हॉटेलमधील बाथ टबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू

0
100

>> फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट ः प्रकरणाला कलाटणी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे त्यांच्या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या रक्तात मद्याचे अंश आढळले असून त्या राहत असलेल्या हॉटेलच्या बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये त्या तोल जाऊन पडल्या व त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असे अहवालामुळे उघड झाले आहे. दुबई सरकारनेही श्रीदेवी यांचा हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात मिळण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी खाजगी जेट विमान दुबईला रवाना झाले आहे.

पुतण्याच्या विवाहासाठी कुटुंबियांसमवेत श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. या समारंभानंतर रात्री हॉटेलमध्ये आल्यानंतर शनिवारी रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नायकप्रधान हिंदी सिनेसृष्टीत सुपरस्टार पद मिळवणार्‍या त्या पहिल्याच नायिका ठरल्या होत्या. याआधी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची चर्चा होती. मात्र आता फॉरेन्सिक अहवालात मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. दरम्यान, मुंबईतील अनिल कपूर यांच्या निवासस्थानी सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

फॉरेन्सिक अहवालानंतर श्रीदेवींचे पार्थिव शवपेटीत ठेवण्याच्या प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. तर दुबईतील सूत्रांच्या माहितीनुसार कायदेशीर प्रक्रियेसाठी हे प्रकरण संबंधित विभागाकडे पाठविले आहे.

न्यायदंडाधिकार्‍यांच्या मान्यतेनंतरच
मिळणार पार्थिव
श्रीदेवी यांचे पार्थिव शवविच्छेदन प्रक्रियेनंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यास आधी दुबई पोलिसांनी मान्यता दिली होती. मात्र फॉरेन्सिक अहवालानंतर दुबई पोलीस आता तेथील न्यायदंडाधिकार्‍यांचा आदेश मिळाल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यायदंडाधिकार्‍यांकडून तशी मान्यता मिळाल्यानंतरच पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात सुपूर्द करणे शक्य होणार असल्याचेही दुबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्रकरण कायदा खात्याकडे
श्रीदेवी यांच्या या अपघाती मृत्यूसंदर्भात अधिक चौकशीसाठी हे प्रकरण दुबई सरकारने तेथील कायदा खात्याकडे सुपूर्द केले आहे. त्याआधी श्रीदेवी यांचा शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पार्थिव कुटुंबियांना दिले जाणार असल्याची चर्चा होती.

दुबई सरकारतर्फे माध्यमांत निवेदन प्रसारीत
दुबई पोलीस मुख्यालयाने एका निवेदनात श्रीदेवी यांचा मृत्यू त्या बेशुद्ध झाल्यानंतर हॉटेलमधील बाथ टबमध्ये पडून बुडाल्याने झाल्याचे नमूद केले होते. हे निवेदन दुबई सरकारच्या माध्यम कार्यालयाने ट्विटरवर प्रसारीत केले होते. तर दुबईस्थित गल्फ न्यूजने आपल्या वृत्तात श्रीदेवी मद्याच्या नशेत होत्या असे नमूद केले आहे. या वृत्तपत्राने ट्विटरवर श्रीदेवींच्या मृत्यूसंदर्भातील दुबई सरकारच्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतही दर्शवली होती. या अहवालावर युएई सरकारचा शिक्का तसेच संबंधित संस्थेचे संचालक डॉ. सॅम वॅडी यांची सही आहे. या अहवालावर श्रीदेवी बोनी कपूर अय्यप्पन असे नाव, त्यांचा पासपोर्ट क्रमांक, घटनेची तारीख तसेच मृत्यूचे कारण नमूद केले आहे. श्रीदेवी यांच्याबाबतीतील ही घटना कोणत्या पार्श्‍वभूमीवर व कोणत्या परिस्थितीत घडली त्याचीही चौकशी सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

श्रीदेवींच्या अखेरच्या
क्षणी काय घडले?

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार शनिवार दि. २४ रोजी दुबईतील जुमेरा एमिरेटस् टॉवर्स या श्रीदेवी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये बोनी कपूर संध्या. ५.३० वा. (स्थानिक वेळेनुसार) पोचले त्यांच्या खोलीत जाऊन त्यांनी श्रीदेवींना उठविले. उभयतांनी सुमारे १५ मिनिटे गप्पा केल्या. त्यानंतर डिनरला जाण्यास तयार होण्यासाठी श्रीदेवी बाथरूममध्ये गेल्या. मात्र १५ मिनिटे होऊनही त्या बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जोर लावून दरवाजा उघडला. त्यावेळी पाण्याने पूर्ण भरलेल्या बाथ टबमध्ये श्रीदेवी बेशुद्धावस्थेत पडलेल्या त्यांना दिसून आले.

शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न असफल
बोनी यांनी श्रीदेवींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी आपल्या मित्राला बोलावले. त्यानंतर ९ वा. त्यांनी पोलिसांना कळवले, असे वृत्तात म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांसह वैद्यकीय पथक तेथे दाखल झाले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. त्यांना तेथेच मृत घोषित केले गेले.