- देवेश कु. कडकडे ( डिचोली)
राज्यातील खासगी बसवाहतुकीला प्रवासी उबगले आहेत. मात्र, खासगी बसवाल्यांची मनमानी मोडीत काढण्यासाठी स्थापन झालेले कदंब महामंडळ मात्र प्रवाशांना पर्याय देण्यात आजवर कमी पडले आहे..
गोव्यातील खासगी बस वाहतूक जनतेसाठी उपयुक्त साधन बनली आहे. आज सर्व स्तरांतील जनतेकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने असूनही गोव्यातील वाढती लोकसंख्या, परप्रांतियांची त्यात झालेली लक्षणीय वाढ, यामुळे खाजगी बस वाहतुकीचा धंदा जोराने चालला आहे. म्हणजेच एक दिवस त्यांनी जर संप पुकारला तर सर्व व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे परिस्थितीला शरण जाऊन जनतेला तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आणि प्रशासनालाही त्यांच्यापुढे सदैव नमते घ्यावे लागते. या खासगी बसवाल्यांची गुर्मी जिरविण्यासाठी १९८० साली दसर्याच्या शुभमुहूर्तावर कदंब वाहतूक मंडळाची स्थापना मोठ्या दिमाखाने करण्यात आली. जनतेला सुरक्षित, आवश्यक, सुखकारक, नियमित, दर्जेदार आणि कार्यक्षम सेवा पुरविण्याचा मुख्य हेतू होता. हा हेतू प्रामाणिक असला तरी भ्रष्ट कारभारामुळे हे प्रयत्न तितके फलदायी ठरू शकले नाहीत. आज हे कदंब महामंडळ टिंगलीचा विषय बनले आहे. जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. ‘कदंब’ मधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा मात्र जनतेला ऐकाव्या लागत आहेत. हे महामंडळ सतत तोट्यात चालले. बुडीत निघालेल्या या महामंडळाला वारंवार अनुदान देण्याची नामुष्की सरकारवर येत असते.
कदंबची उदासीनता
कदंब बसचे चालक आणि वाहक प्रवासी भरण्यात उदासीन दिसतात. कळकळ दिसत नाही. बस प्रवाशांविना सुटली तरी चालेल, त्यांना काही फरक पडत नाही. काही कंडक्टर प्रवाशांना तिकीट न देण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधून काढतात आणि ते पैसे स्वतःच्या खिशात टाकतात. असल्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे हे महामंडळ सदैव तोट्यात चालले. कदंब महामंडळाच्या बसस्थानकांवर लाऊडस्पीकरवरून घोषणा दिल्या जातात की, कदंब कर्मचार्यांना विनंती आहे की, प्रवाशांशी सौजन्याने वागा आणि कदंबचे नाव उज्ज्वल करा. सरकारी कर्मचारी सर्वसामान्यांशी कसा वागतो, हे सर्वज्ञात आहे. आपण चुकूनही सर्वसामान्यांशी सौजन्याने वागलो तर कदाचित आपला पगार कापला जाईल, ही जणू अनेक सरकारी कर्मचार्यांची धारणाच झालेली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात जाणे या कल्पनेनेच अनेक सामान्यांची घाबरगुंडी उडते. त्यामुळे असल्या घोषणा पोकळ वाटतात.
कदंब महामंडळ खासगी बसवाहतुकीला पर्याय ठरू शकत नाही हे वास्तव जनतेने स्वीकारले आहे. याचा फायदा खासगी बसवाल्यांना होतो. ते पूर्ण बस भरल्याशिवाय अथवा दुसरी बस आल्याशिवाय बसस्थानकातून बस सोडतच नाही. पुढे प्रवाशांचा अंदाज पाहूनच बस हाकतात. त्यामुळे प्रवाशांना कधीकधी आपल्या स्थानी पोहोचण्यास उशीर होतो किंवा दुसरी पुढची बस चुकते. रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कमी बसगाड्या रस्त्यावर धावत असल्यामुळे बसवाले प्रवाशांना अशा तर्हेने वेठीस धरतात. यावेळी अनेकदा प्रवाशांच्या संयमाचा कडेलोट होतो, मात्र इलाज नसतो.
हे मान्य आहे की, डिझेलचे पैसे वसूल झाले पाहिजेत. त्यासाठी प्रवासी बसमध्ये भरले पाहिजेत, परंतु ते कुठपर्यंत कोंबले पाहिजेत याला काही मर्यादा नाही. बसमध्ये ११ प्रवासी उभे राहू शकतात असे लिहिलेले असते, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एकेकदा दाराजवळच ११ प्रवासी दाटीवाटीने उभे केलेले भयानक चित्र दृष्टीस पडते. सकाळ आणि संध्याकाळ गर्दीच्यावेळी तर इतके प्रवासी कोंबले जातात की, परिणामी बाईमाणसांनाही दरवाजावर लोंबकळत जावे लागते. अधिक प्रवासी मिळविण्याच्या नादात बसचालक एकदा मिळालेला वेग सोडण्यास तयार नसतो आणि मागून येणारा दुसरा बसचालक ओव्हरटेक करण्याचा आपला हट्ट सोडत नसतो. प्रवासी मिळविण्याची ही शर्यत प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवते. यावेळी दोघांत वादावादी होते. त्याची आता प्रवाशांना सवय झाली आहे.
वाहतूक पोलिसांचा धाक नाही
अनेक वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात असतात, मात्र त्याचा धाक कोणालाच नाही. हे पोलीस दुचाकीवाल्यांकडून दंड वसूल करण्यात मग्न असतात. प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. वृद्ध नागरिकांची यातून सुटका नाही. प्रवाशांच्या बाबतीत अशा प्रकारची अनास्था हा एकूणच आपला सामाजिक रोग आहे. प्रवाशांच्या जीवाचे मोल कस्पटासमान आहे. आज नोकरीस जाणार्या महिला बसच्या गर्दीत धक्के खात आहेत, त्यांच्या हालअपेष्टांना कुत्राही खात नाही.
कधीकधी सुरक्षा सप्ताह पाळला जातो, तेव्हा आठ – पंधरा दिवस कारवाई होते, मात्र अशा फुटकळ कारवाईने कुणी वठणीवर येणे शक्य नाही, परंतु वाहतूक खात्यात हिंमत असली तरी इच्छाशक्ती नाही. वाहतूक खात्याने प्रवाशांना जणू वार्यावर सोडले आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढताना – उतरताना फारच त्रास होतो. उतरताना चुकून काही सेकंद उशीर झाला, तर कंडक्टर त्यांच्यावर खेकसतो. प्रवाशांशी उद्धटपणाने वागणे, वृद्धांना सांभाळून न घेणे हे आता नित्याचेच झाले आहे. प्रवाशांशी सभ्यपणाने वागणे आपल्या पौरुषत्वाच्या भावनेला मारक आहे असे तर त्यांना वाटत नाही ना?
सौजन्याचे प्रशिक्षण द्यावे
वाहतूक खात्याने बसचालक, बस वाहक यांना प्रवाशांची सभ्यपणाने कसे वागावे याचे प्रशिक्षण द्यावे, असे त्यांचे वर्तन पाहून वाटते. आरटीओने केवळ परवाने वाटण्यापेक्षा चालवणारा नियमाचे किती पालन करतो हे ध्यानात घेतले पाहिजे. वाहनचालकांनी मग ते अवजड वाहन असो, चारचाकी अथवा दुचाकी असो; चालवताना सावधगिरी बाळगली नाही तर बाकीचे प्रयत्न वृथा आहेत.
महिलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरक्षित जागांसाठी अनेकदा तंटे होतात. या जागांवर दोघांनाही भांडावे लागते. याचे वाहकाला गांभीर्य नसते. फारच कोणी तक्रार केली तर आढेवेढे घेत वाहक त्याची दखल घेतो. गोव्यात हजारोंच्या संख्येने खाजगी बसगाड्यांचे जाळे दुर्गम अशा गावांतील रस्त्यांवरून पसरले आहे. काही प्रवासी हट्टी असतात. अनेकदा महाविद्यालयीन तरुण-तरुणी ज्येष्ठ नागरिकांची आसने बळकावतात. त्यांना किंवा एखाद्या गरोदर महिलेला आसन देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. आपले डोके मोबाईलमध्ये खुपसून त्यात मग्न असतात. आजची पिढी पाश्चात्यांच्या पोशाखाचे, राहणीमानाचे अनुकरण करते, परंतु त्यांचे चांगले गुण स्वीकारत नाही. आधुनिक काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत, याचेच हे द्योतक आहे. बसमधून प्रवास करणार्यांना असे अनुभव नित्याचेच आहेत. बसवाल्यांच्या बेपर्वाईच्या वृत्तीत बदल होणार नाही, तोपर्यंत या गोष्टी शक्य नाहीत. तरी कधीतरी हे बदलायला हवे. तरच बसवाल्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले प्रवासी वाहतूक पोलिसांना दुवा देतील.