गतविजेत्या बंगळुरूला प्रतीक्षा गोल करण्याच्या फॉर्मची

0
142

बंगळुरू एफसीने इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतमोसमात अतुलनीय फॉर्म प्रदर्शित करीत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याच बंगळुरूचा बचाव यंदा सुरवातीलाच ढिसाळ होत आहे.

सलग तिसर्‍या सामन्यात त्यांना बरोबरी पत्करावी लागली. रविवारी जमशेदपूर एफसीविरुद्ध जेआरडी टाटा क्रीडा संकुलात मोसमात तिसर्‍यांदा त्यांची बरोबरी झाली. गेल्या दोन मोसमांत मिळून याच बंगळुरूच्या केवळ पाच बरोबरी झाल्या होत्या.
पहिल्या तिन्ही सामन्यांत गतविजेत्यांना गोल करण्याची संधी मिळाली नाही असे नाही. ते प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस ठरले आहेत. बंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांचा निर्धार कायम आहे. ते म्हणाले की, आमच्या बरोबरी होत आहेत, कारण आम्ही फार चांगल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळतो आहोत. गोल करता यावेत म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही गोलच्या संधी निर्माण करीत आहोत ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला दडपण जाणवण्याची गरज नाही. आम्हाला सराव सुरु ठेवावा लागेल आणि मग विजय मिळेलच.

थेट नेटच्या दिशेने किंवा बाजूला असे २५ शॉट मारताना कुआद्रात यांचा संघ केवळ एक गोल करू शकला आहे. आयएसएलमधील बंगळुरूबद्दलची ही आकडेवारी फार विचित्र आहे. गेल्या दोन मोसमांत बंगळुरूपेक्षा जास्त गोल केवळ एफसी गोवाला करता आले आहेत. त्यामुळे बंगळुरूच्या बचाव फळीत भेदकतेचा अभाव का आहे असा प्रश्न निर्माण होतो.

रॅफेल आगुस्टो आणि केरळमध्ये जन्मलेला आशिक कुरूनीयन यांच्या समावेशासह बंगळुरूने आपले आक्रमण भक्कम केले आहे. कुरुनीयन याला यंदा अपरिचीत अशा लेफ्ट-बॅकच्या ठिकाणी खेळविण्यात येत आहे. व्हेनेझुएलाचा स्ट्रायकर मिकू याची उणीव भरून काढणे मात्र जड जात आहे.

२०१७-१८च्या मोसमात अंतिम फेरीतील वाटचालीत मिकू आणि सुनील छेत्री यांची जोडी दमदार ठरली होती. संघाच्या गोलांमध्ये त्यांचा वाटा मोठा होता. मागील मोसमातही हेच घडले. मिकूने काही महत्त्वाचे गोल केले आणि छेत्रीने त्याला सक्षम साथ दिली. त्यामुळे बेंगळुरूने जेतेपदापर्यंत भरारी घेतली. मिकूने बंगळुरुसाठी ३२ सामन्यांत २० गोल आणि चार ऍसिस्ट अशी कामगिरी केली. या अप्रतिम फॉर्ममुळे केवळ दोन मोसम खेळूनही तो आयएसएलमध्ये गोल करणार्‍यांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. वास्तविक गेल्या मोसमात दुखापतीमुळे त्याला बर्‍याच सामन्यांना मुकावे लागले.

कुआद्रात म्हणाले की, मिकू हा विशेष गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. त्यामुळे त्याची उणीव कोणत्याही संघाला नेहमीच बरीच जाणवेल. मिकूच्या गैरहजेरीतही संघ गोलच्या बर्‍याच संधी निर्माण करू शकला असे वाटते. आम्ही बर्‍याच वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयोग करतो आहोत. मिकू असताना आणि नसताना आम्ही गोलच्या बर्‍याच संधी निर्माण करू शकतो.

मिकूच्या जागी स्पेनचा ३१ वर्षांचा स्ट्रायकर मायकेल ओन्वू याला घेण्यात आले आहे. त्याला मोठी जागा भरून काढायची आहे. आघाडी फळीचे नेतृत्व करताना त्याला कुआद्रात यांच्या संघासाठी अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. मोसमाच्या इतक्या लवकर कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, पण पहिल्या पसंतीचा हा स्ट्रायकर कामगिरी उंचावेल आणि आगामी सामन्यांत अपेक्षित निकाल साध्य करून देईल अशी आशा कुआद्रात यांना असेल.

मध्य फळीतून ओन्वूला साथीची उणीव भासणार नाही. छेत्रीला अद्याप फॉर्म गवसलेला नसला तरी उजव्या बाजूला उदांता सिंग धोकादायक ठरला आहे. स्ट्रायकरच्या पाठीमागील जागेत आगुस्टो सहज स्थिरावला आहे. मध्य फळीत डिमास डेल्गाडो याच्यामुळे प्रतिस्पर्ध्याचा बचाव भेदणारे पासेस सातत्याने मिळत आहेत.
बंगळुरू एफसीसाठी आघाडीवरील महत्त्वाच्या खेळाडूंनी कामगिरी उंचावण्यास केवळ थोडाच अवकाश आहे. धोकादायक क्षेत्रात छेत्रीला आणखी जास्त प्रमाणावर चेंडू मिळण्याची गरज आहे. आघाडी फळीतील इतर सहकार्‍यांसह ओन्वूने सरस समन्वय साधण्याची गरज आहे. त्यामुळे बंगळुरू त्यांना मिळणार्‍या संधींचे गोलामध्ये रुपांतर करू शकेल.

मोसमापूर्वी इतर संघांनी कामगिरीत सुधारणा करून खेळ भक्कम केला आहे. यात बाद फेरीच्या शर्यतीत जमशेदपूर एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी अशा संघांनी आघाडी घेतली आहे. अशावेळी छेत्री आणि कंपनीला आणखी बरोबरी मिळवून गुण गमावत राहणे परवडणार नाही.