>> शपथबद्ध झाल्यानंतर राज्यपाल पिल्लई यांचे प्रतिपादन
गोव्याच्या विकासासाठी प्राधान्यक्रम दिले जाणार आहे. गोव्यातील पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असून पर्यटनाच्या विकासाकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. गोव्याचा खाण प्रश्न, म्हादईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काल गोव्याच्या राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यपाल पिल्लई यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी शपथ दिली. हा शपथविधी सोहळा राजभवनच्या आवारात उभारण्यात आलेल्या शामियान्यात झाला.
या शपथविधी सोहळ्याच्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती राजेश पाटणेकर, मंत्री, आमदारांची उपस्थिती होती. राज्याचे मुख्य सचिव व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
नूतन राज्यपाल पिल्लई यांनी सकाळी राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधला. गोव्यातील सामाजिक एकोपा, सलोखा कायम राखण्यासाठी राज्यातील जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. केरळप्रमाणे गोवा हे राज्यसुद्धा पर्यटन राज्य आहे. या राज्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे, असेही राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे पर्यटन व्यवसायाला झळ बसली आहे. पर्यटन व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. आगामी काळात पर्यटन व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू होईल, अशी अपेक्षा करूया, असेही राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण ही काळाची गरज आहे. देशातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. गोव्यातील खाण प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. तसेच म्हादई प्रश्नाचा विषय न्यायालयात असल्याने योग्य अभ्यास करण्याची गरज आहे. असेही राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. यानंतर राज्यपालांनी गोवा पोलिसांकडून सलामी स्वीकारली.
गोवा राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ऑगस्ट २०२०पासून होता. मागील आठवड्यात पिल्लई यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्री. पिल्लई हे गोव्यात येण्याअगोदर मिझोरमचे राज्यपाल म्हणून र्कारत होते. तसेच त्यांनी केरळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे.
पूर्णवेळ राज्यपाल मिळाल्याने राज्याला फायदा ः मुख्यमंत्री
राज्यपालांचा अनुभव आणि मार्गदर्शन राज्याच्या विकासासाठी लाभदायक ठरणार आहे. गोव्यातील जनता आणि सरकारच्या वतीने मी राज्यपाल पिल्लई यांचे स्वागत करतो. राज्याला आता पूर्णवेळ राज्यपाल मिळाले आहे. त्याचा फायदा गोवा राज्याला भरपूर मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.