सीबीआय अधिकार्यांनी छाप्यानंतर जी. जनार्दन रेड्डी यांना त्वरित त्यांच्याच वाहनातून हैदराबादला हलवले. फौजदारी स्वरूपाचे कटकारस्थान, भ्रष्टाचार, चोरी व अवैध खाण व्यवसायाचा आरोप रेड्डी यांच्यावर ठेवण्यात आला असून भारतीय दंड संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, भारतीय वन कायदा तसेच खाणी व खनिजे नियमन कायदा या कायद्यांखाली रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
हैदराबादेतील सीबीआय न्यायालयाने जनार्दन रेड्डी व श्रीनिवास रेड्डी यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ७ सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर केले जाणार असून पंधरा दिवस चौकशीसाठी आपल्या ताब्यात द्यावे अशी मागणी सीबीआयच्या वतीने केली जाणार आहे.
सीबीआयने छाप्यानंतर रेड्डी यांच्या मालकीचे ‘रुक्मिणी’ हे खासगी हेलिकॉप्टरही जप्त केले. त्यांचा लॅपटॉप, डायरी व इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. दुसर्या एका पथकाने रेड्डी यांची पत्नी लक्ष्मी अरुणा हिचीही स्वतंत्रपणे चौकशी केली. रेड्डी यांच्या घरी कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी संपत्ती सापडल्याचे वृत्त असून दोन कोटींहून अधिक रोकड व तीस किलो सोने सापडल्याचा दावा सीबीआय अधिकार्यांनी केला आहे. श्रीनिवास रेड्डी यांच्या घरातूनही तीन कोटी रोकड मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सीबीआयच्या या छाप्यांचा कर्नाटकच्या लोकायुक्तांच्या अहवालाशी काही संबंध नसून आंध्र प्रदेश सरकारतर्फे नोंदवण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. रेड्डी यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी बेळ्ळारीत रस्त्यावर उतरून निदर्शने केली. भाजपाने कॉंग्रेसची ही सूडाची कारवाई असल्याचा दावा केला असून रेड्डी हे निष्कलंकपणे बाहेर येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. सीबीआय ही ‘चोर बचाओ इन्स्टिट्यूशन’ झाल्याचा आरोप माजी आरोग्य मंत्री व रेड्डी यांचे निकटवर्तीय बी. श्रीरामलू यांनी नंतर केला. त्यांच्याही घरावर सीबीआयने छाप्याची कारवाई केली. कॉंग्रेसच्या आदेशांनुसार सीबीआय वागत असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष के. एस. ईश्वराप्पा यांनी केला आहे.
जी करुणाकर रेड्डी, जी जनार्दन रेड्डी व जी सोमशेखर रेड्डी या बंधूंच्या मालकीच्या खाण कंपन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप असून त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने कालची कारवाई केली. सीबीआयचे महासंचालक पी. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.