खाण अवलंबितांना करदात्यांचा पैसा का?

0
127

सावळ : खाण घोटाळा करणार्‍यांकडून पैसे वसूल करा
राज्यातील खनिजवाहू ट्रकमालक, यंत्रसामुग्रीचे मालक व अन्य खाण अवलंबितांना जनतेच्या करातून गोळा केलेला पैसा न देण्याची जोरदार मागणी डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी काल अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी केली.
खाण अवलंबितांना पैसा द्यायचा असेल तर तो बेकायदेशीरपणे खनिज काढून गोव्याला लुटणार्‍यांकडून किंवा केंद्राकडून आणावा, अशी सूचना त्यांनी केली.
गृह आधार, लाडली लक्ष्मी या योजनांच्या भोवतीच लोक गुंग झाले आहेत. वरील योजनांमुळे समाज लाचार बनल्याचा आरोप त्यांनी केला. कृषी किंवा अन्य उद्योगांच्या माध्यमातून जनतेला मदत केली पाहिजे, असे सांगून वरील योजनामुळे शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नसल्याचे सावळ यांनी सांगितले.
गेल्या साडेसात वर्षांच्या काळात डिचोली मतदारसंघाचा विकास झालाच नाही, सरकारने पन्नास हजार नोकर्‍या तयार करण्याचे आश्‍वासन दिले होते. राज्यात किती नोकर्‍या निर्माण केल्या असा प्रश्‍नही त्यांनी केला.
रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारला आपण पुढील साडेसात वर्षे देण्यास तयार आहे. सरकारने नोकर्‍या निर्माण करून दाखवाव्या, असे आव्हान सावळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.