेम करावे. माणसाला जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून मरेपर्यंत जीवन जगावे. ते जमेल तितके समरसून जगण्यात खरा आनंद, अर्थ व पुरुषार्थ आहे. प्रत्येकाच्या वाट्याला सुख-दुःख कमी-अधिक प्रमाणात येतेच. जीवनात वैविध्य व खुमारी येते ती त्यामुळेच! अगदी सरळ-सरळ, साधे-सोपे जीवन वाट्याला आले तर ते जगण्यात विशेष अर्थ नाही.

जीवन जगताना माणसाला संघर्ष करावा लागतो. कष्ट काढावे लागतात. हाल-अपेष्टा सोसाव्या लागतात. सुख-दुःख भोगावी लागतात. जीवनातील यशापयशाचे चढउतार पहावे लागतात. स्तुती-निंदा ऐकावी लागते. त्यांतून कोणी माणूस सुटलेला नाही. या सर्व परिस्थितींचा विचार करून प्राप्त परिस्थितीत समस्यांवर मात करून आपले ध्येय साध्य करतो त्याचे जीवन अर्थपूर्ण बनते. माणसाने जीवनात अविचार करण्याची प्रवृत्ती बळावू दिली तर त्याला जीवन हे अर्थशून्य भासू लागेल. नैराश्य, वैफल्य यांची मर्यादा ओलांडून जीवन संपविण्याचा अविचार त्याच्या डोक्यात शिरेल. टोकाची भूमिका घेऊन तो स्वतःचा आत्मघात करण्यास मागे राहणार नाही. व्यक्तीने हत्या करणे म्हणजे गुन्हाच – स्वतःची असो वा दुसर्‍याची. माणसांमध्ये थोड्या प्रमाणात का असेना विध्वंसक वृत्ती ही असतेच. ती ज्यावेळी बळावते त्यावेळी अशा स्वरूपाचे गुन्हे त्याच्याकडून घडतात.
‘मृत्यू’ हा कोणाला चुकलेला नाही. जो या लोकी आलेला आहे त्याला ही जीवनयात्रा संपवून कायमचे जावे लागणारच आहे. तथापि माणसाच्या वाट्याला कसला मृत्यू येतो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

आत्महत्या या सर्वच काळात होत असत. पण अलीकडच्या काळात त्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. आत्महत्या करण्यामागची कारणे विविध असतात. काहींच्या मते आत्महत्या या अनुवांशिक असतात. भोवतीचे वातावरण हेही आत्महत्येचे एक कारण असावे. काहींच्या दृष्टीने अनुकरण हेसुद्धा आत्महत्येचे कारण असते.
जीवनात आलेले अपयश, मानभंग, प्रेमभंग, वाढलेले कर्ज, सुनेला केलेला जाच, राग, चिंता, भय, ताण-तणाव आदी गोष्टींमुळे लोक आत्महत्या करतात. आत्महत्येला प्रवृत्त करणारे अपयश कधी परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यातून, कधी प्रेम-वैफल्यातून तर कधी ध्येय साध्य न झाल्यातून असते.

नैराश्य, वैफल्य, राग या गोष्टीही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. आत्महत्या करणार्‍याचा राग हा कधी स्वतःवरील असतो तर कधी दुसर्‍यांचा त्याच्यावरील राग असतो. यावरून बिघडलेले कौटुंबिक व सामाजिक वातावरण यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती कितीही बिघडली, प्रतिकूल बनली तर वास्तवाला भिडण्याची मानसिक ताकद, सकारात्मक दृष्टीकोन व विचारक्षमता माणसांकडे असली तर स्वतःची हत्या करण्याचा विचारही त्याच्या मनाला स्पर्श करणार नाही!
माणसांमध्ये काहीतरी निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. अशा सर्जनशील प्रवृत्तीबरोबर एक विध्वंसक प्रवृत्तीही असते. जगण्याची तीव्र ओढ व सहजप्रवृत्ती जशी सगळ्यांच्यात आढळते तसेच मृत्यूबद्दलची ओढ व सहजप्रवृत्तीही आढळते. म्हणून काही वेळा माणूस ‘‘असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं!’’ असे पटकन जोशात बोलून जातो. पण कधी ही माणसं जीवनातील तारतम्य ओळखतात. विचार करतात. म्हणून आत्महत्या करण्याचा वा जीवन संपविण्याचा अविचार करत नाही.
सामाजिक ऐक्याचा होणारा र्‍हास हेसुद्धा आत्महत्येसाठी प्रवृत्त होण्याचं एक कारण ठरते. आपला कुणी आदर करीत नाही, अवहेलना केली जाते, गळचेपी होते अशी भावना माणसांमध्ये नकारात्मक सामाजिक कारणांमुळे निर्माण होते. त्यामुळे माणसं आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतात.

कुटुंबात आपल्याला स्थान दिलं जात नाही, आपल्या मताची कदर केली जात नाही, घरातील कोणतेही निर्णय घेताना घरच्यांना आपल्याला विचारावेसेही वाटत नाही… असे वाटू लागल्यावर माणसाला एकाकीपणा जाणवू लागतो. कुटुंब व समाज जर आपल्याला मानत नाही तर जगायचे तरी कुणासाठी?… असा प्रश्‍न त्याला पडतो. जीवन अर्थशून्य वाटतं अन् आत्महत्या करून जीवन संपविणं हा एकमेव पर्याय ठरवून तो प्रत्यक्ष कृती करतो.
काही माणसं आत्मकेंद्री असतात. स्वतःभोवती एक घट्ट संरक्षक विचारांची भिंत उभी करून स्वतःला कोंडून घेतात. समाजापासून अलिप्त राहणे पसंत करतात. त्याचा परिणाम त्यांच्यातला एकाकीपणा व त्यांचा अहंभाव वाढण्यात होतो. जगण्यात स्वारस्य वाटत नसल्याने ती आत्महत्या करतात.

सामाजिक जीवनात स्थित्यंतरे होत असतात. ही स्थित्यंतरे अनेकदा समाजजीवन दुभंगून टाकतात. त्यामुळे माणसाला समाजाचा हवा तेवढा आधार मिळत नाही. प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या आधाराची अपेक्षा असते. सामाजिक समर्थनाची माणसाला अत्यंत आवश्यकता असते. जेव्हा माणसाला असे समर्थन व आधार मिळत नाही त्यावेळी दुर्बल मनोबलाची माणसे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात.
आत्महत्या या टाळता येऊ शकतात. त्याकरिता अनेक सकारात्मक गोष्टी व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर करता येण्यासारख्या आहेत.
आपण जगण्यात रस घेतला पाहिजे. जीवनात आपले ध्येय निश्‍चित करून ती साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम, तळमळ, अथक प्रयत्न व दृढ निर्धारपूर्वक कृती केली पाहिजे. जीवन यशस्वी, सुंदर व कृतार्थ बनविणे हे आपल्यावर अवलंबून आहे याची जाण ठेवून सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला हवे.

प्रत्येक गोष्टीबाबत सारासार विचार करून, तारतम्य बाळगून कृती करावयास हवी. आपले व्यक्तिमत्त्व उत्तम बनवून सामाजिक जीवन जगले पाहिजे. आपल्या संपर्कात येणार्‍या माणसांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावे. कोणी आपल्याकडे लक्ष देत नसेल तर त्याची पर्वा करू नये. त्याकडे दुर्लक्ष करावे.
आपल्याला एखाद्या गोष्टीत अपयश आले तर निराश न होता पुनश्‍च प्रयत्न करावे. अपयश का आले याचा वस्तुनिष्ठ, बुद्धिनिष्ठ भूमिकेतून विचार करून स्वतःचे मानसिक बळ वाढवावे. अपयश येऊनही कित्येक माणसं जगत असतात. आपण कां म्हणून आपले जीवन संपवावे? यशाचे शिखर गाठून जीवन फलदायी बनवण्यातच खरा पुरुषार्थ आहे असा विचार करावा.

आपल्या अपयशाला दुसरा कोणी किंवा परिस्थितीला जबाबदार ठरवू नये. त्याबद्दल जवळच्या माणसांशी बोलून मन मोकळं करावं. एखादे संकट वा दुःखद प्रसंग ओढवणार याची पूर्णकल्पना येताच इतरांचे सहाय्य, आधार घ्यावा.
आपल्याला दुसर्‍याने मान द्यावा, कदर करावी अशी अपेक्षा आपण बाळगतो. त्यासाठी आपणही दुसर्‍यांची कदर करावी. कुणाचा अनादर करू नये. त्यामुळे स्नेहार्द्र संबंध प्रस्थापित होण्यास मदत होईल. चांगले मित्र जोडावेत. जीवनात जेवढी जास्त माणसे जोडता येतील तेवढी जोडावीत. कुणाला तोडू नये. माणसांना एकमेकांचा आधार फार मोठा असतो. कोणत्याही कठीण प्रसंगातून सावरण्यास तो उपयोगी पडतो.

आत्महत्येचा विचार मनात येताच आपण आपल्या आई-वडलांचा, बहीण-भावांचा, आप्तेष्टांचा विचार करावा. आपल्या आत्महत्येनंतर त्यांच्या वाट्याला किती दुःख, यातना होतील, कुटुंबाला कायमचा डाग लागेल याचा विचार करावा.
प्रत्येक मनुष्याने उच्च दर्जाचे, उत्तम वैयक्तिक, धार्मिक व आध्यात्मिक जीवन जगावे. तसा प्रयत्न करीत राहिल्यास आत्महत्येच्या विचारांपासून आपण कायमचे दूर राहू. आपलं जीवन हे फक्त स्वतःचे व स्वतःसाठी आहे असा एकांगी विचार न करता ते कुटुंबासाठी व समाजासाठी आहे असा साधक विचार करावा. आपण विधायक दृष्टीकोन ठेवला, सत्कर्मी जीवनाचा अवलंब केला, तर आपल्याकडून गैर कृत्य घडणार नाही.
विंदा करंदीकर यांनी आपल्या ‘तेच ते’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे जीवन आणि मरण सारखेच निरर्थक, नित्याचे असल्यामुळे आपण जीवनाची निवड करणे केव्हाही सूज्ञपणाचे ठरेल!!