खोप

0
167

– सौ. पौर्णिमा केरकर

आठवणीच त्या… उगाळत राहिल्या की एकात एक अशी एक न संपणारी लडच त्यातून निर्माण होऊन त्यात जीव पुरता गुंतून जातो. नाही म्हटले तरी त्यानिमित्ताने खूप हळवे व्हायला होते. बाबीबरोबरच आम्हा सर्वांच्याच हृदयात या आठवणींनी कालवाकालव सुरू केली.

पब्लिक स्पीकिंगच्या उपक्रमांतर्गत बाबी बोलायला उभा राहिला. विषय होता- ‘माझ्या जीवनाचा प्रवास.’ अगदी भावूक होऊन बाबीने गतकाळातील आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात केली. आठवणीच त्या… उगाळत राहिल्या की एकात एक अशी एक न संपणारी लडच त्यातून निर्माण होऊन त्यात जीव पुरता गुंतून जातो. नाही म्हटले तरी त्यानिमित्ताने खूप हळवे व्हायला होते. बाबीबरोबरच आम्हा सर्वांच्याच हृदयात या आठवणींनी कालवाकालव सुरू केली.

बाबी आज अग्निशामक दलात अधिकारी पदावर रुजू आहे. असे असले तरी माझ्या सासरच्या घरामागच्या खोपीत त्याने केलेला अभ्यास आठवत होता. या खोपीने अनेकांना घडविले. त्यांच्या आयुष्याला दिशा मिळवून दिली. भाई बसत असलेली लाकडी ‘वलत्यार’सदृश्य खुर्ची आणि सभोवताली माना खाली घालून अभ्यास करणारी मुले असे एक काहीसे गंभीर चित्र खोपीत परीक्षेच्या दिवसांत कायमच असायचे. या खोपीचे छप्पर काळवंडून गेलेले मी पाहिले होते. तिचे बांधकाम करताना कित्येक वर्षांपूर्वी मुस्लिम बांधवांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते. कवटी, हातापायाची हाडे असे अवयव खणलेल्या फोणकुलातून मी स्वतः उचकून काढलेले आहेत, अशी आई सांगायची. तेव्हा सुरुवातीला माझ्या अंगावर शहारे यायचे. पण नंतर प्रत्यक्षातच घराला अगदी टेकून असलेली मुसलमान बांधवांची स्मशानभूमी आणि त्यांनी केलेले कित्येक दफनविधी प्रत्यक्षात पाहिले आणि हळूहळू माझ्या मनातील भीती गळून पडली.
ही अशी भीती कमी व्हायला समृद्धीसुद्धा कारणीभूत ठरली. त्याचे असे झाले, मातीत मृत व्यक्तीला पुरताना पाहण्याचा समृद्धीचा लहानपणापासूनचा हट्ट. ‘माणूस मेला की तो देवाघरी गेला’ असे सांगत लहानग्यांची बोळवण करणे हे मोठ्यांचे नेहमीचेच काम. पण समृद्धीला ते पटत नाही. ती म्हणते, माणूस मेल्यानंतर त्याला मातीत पुरताना मी खूप वेळा पाहिले आहे. म्हणजे मग तो मातीत जातो, देवाघरी जात नाही. शेवटी त्या व्यक्तीचे काय होत असावे या उत्कंठेपायी ती रात्री बारा वाजतासुद्धा या स्मशानभूमीत जाऊन आलेली आहे. तिची दोस्तमंडळीसुद्धा आता असाच विचार करू लागली आहे. हे सगळे जे घडत होते त्याला आमची ही खोप पूर्वीपासूनच साक्षीदार होती. त्यामुळे इथे रात्रीचे दिवस करून अभ्यास करणार्‍या मुलांना ना कधी भुतांचा आवाज ऐकू आला, न कधी कोणी पछाडले. अभ्यास करता करता कधी डोळा लागायचा. जाग सकाळीच यायची. अशा या खोपीच्या आठवणी बाबीने जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा या खोपीच्या अभ्यासातील सहवासाचे जे जे साक्षीदार होते त्यांना गहिवरल्याशिवाय राहिले नाही. हा गहिवर नुसताच आठवणींचा नव्हता तर त्याच्याशी असलेल्या निरागस वयातील उत्कट आत्मीयतेचाही होता.
लग्नानंतर तर मी शेकडो विद्यार्थी येथे अभ्यास करतानाची साक्षीदार होते. सुमी, संकेत, सर्वेश, शिल्पा, शीतल, संतोषी… किती नावे घ्यावीत. सगळ्यांनाच अभ्यासासाठी या खोपीने मायेचे छप्पर पुरविले. दहावी-बारावीचा अभ्यास करताना या मुलांना झोप यायची. आई त्यांना कोरा चहा करायची. समृद्धी, छकुली लहान असताना अभ्यास करताना कोण झोपत आहे, कोण अभ्यासाचे फक्त नाटक करीत आहे यावर बारकाईने लक्ष ठेवायच्या. एकदा तर खांबाला टेकून तोंडावर पुस्तक धरलेल्या अवस्थेत झोपलेल्या सर्वेशवर आईने चपलांचा असा नेम धरला की सर्वेशला कुठून कोण जाणे कशी जाग आली, नेम चुकवत त्याने जी धूम ठोकली ती अगदी विवेकाच्या घरात पोचला. तो एकच प्रसंग. त्यानंतर मात्र त्याने याच खोपीत मन लावून अभ्यास केला.
या खोपीत अभ्यास करून गेलेली कित्येक व्यक्तिमत्त्वे आज विविध ठिकाणी चांगल्या हुद्यावर स्थिरावलेली आहेत. बाबी, सरोजनी ही त्यातली प्रातिनिधिक नावे आहेत. आमच्या बालपणी अभ्यास हा ट्यूशनच्या कचाट्यात सापडलेला नव्हता. त्यासाठी काही खास जागा ठरलेल्या होत्या. एखादा मळा, आंब्या-फणसाचे झाड, गवताची कुडी, आंब्याच्या झाडावर केलेल्या मचाणावर, जुनाट पडका गोठा, देवाचा मांगर अशा त्या जागा होत्या. मी तर माझा दहावी-बारावीचा अभ्यास आमच्या घराच्या वरच्या बाजूला गारफाच्या शेजारी असलेल्या फणसाच्या झाडाखाली बसून केला. त्यानंतर मग वायंगणी भात कापल्यावर घरासमोरचा विस्तीर्ण मळा मोकळा व्हायचा. वर निळ्याभोर आकाशाचे छत आणि खाली विस्तीर्ण पसरलेला मळा. दुपारी या मळ्यात पुस्तक घेऊन जायचे व संध्याकाळी काळोख पडायच्या आत घरी परतायचे असं जणू ठरलेलंच होतं. निसर्गाच्या सान्निध्यात वार्‍याच्या झुळकीचा स्पर्श अंगागाला रोमांचित करायचा. भर दुपारीसुद्धा फणसाच्या झाडाखाली बसल्यावर उन्हाच्या झळा पानांच्या सळसळीने कोठल्या कोठे गायब व्हायच्या. गारफावर केलेल्या मचाणावर तर दिवस-दिवस झोपून, तोंडावर पुस्तक ठेवूनही अभ्यास केलेला. आज आठवतं… कोणी कधीच अभ्यासाची सक्ती केली नव्हती. अमुकच टक्केवारी यायला हवी, परीक्षा जवळ आली आहे टीव्ही पाहू नकोस असे कंटाळवाणे सल्लेसुद्धा कधीच दिले नव्हते. त्यामुळे टीव्ही पाहण्याचा शौक पुरा करतच त्याच्या समांतर रेषेतच अभ्यास सुरू असायचा. कधी एखादी आवडती मालिका असली की हातात अभ्यासाची सामग्री घेऊनच दूरदर्शनसमोर बसणे व्हायचे. जाहिरातींचा ब्रेक सुरू झाला की मग वहीकडे लक्ष. या दूरदर्शनच्या मालिकांमुळे अभ्यासाचा खोळंबा कधी झाला नाही. अभ्यास करून पास व्यवस्थित झाले तर मग पुढचा मार्ग सुकर होईल याची जाणीव होती. त्यामुळे मला असेच वाटत आलेले आहे की, मनात कर्तव्याची जाणीव उत्कट तीव्रतेने जतन केली की आपण काय करत आहोत आणि काय करायला हवे हे कळून चुकते. गुणवत्तेबरोबर हवे असलेले वेळेचे, काळाचे भान त्यावेळीही होते म्हणून सारे शक्य झाले असावे.
जीवनप्रवासातील खूप सार्‍या रम्य आठवणी या भूतकाळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. वेदनामयी आठवणींचे ओझेसुद्धा या भूतकाळानेच दिलेले आहे. ते पेलायचे सामर्थ्य प्रवाही असलेला काळ जेव्हा देतो तेव्हा वर्तमान सुसह्य होते. लग्नानंतर आमच्या घराच्या खोपीत बसून अभ्यास करणार्‍या या मुलांना पाहून माझ्या अभ्यासाच्या जुन्या आठवणी तीव्रतेने जाग्या झाल्या. आज या खोपीतली विद्यार्थ्यांची गर्दी कमी कमी होत गेलेली आहे. ट्यूशनची क्रेझ वाढल्याने स्पर्धा, अपेक्षांची उंची ही सारीच कारणे त्यामागे आहेत. खोपीनेही आपली पूर्वीची कात टाकली. चुलीच्या जागेवर पितळीचा बंब पाणी तापविण्यासाठी स्थिरावला. धुरामुळे काळवंडलेले छप्पर आजही जुन्या दिवसांची आठवण करून देते. आता तर सोलार हिटरचे गरम पाणी यंत्र असल्याने बंबसुद्धा विस्मृतीत गेला, आणि खोपीतली अडगळ मात्र एकेक करून वाढत गेली. एक ओंगळ, अस्ताव्यस्त, बकाल रूप तिला प्राप्त झाल्याचे दिसत आहे. वाट्याला आलेली उपेक्षा सहन करीत, गतकाळाच्या आठवणी आळवीत ती असावी असे राहून राहून वाटते. भाईची बसण्याची आरामखुर्ची आता अडगळीतच गेली आहे. अभ्यास करण्याच्या संकल्पना आणि जागाही बदलल्याने संवेदनशील मनाची सारी समीकरणेच बदलून गेलेली आहेत.
तारुण्य हे वयातच दडून राहिलेले असते असे का म्हणून ठरवायचे? मनालाच आठवणींचे धुमारे फुटतात. वय वाढतच जाणार, त्याला अडवणार कोण? परंतु आपल्या अंतर्मनाच्या अथांग आकाशात मात्र रंगबिरंगी इंद्रधनूच्या आठवणींचा गोफ आपण निश्‍चितच विणू शकतो. आयुष्यात घडून गेलेल्या सगळ्याच चांगल्या प्रसंगावर… त्या त्या जागांवर, माणसांवर… निसर्गावर जीव ओवाळून टाकावा असे सारखे वाटत राहते. वाढणारे वय वार्धक्याची खूण म्हणून स्थिरावू लागले तर मात्र ती एक वेदनामयी गुंतवळ होईल… पण खोपीच्या या आठवणी मात्र अनेकांना त्या निरागस बालवयाच्या चैतन्याच्या खुणा म्हणूनच जपाव्या लागतील.