गप्पा (घरकुल)

0
152
  • प्रा. रमेश सप्रे

गप्पांमुळे मनावरचं मळभ, बुद्धीवरचा काळोख वितळायला मदत होते. ज्याला मनाचं व्हेंटिलेशन म्हणतात किंवा गच्च मनाच्या प्रेशरकुकरची शिट्टी म्हणतात ते साध्य होतं.

गप्पागोष्टी, गप्पाष्टक, गप्पाटप्पा असे निरनिराळे शब्दप्रयोग वापरले जातात. मूळ शब्द अर्थातच गप्पा जो घराचं घरकुल बनवण्याचा शॉर्टकट् आहे. दुर्दैवानं घरातलं वातावरण नितळ, निखळ राखणार्‍या अशा गप्पा आता निर्वंश होत चालल्या आहेत इतर अनेक साध्या सोप्या सुंदर गोष्टींप्रमाणे. असो.
सध्याच्या कोविड-काळात स्वतःला सुधारण्याच्या, घराला सावरण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे अनेकजण त्याचा लाभही घेत आहेत. योगाभ्यास, इतर व्यायाम प्रकार, एकूण शारीरिक तंदुरुस्ती, नवनवीन कौशल्यं इ. अनेक प्रकारानं स्वतःच्या व्यक्तिमत्वात मूल्यात्मक भर (व्हॅल्यू ऍडिशन) घातली जात आहे. पण हे सारे प्रकार स्वकेंद्री आहेत. संपूर्ण घराला मोकळं, आनंदी राखण्याचा हुकमी एक्का जो आपल्या सर्वांच्या हातात आहे तो म्हणजे मनमुक्त गप्पा.

गप्पा मारायला मुख्य माध्यम लागतं ते म्हणजे वाणी किंवा बोलणं. अभिनय, नक्कल करणं, विनोदी वृत्ती, हजरजबाबीपणा अशा गोष्टी दुय्यम असतात. पण त्यामुळे गप्पासत्र अधिक रंगतदार बनतं हे निश्‍चित.

आजकाल समाजमाध्यमांचा प्रभाव वाढलाय. ङ्गक्त युवापिढीवरच नव्हे तर सर्व वयोगटातील व्यक्तींवरही. ज्येेष्ठ नागरिकही याला अपवाद नाहीत. मोबाईलवर बोलणं, लॅपटॉपवर चॅटिंग करणं, विडियोकॉल्स करून एकमेकाशी आभासी (व्हर्च्युअल) वातावरणात बोलणं इ. प्रकारांना गप्पांची खुमारी कधीच येत नाही. कारण प्रत्यक्ष, जिवंत, उबदार, रुचकर, सुगंधी, स्पर्शयुक्त विचार-भावना-कल्पना यांचं आदानप्रदान अशा माध्यमातून कधीही साध्य होणार नाही. ही वस्तुस्थिती हळुहळू लक्षात येऊ लागलीय. म्हणूनच निरनिराळे प्रसंग एकत्र येऊन साजरे करणं, साध्या कारणांनी एकत्रजमणं (गेटटुगेदर), विविध निमित्तांनी मेळावे भरवणं (उदा. – विशिष्ट बॅचचे विद्यार्थी, लग्नाची दहावी-पंचविसावी ऍनिव्हर्सरी (वाढदिवस) साजरी करणार्‍या दांपत्यांचं स्नेहमीलन इ.) असे प्रकार वाढू लागले असतानाच कोरोनानं त्यांना खीळ घातली. पण घरातील अनेक सदस्य दिवसाचे चोवीस तास नि आठवड्याचे सातही दिवस एकत्र असल्याने सर्वांच्या दृष्टीनं आनंदाची पर्वणी, हास्यविनोदाचा भावपूर्ण खजिना म्हणून गपागोष्टी रोजच्या दैनंदिनीचा भाग बनल्या पाहिजेत. तशा त्या अनेक ठिकाणी बनू लागल्यातही. पण बर्‍याचवेळा त्यांना भेंड्या, अंताक्षरी, उखाणे, कोडी, विनोदी किस्से यांचं स्वरुप येतं. हाही गप्पांचा एक भाग आहे पण त्यामानानं कमी महत्त्वाचा.

महत्त्वाची गोष्ट आहे उत्स्ङ्गूर्त देवघेव स्मृतींची, घटनांची, पडद्याआड गेलेल्या किंवा पडद्यासमोर असणार्‍या व्यक्तींची. गेल्या काही दिवसात अनेकांशी दिलखुलास संबंध असलेल्या अनेक व्यक्ती चटका लावून गेल्या. त्याचवेळी चटकदार शब्दात आपले चांगले वाईट अनुभव, यश-अपयश, मान-अपमान, ङ्गजिती, प्रत्यक्ष घडलेल्या गमतीजमती अशा अनेक आपबीतींचे – स्वतःवर अकस्मात कोसळलेल्या किंवा चवीनं अनुभवलेल्या गोष्टी वर्णन करणारीही अनेक मंडळी आपल्या कुटुंबात असतात.

समोरासमोर असणं, वर्तुळाकार बसणं किंवा कसंही ऐसपैस बसणं गप्पांना मानवणारं असतं. अधुनमधून पकोडे, भेळ, चटकमटक पदार्थ तोंडी लावायला हरकत नसते. अनेक घट्ट विणीच्या कुटुंबातील गप्पा त्यांच्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींनी ऐकणं हाही आनंदाचा अनुभव असतो. काही गप्पागोष्टींचे मुखडे पहा –

  • ‘आमच्या वेळी हे असं नव्हतं…’ पूर्वी हे खास आजीआजोबा किंवा वडीलधार्‍या मंडळींच्या तोंडी असलेले शब्द. आज पाच-दहा वर्षांनं मोठ्या असलेल्या व्यक्ती धाकट्यांना असंच सांगतात.
  • ‘तो प्रसंग आठवतो…’ यावेळी सगळेजण कान टवकावरून ऐकू लागतात. अगदी लहानग्यांसाठी असे प्रसंग नवीन असतात. इतरांसाठीही उत्सुकता वाढवणारे असतात.
  • ‘शाळेचा पहिला दिवस..’ म्हटल्यावर अनेकांसमोर निरनिराळे दिवस येतात. अशा गप्पांमुळे स्मृतींना छान उजाळा मिळतो. काही गोड, काही कडू, काही हुरहूर लावणार्‍या तर काही भूतकाळात रमूनरंगून जाणार्‍या अशा आठवणी. अशा गप्पांमुळे काय काय साधतं माहितै?
  • जुना काळ, गेलेलं आयुष्य यांना संजीवनी मिळते. मनाचा हा एक प्रकारचा व्यायामच असतो. अल्झायमर्स, स्मृतिभ्रंश अशांचे वाढणारे आघात कमी व्हायला मदत होते.
  • गप्पांमुळे मनावरचं मळभ, बुद्धीवरचा काळोख वितळायला मदत होते. ज्याला मनाचं व्हेंटिलेशन म्हणतात किंवा गच्च मनाच्या प्रेशरकुकरची शिट्टी म्हणतात ते साध्य होतं.
  • भेंड्या किंवा अंताक्षरी हे खेळ आहेत. त्यांना गप्पांचा भाग न बनवणं चांगलं. त्याचबरोबर आवश्यक आहे चहाड्याचुगल्या, उखाळ्या पाखाळ्या, वाद होतील असे राजकारणासारखे विषय टाळणं.
  • गप्पांना तिन्हीत्रिकाळ चालतात. भूतकाळात रमणं, वर्तमानकाळाबद्दल सजग सावध होणं, भविष्यकाळाचा केवळ मनोराज्यं, अवास्तव कल्पनाचित्रं असा वेध घेणं टाळणं हेही आवश्यक असतं. एकूण गप्पांचा टोन हा आशावादी असणं हितकारक असतं.
  • स्मरणरंजन (नॉस्टॅल्जिया) जसं गप्पातून घडतं तसंच कळतनकळत आत्मपरीक्षणही घडतं. बुद्धीच्या ज्या विविध शक्ती आहेत जशी विचार, कल्पना, तर्क, नवनिर्मिती अशा सर्व क्षमतांचा सहज विकास नि विलास घडतो.

अशा मुक्त गप्पा सलग काही दिवस मारल्या तर त्याची चटक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लागते. इतकी की कुटुंबाच्या दैनंदिनीत वेळही ठरते नि स्थळही. सर्वजण एकत्र येतात…
मोकळंमोकळं, हलकंहलकं, ताजंतवानं, टवटवीत होण्यासाठी. सर्वात छोट्या मंडळींची प्रतिक्रिया या संदर्भात पुरेशी बोलकी आहे. हा गप्पांचा पिरीयड आम्हाला कसा वाटतो माहितै? शाळेतल्या ड्रॉइंग – म्यूझिक – क्राफ्ट – पी.ई. (शारीरिक शिक्षण) अशा पिरीयड्‌ससारखा. हलका ङ्गुलका नि मस्त! खरंच ‘गप्पा’ये चीज बडी है मस्त मस्त!